Maharashtra

Osmanabad

CC/18/417

सविता दत्तात्रय बनसोडे - Complainant(s)

Versus

कार्यकरी अभियंता महाराष्ट्र राज्य विधुत वितरण मंडळ उस्मानाबाद - Opp.Party(s)

श्री एम टी अपचे

14 Jun 2021

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/18/417
( Date of Filing : 14 Dec 2018 )
 
1. सविता दत्तात्रय बनसोडे
रा. वाकडी ता. कळंब जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. कार्यकरी अभियंता महाराष्ट्र राज्य विधुत वितरण मंडळ उस्मानाबाद
उस्मानाबाद ता. जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
2. उपकार्यकारी अभियंता महारष्ट्र राज्य विधुत वितरण मंडळ कळंब
कळंब ता. कळंब जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
3. कनिष्ट अभियंता महाराष्ट्र राज्य विधुत वितरण मंडळ शिराढोण
शिराढोण ता. कळंब जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. किशोर द. वडणे PRESIDENT
 HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 14 Jun 2021
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : ४१७/२०१८.                  तक्रार दाखल दिनांक : १४/१२/२०१८.                                                                                          तक्रार निर्णय दिनांक : १४/०६/२०२१.

                                                                                    कालावधी :   ०२ वर्षे ०६ महिने ०० दिवस

 

सविता दत्तात्रय बनसोडे, वय ४३ वर्षे, व्यवसाय : शेती व घरकाम,

रा. वाकडी इस्थळ, पोस्ट : घारगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.                          तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

(१) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ,

     उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.

(२) उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ,

     कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.

(३) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ,

     शिराढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.                                                          विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष

                                    मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य

 

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. मल्लिकार्जून तात्याराव आपचे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. विनायक बाबासाहेब देशमुख (बावीकर)

 

आदेश

 

मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-

 

(१)        तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, मौजे वाकडी इस्थळ, ता. कळंब येथील गट क्र.४०/२ चे मुळ मालक असणारे विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांची शेतजमीन त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दत्तात्रय बनसोडे यांचे नांवे झाली. त्यानंतर दत्तात्रय बनसोडे यांनी ती शेतजमीन त्यांच्या पत्नी म्हणजेच तक्रारकर्ती यांचे नांवे केलेली आहे. विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांचे नांवे विरुध्द पक्ष यांच्याकडून ग्राहक क्र.६०६८८००२४२३५ अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला असल्यामुळे दत्तात्रय बनसोडे व तक्रारकर्ती यांनी विनंती करुनही विरुध्द पक्ष यांनी त्यांचे नांवे विद्युत पुरवठा केलेला नाही.

(२)       तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, शेती पिकांना त्या विहिरीद्वारे पाणी पुरवठा करतात आणि बागायती ऊस पीक घेत होत्या. सन २०१७-१८ मध्ये त्यांनी ६० आर. क्षेत्रामध्ये ८६३२ जातीच्या ऊस पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतजमिनीतून विद्युत वाहिनी रोहित्र आहे. विद्युत वाहिनी त्यांच्या शेतावरुन गेलेली आहे. तारांना झोळ असल्यामुळे तारांचे एकमेकांना घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. त्याबाबत कळवूनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. दि.१६/१०/२०१८ रोजी तारांच्या ठिणग्या पडून तारा तुटून ठिणग्यांचा जाळ झाला आणि त्यांच्या परिपक्व ऊस व पाचटावर पडल्यामुळे त्यांचे ६० आर. ऊस पीक जळून खाक झाले.

 

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, घटनेबाबत विरुध्द पक्ष क्र.३ व पोलीस ठाणे, शिराढोण व महसूल विभागास कळविले असता पोलीस ठाणे, शिराढोण यांनी आकस्मात जळीत क्र.१०/२०१८ अन्वये नोंद करुन पंचनामा केला. तसेच महसूल यंत्रणेने पंचनामा केलेला आहे. विद्युत निरीक्षक, उस्मानाबाद यांनी अहवाल दिलेला आहे.

 

(४)       तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, त्यांच्या पूर्ण वाढ झालेल्या ऊसाचे प्रतिएकर ६० टन ऊस उत्पादन झाले असते. त्यावेळी प्रतिटन रु.२,५००/- दर असल्यामुळे ९० टन ऊस उत्पादनाकरिता रु.२,२५,०००/- चे नुकसान झाले. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली असून नुकसान भरपाई देण्याकरिता टाळाटाळ केली. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.२,२५,०००/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.५०,०००/- व तक्रार खर्चाकरिता रु.१०,०००/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.

