Maharashtra

Latur

CC/150/2023

बापु प्रभु साबळे - Complainant(s)

Versus

ओरिगो फायनांस प्रा. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. एस. मोरे

19 Apr 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/150/2023
( Date of Filing : 23 Jun 2023 )
 
1. बापु प्रभु साबळे
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. ओरिगो फायनांस प्रा. लि.
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Apr 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 150/2023.                            तक्रार नोंदणी दिनांक : 23/06/2023.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 19/04/2024.

                                                                                       कालावधी : 00 वर्षे 09 महिने 26 दिवस

 

(1) श्री. बापू प्रभु साबळे, वय 40 वर्षे, धंदा : व्यवसाय.

(2) श्री. शिवकन्या प्रभु साबळे, वय 38 वर्षे, धंदा : वैद्यकीय व्यवसाय.

(3) छबुबाई प्रभु साबळे, वय 62 वर्षे, धंदा : गृहिणी,

      सर्व रा. घर नं. 2208, मुरुड, ता. मुरुड, जि. लातूर.                             :-         तक्रारकर्ते

 

                        विरुध्द

 

(1) ओरिगो फायनान्स प्रा. लि.,

     लेवल-3, वैष्णवी आरटीटीसी टेलिकॉम नगरसमोर,

     गच्चीबावली, हैद्राबाद, तेलंगणा - 500 081.

     (मुख्य व्यवस्थापक यांच्यावर नोटीस बजावण्यात यावी.)

(2) ओरिगो फायनान्स प्रा. लि., दुसरा मजला, मनगेनी केक्ससमोर,

      बँक ऑफ बडोदा समोर, अश्विनी हॉस्पिटलच्या मागे,

      सदभावना नगर, औसा रोड, लातूर - 413 512.

     (शाखा व्यवस्थापक यांच्यावर नोटीस बजावण्यात यावी.)                      :-         विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. अभिलाष एस. मोरे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. अजय हरिभाऊ इळेगांवकर

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ते क्र.1 व 2 हे तक्रारकर्ती क्र.3 यांची मुले आहेत. तक्रारकर्ता क्र.1 यांना व्यवसाय करण्यासाठी रकमेची आवश्यकता असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना 'ओरिगो फायनान्स' संबोधण्यात येते.) यांच्याशी संपर्क साधून कर्ज रकमेची मागणी केली. त्याप्रमाणे ओरिगो फायनान्स यांनी रु.6,35,000/- कर्ज मंजूर केले. त्या कर्जास तक्रारकर्ती क्र.2 व 3 सहकर्जदार आहेत. त्यांच्या कर्ज संविदेचा क्रमांक 104486 असून कर्जासाठी मुरुड (बु.), ता. जि. लातूर येथील जमीन गट क्र. 609 पैकी खुला प्लॉट क्र.14 तारण ठेवलेला आहे.

(2)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, कर्ज मंजूर करण्यापूर्वी ओरिगो फायनान्स यांनी कर्जासाठी 22 टक्के व्याज दर असेल; कर्ज परतफेडीचा कालावधी दि.5/8/2025 पर्यंत 70 महिन्याचा असेल; प्रतिमहा हप्ता रु.17,319/- असेल, असे सांगितले. परंतु दि.30/8/2019 रोजी त्यांना देण्यात आलेल्या कर्ज मंजुरी पत्रामध्ये कर्ज रकमेस 25 टक्के व्याज दर असल्याचे नमूद केले. त्याबद्दल विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले आणि दखल घेतलेली नाही.

(3)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मे 2020 पर्यंत त्यांनी वेळोवेळी कर्ज हप्त्यांचा भरणा केला. मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ओरिगो फायनान्स यांनी 3 महिन्यांचे अधिस्थगन (Moratorium) दिल्यामुळे जुन, जुलै व ऑगस्‍ट 2020 चे हप्ते त्यांनी भरणा केले नाहीत. त्यानंतर मार्च 2022 पर्यंत त्यांनी हप्त्यांचा वेळोवेळी भरणा केला.

(4)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, त्यांनी मुदतपूर्व कर्ज परतफेडीची दर्शविल्यामुळे ओरिगो फायनान्स यांनी दि.31/3/2022 रोजी त्यांना Foreclosuer पत्र दिले. त्या पत्रानुसार‍ ऑक्टोंबर 2022 पूर्वी रु.5,98,945/- रक्कम भरण्यासंबंधी मौखिकरित्या कळविण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारकर्ती क्र.2 यांनी भारतीय स्टेट बँकेच्या बचत खाते क्र. 00000030764471842 या खात्यातून रु.4,01,000/- नेट बँकींगद्वारे भरणा करुन उर्वरीत रक्कम लवकर देण्याबद्दल कळविले.

