जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 284/2021.
तक्रार नोंदणी दिनांक : 16/12/2021.
तक्रार निर्णय दिनांक : 15/04/2024.
कालावधी : 02 वर्षे 03 महिने 29 दिवस
प्रल्हाद यादवराव जोडतले, वय 67 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. हनुमंतवाडी (हलगरा), ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,
विभाग : निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,
शाखा : औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- आर. बी. पांडे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानामध्ये विद्युत जोडणी घेण्यात आलेली असून त्यांचा ग्राहक क्र. 614480520074 आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहेत आणि दुग्ध व्यवसाय जोडधंद्याकरिता त्यांनी रु.70,000/- रकमेची म्हैस खरेदी केलेली होती. दि.15/9/2019 रोजी सायं. 7.30 वाजता तक्रारकर्ता यांची म्हैस शेताकडून परत आली असता त्यांच्या निवासस्थानाजवळील विद्युत खांबाच्या विद्युत धक्क्यामुळे मृत्यू पावली. घटनेबाबत पोलीस ठाणे, औराद शहाजनी येथे नोंद करण्यात येऊन घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, औराद शहाजनी यांनी म्हशीची शवचिकित्सा करुन अहवाल दिला. तक्रारकर्ता यांच्या लेखी पत्राच्या अनुषंगाने विद्युत निरीक्षक, लातूर यांनी चौकशी करुन अहवाल दिला आणि अहवालामध्ये विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे अपघात झाल्याचे नमूद केले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे लेखी अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली असता दखल घेतलेली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने मृत म्हशीकरिता रु.1,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, ग्राहक तक्रारीमध्ये नमूद घटना प्रत्यक्षात घडलेली नाही आणि घटनेबद्दल तफावत व संशय आहे. तक्रारकर्ता यांचे कथने व छायाचित्रे यामध्ये विसंगती आहे. ग्राहक तक्रार खोटी व काल्पनिक असल्यामुळे खर्चासह रद्द करण्याची विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून निवासस्थानाकरिता विद्युत जोडणी घेतलेली होती आणि त्यांचा ग्राहक क्र. 614480520074 आहे, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. सार्वजनिक रस्त्यावरील विद्युत खांबाच्या विद्युत धक्क्यामुळे तक्रारकर्ता यांची म्हैस मृत्यू पावली, याबद्दल विशेष वाद नाही.
(5) पोलीस घटनास्थळ पंचनामा व विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, लातूर यांचा अहवाल पाहता तक्रारकर्ता यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर असणा-या विद्युत खांबाचा विद्युत धक्क्यामुळे तक्रारकर्ता यांची म्हैस मृत्यू पावल्याचे निदर्शनास येते. निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांच्या निवासस्थानामध्ये असणा-या विद्युत जोडणीमुळे किंवा निवासस्थानामध्ये कथित घटना घडलेली नाही. तक्रारकर्ता त्यांच्या निवासस्थानाकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत पुरवठा घेत असले तरी कथित घटना सार्वजनिक रस्त्यावर असणा-या विद्युत खांबाच्या विद्युत धक्क्यामुळे घडलेली आहे आणि त्या घटनेकरिता तक्रारकर्ता यांच्या विद्युत जोडणीचा थेट संबंध नाही. तक्रारकर्ता हे केवळ त्यांच्या निवासस्थानातील विद्युत पुरवठ्याकरिता विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' ठरतात. आमच्या मते, सार्वजनिक रस्त्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' होत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-