जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 268/2022. आदेश दिनांक : 30/09/2022.
बिबीआयेशा अब्दूल मुजीब, वय 60 वर्षे, व्यवसाय : स्वंयरोजगार,
रा. मोंढा रोड (अंबाजोगाई रोड), अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. लि.,
अंबाजोगाई रोड, अहमदपूर.
(2) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. लि.,
विभाग उदगीर, शाखा क्र. 3, मोंढा रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती यांच्या विद्वान विधिज्ञांनी प्रकरण दाखलपूर्व युक्तिवाद केला. त्या अनुषंगाने वादकथनांची दखल घेतली असता तक्रारकर्ती 'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? हा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले नाही.
(2) तक्रारकर्ती यांचे कथन असे आहे की, कौटुंबीक उदरनिर्वाहाकरिता 'नॅशनल आईस फॅक्टरी' नांवे 20 वर्षापासून बर्फाचा कारखाना चालवितात. तक्रारकर्ती त्यांच्या पती व कुटुंबासह कारखान्यामध्ये काम करतात. त्यांनी कारखान्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून 'उद्योग' प्रवर्गामध्ये 34.18 अश्व शक्ती मंजूर भार असणारा विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा विद्युत मीटर क्रमांक 06505818700 आहे. व्यवसाय हंगामी असल्यामुळे कारखाना फेब्रुवारी ते मे अशा 4 महिन्यामध्ये चालतो आणि उर्वरीत महिने बंद असतो. विद्युत पुरवठा LT Industy General प्रवर्गामध्ये आहे. त्यांनी विद्युत देयके नियमीत भरणा केले आहेत. शासनाच्या आदेशामुळे मार्च 2020 ते जानेवारी 2022 पर्यंत कारखाना बंद होता. नोव्हेंबर 2021 मध्ये विद्युत मीटर तपासणीसाठी काढण्यात आले आणि नवीन विद्युत मीटर बसविण्यात आले. विद्युत मीटरची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्ती यांना दि.7/7/2022 रोजी रु.12,02,050/- देयकाचा संदेश प्राप्त झाला. ते देयक जास्त असल्यामुळे चौकशी केली असता मार्च 2018 पासून नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रतिमहा 4403 युनीट विद्युत वापराचे देयक दिल्याचे सांगण्यात आले. विरुध्द पक्ष यांनी देयक वसुलीकरिता विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिल्यामुळे दि.30/7/2022 ते 23/9/2022 कालावधीमध्ये रु.4,77,000/- चा भरणा केला. उक्त विवेचनाअंती दि.7/7/2022 रोजी दिलेले रु.10,76,824/- चे देयक रद्द करण्याचा व त्याची वसुली न करण्याचा; रु.4,77,000/- व्याजासह परत करण्याचा; विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचा; रु.10,76,824/- ची थकबाकी पुढील देयकामध्ये समाविष्ठ न करण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात याव, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(3) अभिलेखावर दाखल विद्युत देयकाचे अवलोकन केले असता Scale / Sector : Medium Scale / Private Sector, Seasonal : N, Tariff : 36 LT-V B II, Connected Load (KW) 34.18 HP, Category : LT Industry General above 20 KW असा उल्लेख आढळतो. तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांनी नमूद केले की, कौटुंबीक उदरनिर्वाहाकरिता तक्रारकर्ती ह्या 20 वर्षापासून 'नॅशनल आईस फॅक्टरी' नांवे बर्फाचा कारखाना चालवितात आणि त्यांच्या पती व कुटुंबासह कारखान्यामध्ये काम करतात. त्यामुळे ते 'ग्राहक' संज्ञेत येतात, असे त्यांनी निवेदन केले.
(4) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) मध्ये 'ग्राहक' शब्दाची संज्ञा नमूद आहे. ती अशी की,
(7) "consumer" means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
Explanation.—For the purposes of this clause,—
(a) the expression "commercial purpose" does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;
(b) the expressions "buys any goods" and "hires or avails any services" includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;
(5) वादकथने व कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांनी बर्फ कारखान्याकरिता उद्योग प्रवर्गामध्ये विद्युत पुरवठा घेतल्याचे दिसून येते. असे दिसते की, विद्युत पुरवठ्याचा Connected Load (KW) 34.18 HP व Sanctioned Load (KW) 34.18 HP आहे. फेब्रुवारी 2022 ते मे 2022 दरम्यान विद्युत वापर अनुक्रमे 8210, 4747, 7535 व 6822 दिसून येतो. तक्रारकर्ती यांनी बर्फ उद्योगाकरिता विद्युत पुरवठा घेतलेला असून 34.18 कि.वॅ. विद्युत भार मंजूर करण्यात आलेला आहे. तक्रारकर्ती यांनी पती व कुटुंब कारखान्यामध्ये काम करीत असल्याचे व बर्फ उद्योगावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, असे नमूद केले असले तरी निश्चितच त्यांच्या बर्फ उद्योगाकरिता यंत्रसामुग्री व अनुषंगिक मालमत्तेची गुंतवणूक आवश्यक आहे. कुटुंबातील किती सदस्य कारखान्यामध्ये काम करतात, याबाबत स्पष्टता दिसून येत नाही. कारखान्यामध्ये काम करणा-या कुटुंबातील सदस्यांची शपथपत्रे अभिलेखावर नाहीत. बर्फ उद्योगाद्वारे मिळणारे उत्पन्न, होणारा खर्च, निव्वळ उत्पन्न इ. बाबी दिसून येत नाहीत. आमच्या मते, तक्रारकर्ती यांचा उद्योग हा दैनंदीन जीवनावश्यक गरजा भागविणेकरिता उत्पन्नाचे साधन नसून तो व्यवसायिक उद्योग आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 मध्ये नमूद 'ग्राहक' परिभाषेनुसार तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या 'ग्राहक' होऊ शकत नाहीत आणि त्या अनुषंगाने ग्राहक तक्रार प्राथमिक स्तरावर रद्द करणे क्रमप्राप्त आहे आणि खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये तक्रारकर्ती 'ग्राहक' संज्ञेत येत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)