(5)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, ओरिगो फायनान्स यांचे अधिकारी वारंवार तक्रारकर्ती क्र.2 यांना भेटून, SMS व  Whatsapp वरुन बेहिशोबी रकमेची मागणी करु लागले. ओरिगो फायनान्स यांच्या अधिका-यांनी दिलेल्या त्रासामुळे तक्रारकर्ती क्र.2 यांना गर्भपातास सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारकर्ती क्र.2 यांनी ओरिगो फायनान्स यांना रु.25,00,000/- रकमेची मागणी करणारे सूचनापत्र पाठविले; परंतु त्याबद्दल दखल घेतलेली नाही.

(6)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, ओरिगो फायनान्स यांच्या Foreclosure पत्राची पडताळणी केल्यानंतर परतफेडीच्या वेळापत्रकामध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले. वास्तविक, कर्ज परतफेडीचा कालावधी दि.5/8/2025 पर्यंत होता आणि 3 महिन्याचे अधिस्थगन व 1 महिना अधिक याप्रमाणे वाढ करुन दि.5/12/2025 पर्यंत परतफेडीचा कालावधी येतो. परंतु अधिस्थगनानंतर कर्ज परतफेडीचा कालावधी दि.5/9/2026 नमूद करुन ओरिगो फायनान्स अतिरिक्त 9 महिन्यांच्या हप्त्यांकरिता रु.1,55,871/- वसूल करण्याच्या प्रयत्नात आहेत. Foreclosure पत्रानुसार रु.5,98,945/- मधून रु.1,55,871/- वजावट करता रु.4,43,074/- देय ठरतात आणि त्यापैकी रु.4,01,000/- भरणा केल्यामुळे रु.42,074/- देणे आहेत. त्याप्रमाणे रु.42,074/- भरणा करण्याबद्दल ओरिगो फायनान्‍स यांच्याकडे तयारी दर्शविली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले.

(7)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, विधिज्ञांमार्फत ओरिगो फायनान्स यांना सूचनापत्र पाठवून त्यांनी रु.42,074/- भरण्याची तयारी दर्शविली; परंतु ओरिगो फायनान्स यांनी दखल घेतली नाही. ओरिगो फायनान्स यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.42,074/- स्वीकारुन कर्ज क्र. 104486 चे बेबाकी दाखला देण्याचा; तारण ठेवलेले मुळ खरेदीखत परत करण्याचा; रु.25,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,00,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.2,00,000/- देण्याचा ओरिगो फायनान्स यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली.

(8)       ओरिगो फायनान्स यांनी अभिलेखावर विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र दाखल न केल्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आला.

(9)       तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर दि.30/8/2019 रोजी ओरिगो फायनान्सने दिलेले कर्ज मंजुरीपत्र, मौजे मुरुड येथील गट क्र. 609 पैकी प्लॉट क्र. 14 चे खरेदीखत, कर्ज रकमेच्या परतफेडीच्या हप्त्यांचे प्रपत्र, कर्जाचे Foreclosure पत्र, बँक खाते उतारे, Whatsapp संदेशवहन, विधिज्ञांमार्फत पाठविलेले सूचनापत्र इ. कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.

(10)     कर्ज मंजुरीपत्राचे अवलोकन केले असता ओरिगो फायनान्सने तक्रारकर्ते यांना रु.6,35,000/- कर्ज रक्कम मंजूर केल्याचे निदर्शनास येते. त्या कर्जाकरिता मौजे मुरुड येथील गट क्र. 609 पैकी प्लॉट क्र. 14 ग्राम पंचायत मिळकत क्र. 7047 चे खरेदीखत तारण ठेवल्याचे दिसते. व्याज दर द.सा.द.शे. 25 टक्के नमूद असून परतफेड कालावधी 70 महिने दर्शविलेली आहे. मुद्दल व व्याज मिळून रु.17,319/- मासिक हप्ता निश्चित करण्यात आलेला आहे. ओरिगो फायनान्सने दि.31/3/2022 रोजी तक्रारकर्ते यांच्या कर्जाचे Foreclosure पत्र दिले असून रु.5,25,825/- देय असल्याचे व अन्य शुल्कासह रु.5,98,945/- रक्कम येणे दर्शविलेली आहे.

(11)     तक्रारकर्ते यांचे वादकथने व दाखल केलेल्या कागदपत्रांस ओरिगो फायनान्स यांच्याकडून खंडन झालेले नाही आणि त्याकरिता विरोधी पुरावा नाही.

