जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 43/2021. तक्रार नोंदणी दिनांक : 01/02/2021. तक्रार निर्णय दिनांक : 18/04/2024.
कालावधी : 03 वर्षे 02 महिने 17 दिवस
प्रभावती श्रीकृष्ण पाटील,
व्यवसाय : शेती, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.
(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उपविभाग मुरुड, ता. जि. लातूर.
(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
शाखा : बोपला, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- आर. बी. जानते
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मौजे एकुर्गा, ता. जि. लातूर शिवारामध्ये त्यांना गट क्र. 72 मध्ये क्षेत्र 1 हे. 20 आर. शेतजमीन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कुपनलिका घेतलेली आहे. त्यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विद्युत वितरण कंपनी') यांच्याकडून विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतलेली असून त्यांचा ग्राहक क्रमांक 610410070009 आहे. ते विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत देयकांचा भरणा करीत असून त्यांच्याकडे थकबाकी नाही.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, कुपनलिकेच्या पाण्यावर त्यांनी सन 2017-2018 मध्ये ऊस पिकाची लागवड केलेली होती आणि ते ऊस पीक विकास सहकारी साखर कारखाना लि. निवळी यांच्याकडे गाळपासाठी दिलेला होते.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, सन 2018-19 च्या हंगामामध्ये त्यांच्या ऊस पिकाची 22 ते 25 कांड्यापर्यंत वाढ झालेली होती. दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे ए बी स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) बी फेजचा जम्पर निसटून ए बी स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून बांधावरील गवताने पेट घेतला. ती आग वाढून गट क्र. 72 मध्ये असणा-या ऊसाच्या पाचटाला आग लागून तक्रारकर्ता यांचे ऊस 1 हे. 20 आर ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आणि त्यांना एकूण रु.4,50,000/- चे नुकसान सहन करावे लागले.
(4) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, घटनेबद्दल कळविल्यानंतर विद्युत वितरण कंपनीतर्फे पंचनामा करण्यात आला. तसेच तहसील व पोलीस यंत्रणने पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी घटनेपूर्वी अनेकवेळा विद्युत वितरण कंपनीस ए बी स्वीच दुरुस्त करण्याबद्दल लेखी व मौखिकरित्या कळविलेले होते; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घटना घडलेली आहे. नुकसान भरपाई देण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी अर्ज व सूचनापत्र पाठविले असता विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली नाही. उक्त विवेचनाअंती सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.4,50,000/- नुकसान भरपाई; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याकरिता विद्युत वितरण कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(5) विद्युत वितरण कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी खोट्या व बनावट माहिती व कागदपत्रांच्या आधारे ग्राहक तक्रार दाखल केलेली असल्यामुळे रद्द करण्यात यावी. दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर, एकुर्गा यांचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेला असल्यामुळे त्यांना आवश्यक पक्षकार करणे गरजेचे आहे. तक्रारकर्ता हे दि.31/3/2004 पासून थकबाकीदार आहेत.
(6) विद्युत वितरण कंपनीचे पुढे कथन असे की, पैसे कमविण्याच्या उद्देशाने ऊस पीक घेतलेले असल्यामुळे तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत. ऊस जळीत प्रकरणामध्ये केव्हाही संपूर्ण ऊस जळून खाक होत नाही. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले विद्युत देयक व विद्युत ग्राहक क्र. 610410070009 तक्रारकर्ता यांच्या नांवे नाही. तक्रारकर्ता यांनी अधिका-यांशी संगनमत करुन खोटे पंचनामे तयार केले आणि त्यावरुन विद्युत निरीक्षक, लातूर यांनी संगनमत करुन चुकीचा अहवाल दिला.
(7) विद्युत वितरण कंपनीचे पुढे कथन असे की, दि.21/12/2018 रोजी 2.38 वाजता श्री. इंगळे नाना व श्री. राजु घुले यांनी दुरध्वनीवरुन एकुर्गा शिवारामध्ये वाहिनी तुटून 1-2 शेतक-यांचे ऊस पीक पेटल्याचे कळविल्यानंतर उपअभियंता, सब-डिव्हीजन, मुरुड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तक्रारकर्ता यांचे शेत हे एकुर्गा गावालगत असून दुपारी 2.20 वाजता गावामध्ये श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर हे ट्रॅक्टरमध्ये हवा भरता असताना टायरची डिस्क वर उडाली आणि दुकानाच्या वर असणा-या फेज व न्युट्रल तारा तुटल्या. त्या तारा तुटताना त्यांचा स्पर्श जवळच असलेल्या 11 के.व्ही. तारांना होऊन 33/11 के.व्ही. बोपला येथून निघणारे 11 के.व्ही. एकुर्गा फिडर दुपारी 2.20 वाजता ट्रीप झाले. गावामध्ये एल टी फॉल्ट होत असताना सदर ए बी स्वीचवर स्पार्कींग झाल्याचे प्रथमदर्शनी वाटते आणि श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचे मालक जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला.
(8) विद्युत वितरण कंपनीने पुढे कथन असे की, तथाकथित घटनेमध्ये तक्रारकर्ता यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तक्रारकर्ता यांनी सन 2018-2019 मध्ये विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशाली नगर, निवळी येथे ऊस गाळपासाठी दिला आणि कारखान्याने जळीत कपात केलेली नाही आणि कारखान्याने त्यांना ऊसाची रक्कम दिलेली आहे.
(9) विद्युत वितरण कंपनीने पुढे कथन असे की, त्यांचा ए बी स्वीच केव्हाही खराब नव्हता आणि तो दुरुस्त करण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी किंवा मौखिकरित्या कळविलेले नव्हते. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(10) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे 'ग्राहक' आहेत काय ? नाही
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(11) मुद्दा क्र. 1 ते 3 :- विद्युत वितरण कंपनीने घेतलेली प्राथमिक हरकत अशी की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले विद्युत देयक व विद्युत ग्राहक क्र. 610410070009 त्यांच्या नांवावर नाही आणि पैसे कमविण्याच्या उद्देशाने ऊस पीक घेतलेले असल्यामुळे तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत.
(12) अभिलेखावर दाखल केलेल्या वीज आकार देयकाचे अवलोकन केले असता ते विश्वनाथ पाटील यांच्या नांवे असून त्यांचा ग्राहक क्र. 610410070009 नमूद दिसतो. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार विद्युत वितरण कंपनीकडे मागणी शुल्क भरणा करुन त्यांनी 5 अश्व शक्ती विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतली आणि त्यांचा ग्राहक क्र. 610410070009 आहे. तक्रारकर्ता यांचे कथन पाहता वीज आकार देयकाच्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेत असल्याचे सिध्द होत नाही. सकृतदर्शनी, ग्राहक क्र. 610410070009 व त्याची विद्युत जोडणी विश्वनाथ पाटील यांच्या नांवे आहे. तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेत असल्याचे व त्यांचे विद्युत ग्राहक असल्याचे सिध्द होत नाही.
(13) तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये 'ग्राहक' संज्ञेत येणार नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-