 

(५)       विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. ग्राहक तक्रारतील बहुतांश मजकूर त्यांनी अमान्य केला आहे. त्यांचे कथन आहे की, विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांना त्यांनी विद्युत पुरवठा दिलेला असून त्यांचा ग्राहक क्र. ६०६८८००२४२३५ आहे. विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दत्तात्रय किंवा तक्रारकर्ती यांनी विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांचे नांव बदलण्यासाठी कार्यवाही केलेली नाही. दि.१६/१०/२०१८ रोजी जोराचे वादळ सुटल्यामुळे तार तुटून घटना घडली असावी आणि विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजी किंवा हलगर्जीपणामुळे घटना घडली नाही. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. तलाठी पंचनामा व पोलीस पंचनामा त्यांच्या अपरोक्ष केला असल्यामुळे अमान्य केला आहे. तसेच विद्युत निरीक्षकांचा अहवाल घटनेनंतर १५ दिवसाने केलेला असून तो सविस्तर नाही. तक्रारकर्ती यांचा जळीत ऊस कारखान्याकडे गाळपास नेला असल्यामुळे तक्रारकर्ती यांचे नुकसान झालेले नाही. तसेच तक्रारकर्ती ह्या ग्राहक नाहीत. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

 

(६)       तक्रारकर्ती यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.

 

                        मुद्दे                                                                                                      उत्तर

 

(१)        तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या ग्राहक असल्याचे सिध्द होते काय ?                   नाही.

(२)       तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ?                                                            नाही.

(३)        काय आदेश ?                                                                                       शेवटी दिल्याप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(७)       मुद्दा क्र. 1 व 2 :- असे दिसते की, विश्वंभर यशवंता बनसोडे यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून कृषि प्रयोजनार्थ विद्युत पुरवठा घेतलेला होता आणि त्यांचा ग्राहक क्र. ६०६८८००२४२३५ आहे.  ऊस जळीत घटनेवेळी विश्वंभर यशवंता बनसोडे मयत होते, ही बाब वादास्पद नाही. त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती विद्युत पुरवठयाची सेवा घेत आहेत, ही बाब वादास्पद नाही.

 

(८)       तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, दत्तात्रय बनसोडे व तक्रारकर्ती यांच्या विनंतीनंतरही विरुध्द पक्ष यांनी विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांचे नांवे असणारा विद्युत पुरवठा त्यांचे नांवे केला नाही आणि विद्युत पुरवठा त्यांचे नांवे करुन देण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली. तसेच ते संयुक्तपणे विद्युत पुरवठयाचा वापर करीत असल्यामुळे ग्राहक आहेत. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दत्तात्रय किंवा तक्रारकर्ती यांनी विश्वंभर विश्वनाथ बनसोडे यांचे नांव बदलण्यासाठी कार्यवाही केलेली नाही आणि तक्रारकर्ती यांनी त्यांचे नांवे विद्युत पुरवठा करुन घेतला नसल्यामुळे त्या ग्राहक होऊ शकत नाहीत, असे नमूद केले.

 

(९)       असे दिसते की, तक्रारकर्ती यांच्या ऊस जळिताची घटना दि.१६/१०/२०१८ रोजी घडलेली आहे. दत्तात्रय विश्वंभर बनसोडे यांनी तक्रारकर्ती यांचे नांवे विद्युत पुरवठा करण्यासाठी दि.२/१/२०१९ रोजी विरुध्द पक्ष यांचे नांवे अर्ज केलेला दिसतो. म्हणजेच तो अर्ज ऊस जळीत घटनेनंतर केलेला आहे. तसेच तो अर्ज विरुध्द पक्ष यांना प्राप्त झाल्याची नोंद अर्जावर दिसून येत नाही किंवा इतर कोणत्या मार्गाने अर्ज विरुध्द पक्ष यांना देण्यात आला, हे स्पष्ट केलेले नाही. त्या अर्जामध्ये विश्वंभर यशवंता बनसोडे हे सन १९८९ मध्ये मयत झाल्याचे व त्यांचे नांवे असणारा विद्युत पुरवठा तक्रारकर्ती यांचे नांवे करण्याची विनंती केलेली दिसते. ग्राहक तक्रारीमध्ये गट क्र.४०/२ चे मुळ मालक विश्वंभर विश्वनाथ बनसोडे असे नमूद आहे. परंतु दत्तात्रय विश्वंभर बनसोडे यांच्या दि.२/१/२०१९ च्या अर्जामध्ये व विद्युत आकार देयकामध्ये विश्वंभर यशवंता बनसोडे असे नांव आहे. नांवामध्ये असणा-या फरकाबाबत त्यांनी उचित खुलासा केलेला नाही. तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार दत्तात्रय विश्वंभर बनसोडे यांचे नांवे वादकथित विद्युत पुरवठा असणारी शेतजमीन होती, असाही पुरावा नाही. ऊस जळीत घटना घडली तेव्हा शेतजमीन तक्रारकर्ती यांचे नांवे आहे; परंतु दत्तात्रय विश्वंभर बनसोडे यांना तक्रारकर्ती यांचे नांवे अर्ज करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याचे स्पष्टीकरण दिसून येत नाही. तसेच विश्वंभर यशवंता बनसोडे यांचे निधन १९८९ मध्ये झाले असता दत्तात्रय विश्वंभर बनसोडे किंवा तक्रारकर्ती यांचे नांवे शेतजमीन हस्तांतरीत केल्यानंतर २५-३० वर्षाच्या कालावधीमध्ये विद्युत पुरवठा स्वत:चे नांवे करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.

