आदेश
(दिनांक – ०९.१२.२०२२)
श्री. किशोर द. वडणे, अध्यक्ष यांचे व्दारा –
१. प्रस्तुतची तक्रार तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी याबाबत दाखल केलेली आहे.
२. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे तक्रारकर्ता हे मौजे तांदुळवाडी येथे हॉटेल सम्राट या नावाने व्यावसाय करतात व त्यावरच त्यांचे कुटूंबाची उपजिविका सुरु आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून हॉटेल व्यवसायाकरीता दिनांक १२.०३.२०१२ रोजी वीज पुरवठा घेतलेला असुन, त्याचा ग्राहक क्रमांक ६०६३८००००६९१ असा आहे व मीटर क्रमांक ०७६०३२७३४६८ असा होता. तक्रारकर्ता यांनी मीटर रिडींगनुसार वेळोवेळी वीज देयकांचा भरणा केला आहे. परंतू जून – जुलै २०२० मध्ये तक्रारकर्ता यांचेकडे जोडण्यात आलेले मीटर तांत्रीकद्ष्टया नादुरुस्त झाले व तशी नोंद वीज देयकामध्ये दिसून येते. त्यामुळे जुलै २०१९, ऑगस्ट २०१९ मध्ये फॉल्टी मीटर अशी नोंद दर्शवून तक्रारकर्तास चुकीच्या पध्दतीने देयक देण्यात आले. त्यावर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष ३ यांचे कार्यालयाकडे मीटर दुरुस्तीची विनंती केली. त्यामुळे विरुध्द पक्ष ३ यांनी तक्रारकर्तास ऑगस्ट अखेरीस नविन मीटर क्रमांक ०३९०२३१९९० बसविण्यात आले. परंतू तक्रारकर्ता यांनी फॉल्टी मीटर या सदराखाली आलेल्या देयकांचा भरणा केलेला नाही.
३. विरुध्द पक्ष ३ यांनी तक्रारकर्तास नविन मीटरचे ३८८ युनिटचे रुपये ५,३११/- व पूर्वीची देयक रक्कम रुपये ८०,७९९/- व त्यावरील व्याज असे एकुण रुपये ८८,१४०/- चे देयक दिले आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ चे देयकामध्ये एकुण वीज वापर ७६७ युनिट दर्शवून रुपये १०,६८१/- व मागील बाकी रुपये ८५,५८८/- दर्शवून "Adjustment" या सदराखाली रुपये ९४,१३५/- दर्शवून एकुण रुपये १,९३,०१०/- चे देयक दिले आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक ३०.११.२०१९ रोजी रुपये ५०,०००/- व दिनांक ३१.१२.२०१९ रोजी रुपये २५,०००/- चा भरणा केला आहे. तक्रारकर्ता यांनी वेळोवेळी वीज देयकाची दुरुस्ती करणेबाबत विनंती करुन देखील, विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी आयोगा समोर तक्रार दाखल करुन, ऑक्टोबर २०१९ मध्ये वितरीत केलेले प्रत्यक्ष वापराप्रमाणे देयक मिळावे. तसेच आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये २०,०००/- मिळणेकरीता तक्रार अर्ज दाखल केला आहे.
४. विरुध्द पक्ष यांनी त्यांचे म्हणणे लेखी युक्तीवाद-व्दारे दाखल करुन, तक्रारकर्ता यांचे अर्जातील संपूर्ण मागणी अमान्य केलेली आहे. विरुध्द पक्ष यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्ता यांनी सन २०१९ पासून नियमित वीज देयकाचा भरणा केलेला नाही. तक्रारकर्ता यांचे जुने मीटर क्रमांक ०७६०३२७३४६८ फॉल्टी असल्याचे तक्रारकर्ता यांचे अर्जावरुन तक्रारकर्तास नविन मीटर क्रमांक ०३९०२३१९९९० बसविण्यात आले आहे. तक्रारकर्ता यांचे मागील देयक ९२,६४०/- असे होते व तक्रारकर्ता यांचे जुने मीटर टेस्टींग करुन, ते देयक कमी करुन, तक्रारकर्तास रुपये ८८,२००/- चे देयक दिलेले आहे. तक्रारकर्ता याने दिनांक ०८.०८.२००१ मध्ये रुपये १०,०००/- चा भरण केला, त्यामुळे तक्रारकर्ता यांचेकडे रुपये ७७,२००/- थकबाकी शिल्लक राहीली आहे. त्यामुळे थकबाकी व ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंतचे बील रुपये २,०६,१६०/- त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दिनांक ३०.११.२०१९ रोजी रुपये ५०,०००/- चा भरणा केला. त्यानंतर जानेवारी २०२० चे देयक रुपये २,०७,४८०/- मधून तक्रारकर्ता यांनी भरणा केलेली रक्कम रुपये ५०,०००/- वजा करुन, उर्वरीत बिल रुपये १,६५,३५०/- तक्रारकर्ता यांचेकडे थकीत आहे. सदर देयक टाळण्याचे उद्देशाने तक्रारकर्ता यांनी चुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सदरचे देयक तक्रारकर्ता यांना भरणा करण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
५. तक्रारकर्ता यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र कागदपत्राचे यादीसह पुराव्याची कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
६. विरुध्द पक्ष यांनी फक्त लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
७. तक्रार अर्जाचा आशय, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला पुरावा तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचा लेखी युक्तीवाद याचे अवलोकन करता या आयोगाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात, त्याचे निष्कर्ष विवेचनासहीत खालील प्रमाणे नोंदण्यात आले आहे.
