जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 44/2021. तक्रार नोंदणी दिनांक : 01/02/2021. तक्रार निर्णय दिनांक : 18/04/2024.
कालावधी : 03 वर्षे 02 महिने 17 दिवस
नंदकुमार पिता विठोबा खेडेकर,
व्यवसाय : शेती, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.
(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उपविभाग मुरुड, ता. जि. लातूर.
(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
शाखा : बोपला, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अमोल निंबुर्गे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मौजे एकुर्गा, ता. जि. लातूर शिवारामध्ये त्यांना गट क्र. 72 व 73 मध्ये क्षेत्र 1 हे. 07 आर. शेतजमीन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कुपनलिका घेतलेली आहे. त्यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विद्युत वितरण कंपनी') यांच्याकडून विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतलेली असून त्यांचा ग्राहक क्रमांक 610410346071 आहे. ते विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत देयकांचा भरणा करीत असून त्यांच्याकडे थकबाकी नाही.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, कुपनलिकेच्या पाण्यावर त्यांनी सन 2017-2018 मध्ये ऊस पिकाची लागवड केलेली होती आणि ते ऊस पीक विकास सहकारी साखर कारखाना लि. निवळी यांच्याकडे गाळपासाठी दिलेले होते.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, सन 2018-19 च्या हंगामामध्ये त्यांच्या ऊस पिकाची 22 ते 25 कांड्यापर्यंत वाढ झालेली होती. दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे ए बी स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) बी फेजचा जम्पर निसटून ए बी स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून बांधावरील गवताने पेट घेतला. ती आग वाढून गट क्र. 72 व 73 मध्ये असणा-या ऊसाच्या पाचटाला आग लागून तक्रारकर्ता यांचे ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आणि त्यांना एकूण रु.4,50,000/- चे नुकसान सहन करावे लागले.
(4) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, घटनेबद्दल कळविल्यानंतर विद्युत वितरण कंपनीतर्फे पंचनामा करण्यात आला. तसेच तहसील व पोलीस यंत्रणने पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी घटनेपूर्वी अनेकवेळा विद्युत वितरण कंपनीस ए बी स्वीच दुरुस्त करण्याबद्दल लेखी व मौखिकरित्या कळविलेले होते; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घटना घडलेली आहे. नुकसान भरपाई देण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी अर्ज व सूचनापत्र पाठविले असता विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली नाही. उक्त विवेचनाअंती सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.4,50,000/- नुकसान भरपाई; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याकरिता विद्युत वितरण कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(5) विद्युत वितरण कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी खोट्या व बनावट माहिती व कागदपत्रांच्या आधारे ग्राहक तक्रार दाखल केलेली असल्यामुळे रद्द करण्यात यावी. दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर, एकुर्गा यांचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेला असल्यामुळे त्यांना आवश्यक पक्षकार करणे गरजेचे आहे. विद्युत वितरण कंपनीचे कथन असे की, त्यांनी सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रारकर्ता हे व्यवसायिक हेतुने ऊसाचे पीक घेत असल्यामुळे त्यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. ग्राहक तक्रारीतील परिच्छेदनिहाय मजकूर खोटा असल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे 'ग्राहक' आहेत काय ? नाही
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- विद्युत वितरण कंपनीने घेतलेली प्राथमिक हरकत अशी की, तक्रारकर्ता हे व्यवसायिक हेतुने ऊसाचे पीक घेत असल्यामुळे ग्राहक तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार नाही. अभिलेखावर दाखल केलेल्या वीज आकार देयकाचे अवलोकन केले असता ते देयक "विजय विठोबा कोरके" यांच्या नांवे असून त्यातील 'कोरके' नांव खोडून त्यापुढे 'खेडकर' याप्रमाणे हस्तलिखीत दुरुस्ती केलेली आहे. देयकामध्ये ग्राहक क्र. 610410346071 नमूद दिसतो. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार विद्युत वितरण कंपनीकडे मागणी शुल्क भरणा करुन त्यांनी 5 अश्व शक्ती विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतली आणि त्यांचा ग्राहक क्र. 610410346071 आहे. मात्र, वीज आकार देयकाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेत असल्याचे सिध्द होत नाही. तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे विद्युत ग्राहक असल्यासंबंधी पुरावा नाही. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये 'ग्राहक' संज्ञेत येत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-