 

(१०)      तक्रारकर्ती ह्या विश्वंभर यशवंता बनसोडे यांच्या नांवे असणा-या विद्युत पुरवठयाची सेवा घेत आहेत, ही बाब वादास्पद नाही. विश्वंभर यशवंता बनसोडे यांच्या मृत्यूनंतर शेतजमीन दत्तात्रय विश्वंभर बनसोडे व त्यानंतर तक्रारकर्ती यांचे नांवे हस्तांतरीत झाल्याचे कथन आहे. विश्वंभर यशवंता बनसोडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नांवे असणारा विद्युत पुरवठा स्वत:चे नांवे करण्यासाठी तक्रारकर्ती यांनी आवश्यक कार्यवाही केलेली नाही. तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्याकडून विश्वंभर यशवंता बनसोडे यांचे नांवे असणा-या विद्युत पुरवठयाची सेवा घेत असल्यातरी तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये विद्युत पुरवठ्याकरिता संविदाजन्य हितसंबंध आढळून येत नाहीत. नियमाप्रमाणे तक्रारकर्ती यांचे नांवे विद्युत जोडणी देण्यात आलेली नाही, हे स्पष्ट होते. तक्रारकर्ती ह्या नियमाप्रमाणे विद्युत पुरवठयाची सेवा घेत नसल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ चे कलम २(७) अन्वये ‘ग्राहक’ संज्ञेनुसार लाभार्थी ठरु शकत नाहीत.

 

(११)      विरुध्द पक्ष यांच्यातर्फे विधिज्ञांनी मा.छत्‍तीसगड राज्‍य आयोगाने ‘छत्‍तीसगड स्‍टेट इलेक्‍ट्रीसिटी बोर्ड /विरुध्‍द/ गोवर्धन प्रसाद धुरंदर’, २०१० (३) सी.पी.जे. ६३ या निवाडयाचा आधार घेऊन तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या ग्राहक होऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद केला. त्या न्यायनिर्णयातील परिच्छेद क्र.४ मध्ये मा. राज्य आयोगाने खालीलप्रमाणे न्यायिक निरीक्षण नोंदवले आहे.

 

 

            Para. 4 : It is not dispute that electricity supply connection stands in the name of Taaplal Dhurandhar. It has been admitted by learned counsel for respondent that the said person Taaplal Dhurandhar had died long back in the year 1990 and thereafter complainant was enjoying the electricity through the supply connection, which was standing in the name of a dead person. It is also not in dispute that no application for change in name of the consumer or providing connection in the name of complainant or mutation of his name in place of his father was every made by the complainant. These facts show that the complainant was not a consumer of the appellants. He was simply paying sometimes charges of the electricity already used through the connection standing in the name of a dead person. We do not think that mere use of electricity through a connection in the name of a dead person can confirm the status of consumer on the complainant. We are of the firm view that complainant can not be said to be consumer of the appellants, therefore, his complaint dose not lie under the Consumer Protection Act, 1986.

 

 

(१२)      तक्रारीची वस्‍तुस्थिती व उपरोक्‍त नमूद न्‍यायिक प्रमाण पाहता तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या ग्राहक होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत उपस्थित विवादाच्‍या इतर मुद्दयांना स्‍पर्श न करता तक्रारकर्ती ह्या ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, या एकमेव कारणास्‍तव तक्रार रद्द करणे न्‍यायोचित ठरते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती ह्या अनुतोषास पात्र नाहीत. आम्‍ही मुद्दा क्र.१ व २ चे उत्‍तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत

 

                                                   आदेश

 

 

 

(१)     तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.

(२)       खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. मुकुंद भगवान सस्ते)                                                                (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)

            सदस्य                                                                                             अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)

-००-

(संविक/स्व/१०५२१)

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. किशोर द. वडणे]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.