अ.क्रं | मुद्दे | उत्तर |
१ | विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे हि बाब तक्रारकर्ता यांनी सिध्द केली आहे काय ? | होय |
२ | तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
३ | आदेश काय ? | अंतीम आदेशा प्रमाणे |
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक – १ व २
८. मुद्दा क्रमांक १ व २ हे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्र करण्यात येते.
९. तक्रारकर्ता यांनी जून २०१९ पर्यंत वेळोवेळी वीज देयके विरुध्द पक्ष यांना अदा केली आहेत. प्रस्तुत प्रकरणातील विद्युत देयकाबाबत वाद हा जुलै २०१९ पासून चालु भरणा असुन, तक्रारकर्ता असे कथन करतात की, विरुध्द पक्ष यांनी चुकीच्या पध्दतीने विद्युत देयके दिलेली आहेत. तसेच ऑगस्ट २०१९ रोजी नविन मीटर बसवून मागील थकबाकीसह देयके दिलेली आहेत. तसेच ऑक्टोबर २०१९ मध्ये "Adjustment" सदराखाली रुपये ९४,१३५/- व मागील थकबाकी रुपये ८५,५८८/- दर्शवून एकुण देयक रक्कम रुपये १,९३,०१०/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तास दिले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिल्याने तक्रारकर्ता यांनी दिनांक ३०.११.२०१९ रोजी रुपये ५,०००/- व दिनांक ३१.१२.२०१८ रोजी रुपये २५,०००/- देयकापोटी विरुध्द पक्षाकडे भरणा केला आहे. विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ताने वेळोवेळी सांगून देखील विद्युत देयके विरुध्द पक्ष यांनी दुरुस्त करुन दिलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०१९ पासून आलेली सर्व देयके दुरुस्त करुन, मिळणेकरीता तक्रारकर्ता यांनी तक्रार अर्ज या आयोगाकडे दाखल केला आहे.
१०. विरुध्द पक्ष यांनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारकर्ता यांनी सन २०१२ ते २०१८ पर्यंत विद्युत देयकांचा नियमित भरणा केला आहे. परंतू सन २०१९ पासून तक्रारकर्ताने नियमित वीज देयकांचा भरणा केला नाही. सदरचे मीटर फॉल्टी असल्यामुळे ऑगस्ट/सप्टेंबर २०१९ मध्ये नविन मीटर बसविण्यात आले असुन, मागील थकबाकी दुरुस्त करुन, रुपये ८८,२००/- प्रमाणे विद्युत देयक दिलेले आहे. थकबाकी आल्यामुळे तक्रारकर्ताचे विद्युत देयक अवाजवी वाटते. वास्तविक पाहता तक्रारकर्तास दिलेली देयके ही योग्य आहेत. त्यामुळे तक्रारकर्ताचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
११. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता असे दिसून येते की, सन २०१८ पर्यंत उभय पक्षकारांचा विद्युत देयका संदर्भात वाद नाही. जुलै २०१९ पासून विद्युत देयकाबाबत उभय पक्षांमध्ये वाद आहे. जुलै २०१९ चे देयकावर मागील युनिट ११७९५ व चालु युनिट ११७८५ दर्शवून तक्रारकर्तास ११२८ युनिटचे रुपये १५,५७९/- चे देयक दिलेले आहे. तसेच मागील थकबाकी रुपये ६१,४७०/- देयकावर दर्शविण्यात आलेली आहे. तसेच ऑगस्ट २०१९ रोजीच्या देयकावर मागील युनिट ११७९५ व चालु युनिट ११७८५ दर्शवून युनिट वापर ११२८ दर्शवून देयक रुपये १५,३९७/- दिलेले आहे. सदर देयकावरुन असे दिसून येते की, विरुध्द पक्ष यांनी युनिटचा वापर अंदाजे दर्शवून विद्युत देयके तक्रारकर्तास दिलेली आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता यांचा विरुध्द पक्षाचे विरुध्द अविश्वास निर्माण झालेला आहे. सदरचे देयक हे फॉल्टी दर्शविलेले आहे. त्यामुळे सदरचे मीटर सुस्थितीत करण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष यांची आहे. अंदाजे देयक देऊन, विरुध्द पक्षाने सदोष सेवा तक्रारकर्तास दिल्याचे स्पष्ट होते. तसेच नविन मीटर बसविल्यानंतर माहे सप्टेबरच्या देयकावर मागील युनिट १ दर्शवून चालु युनिट ३८९ दर्शवून युनिटचा वापर ३८८ असल्याचे दिसून येते. सदरचे देयक रुपये ५,३११/- आहे. असे असतांना मागील थकबाकी रुपये ८८,१३६/- दर्शविलेली आहे. तसेच ऑक्टोबर मधील देयकाचा वापर युनिट ७६७ दर्शविलेला असुन, मागील थकबाकी रुपये ८५,५८८/- तसेच "Adjustment" रक्कम रुपये ९४,१३५/- दर्शविलेली अशी एकुण थकबाकी रुपये १,९३,०१०/- दर्शवून देयक दिलेले आहे. सदर देयकात "Adjustment" सदराखाली रुपये ९४,१३५/- बाबत विरुध्द पक्ष यांनी खुलासा केलेला नाही. सदर रक्कम कोणत्या आधारे तक्रारकर्ता यांना आकारण्यात आली याबाबत स्पष्टोक्ती नाही. दाखल विद्युत देयकाचे अवलोकन करता असे दिसून येते की, जुलै, ऑगस्टचे विद्युत देयक वापराचे युनिट प्रमाणे दिलेले नाही. तसेच नविन मीटर नुसार तक्रारकर्ता यांचा मासीक ऑगस्टचा वापर ३८८ युनिट आहे. तसेच "Adjustment" या सदराखाली रुपये ९४,१३५/- बाबत विरुध्द पक्षाने पुरावे दाखल केले नाहीत. त्यामुळे नविन मीटरच्या वापराप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारकर्तास प्रतिमहा ३८८ युनिट प्रमाणे २०१९ पासून सुधारीत देयके तक्रारकर्तास द्यावीत व पूर्वीचे जून २०१९ पासूनची देयके रद्द करावीत. तसेच सुधारीत देयकामध्ये मागील थकबाकी दर्शवू नये. तसेच अतिरीक्त व्याज आकारणी करु नये, असे विरुध्द पक्ष यांना सूचित करण्यात येते. सुधारीत देयकातून जून २०१९ पासून तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे देयकापोटी अदा केलेली रक्कम वजावट करुन, सुधारीत देयक विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना द्यावीत, या निष्कर्षाप्रत हे आयोग येते.
१२. सदर प्रकारामुळे तक्रारकर्ता यांना निश्चीत आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रुपये ५,०००/- अदा करणे उचित होईल असे या आयोगाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक – ३
१३. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी दिल्याचे तक्रारकर्ता यांनी सिध्द केल्याने आदेश खालील प्रमाणे आदेश पारीत.
आदेश
- तक्रारकर्ता यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तास जून २०१९ पासून दिलेली वीज देयके रद्द करण्यात येतात.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तास जून २०१९ पासून निकाल तारखेपर्यंत प्रतिमहा ३८८ युनिटचे वापराप्रमाणे सुधारीत देयके द्यावीत. तसेच सुधारीत देयकामधून तक्रारकर्ता यांनी जून २०१९ पासून भरणा केलेली रक्कम वजावट करण्यात येऊन, सुधारीत देयक तक्रारकर्तास द्यावे.
- तक्रारकर्ता यांनी यापुढील देयकांचा भरणा विरुध्द पक्षाकडे नियमित करावा.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
- विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश दिनांका पासून ४५ दिवसाचे आत करावी.
दिनांक – ०९.१२.२०२२