(12)     सकृतदर्शनी, तक्रारकर्ते यांनी ओरिगो फायनान्स यांच्याकडून रु.6,35,000/- वित्तसहाय्य घेतले; प्रतिमहा रु.17,319/- प्रमाणे 70 हप्त्यांमध्ये कर्ज रकमेची परतफेड करावयाची होती; तक्रारकर्ते यांनी कोविड-19 साथरोगामध्ये अधिस्थगन लाभ घेतला; तक्रारकर्ते यांचे कर्ज Foreclosure करावयाचे असल्यामुळे ओरिगो फायनान्सने दि.31/3/2022 रोजी तक्रारकर्ते यांना Foreclosure पत्र दिले  इ. बाबी कागदोपत्री स्पष्ट होतात.

(13)     तक्रारकर्ते यांचे कथन असे की, मार्च 2022 पर्यंत त्यांनी हप्त्यांचा वेळोवेळी भरणा केला. त्यानंतर मुदतपूर्व कर्ज परतफेडीची तयारी दर्शविल्यामुळे ओरिगो फायनान्स यांनी दि.31/3/2022 रोजी दिलेल्या पत्रानुसार रु.5,98,945/- रक्कम भरण्यासंबंधी कळविले आणि तक्रारकर्ती क्र.2 यांनी भारतीय स्टेट बँकेच्या बचत खाते क्र. 00000030764471842 या खात्यातून वेळोवेळी रु.4,01,000/- भरणा केले. मात्र ओरिगो फायनान्स यांचे अधिकारी तक्रारकर्ती क्र.2 यांना भेटून, SMS व  Whatsapp वरुन बेहिशोबी रकमेची मागणी करु लागले, असे तक्रारकर्ते यांचे कथन आहे.

(14)     वादकथित कर्ज प्रकरणासंबंधी तक्रारकर्ते व ओरिगो फायनान्स यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला संविदालेख अभिलेखावर दाखल नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन तक्रारकर्ते यांनी ओरिगो फायनान्स यांच्याकडून कर्ज घेतल्याचे, अधिस्थगन लाभ घेतल्याचे, खाते मुदतपूर्व बंद करण्याची प्रक्रिया अवलंबल्याचे मान्य करावे लागते. तक्रारकर्ते हे त्यांचे कर्ज मुदतपूर्व बंद करण्यास इच्छुक असल्यामुळे ओरिगो फायनान्सकडे संपर्क साधून Foreclosure पत्र घेतलेले आहे. त्या पत्रानुसार कर्ज परतफेडीकरिता रु.5,98,945/- रक्कम निश्चित करण्यात आली. वास्तविक पाहता, रु.5,98,945/- किती दिवसांमध्ये भरणा करावयाची, याबद्दल स्पष्टता नाही. मात्र तक्रारकर्ते यांच्या कथनानुसार ऑक्टोबर 2022 पर्यंत रु.5,98,945/- भरणा करण्याबद्दल ओरिगो फायनान्सने सांगितलेले होते. तक्रारकर्ते यांनी भारतीय स्टेट बँकेच्या बचत खाते क्र. 00000030764471842 मधून वेळोवेळी रु.4,01,000/- भरणा केला. सर्वसाधारणपणे, जेव्हा एखादे खाते मुदतपूर्व बंद करण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येते, त्यावेळी कर्जाची येणे रक्कम एकरकमी भरणे अपेक्षीत असते. असे दिसते की, रु.5,98,945/- पैकी ऑक्टोंबर 2022 पर्यंत रु.4,01,000/- भरणा केल्याचे तक्रारकर्ते यांनी नमूद केले. Whatsapp संदेश वहनानुसार तक्रारकर्ते यांना वेळोवेळी Foreclosure पत्राप्रमाणे रकमेची मागणी करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी Foreclosure पत्राप्रमाणे देय असणा-या रु.5,98,945/- रकमेपैकी रु.4,01,000/- रकमेचा भरणा केल्याचे ग्राह्य धरावे लागेल.

(15)     असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी ओरिगो फायनान्सच्या दि.31/3/2022 रोजीच्या Foreclosure पत्रास आव्हान देऊन अतिरिक्त 9 महिन्यांच्या हप्त्यांसाठी रु.1,55,871/- वसूल करण्यात येत असल्याचे नमूद केले.

(16)     आमच्‍या मते, वित्‍तीय संस्‍थेला त्‍यांच्‍या कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्‍कम वसूल करण्‍याचा निर्विवाद हक्‍क आहे; परंतु वित्‍तीय संस्‍थेने थकीत रक्‍कम वसूल करण्याची कार्यवाही संविदालेख व कायद्याने प्रस्‍थापित तरतुदीनुसार करणे आवश्‍यक आहे. शिवाय, कर्जदारानेही कर्ज परतफेड करण्‍याचे कर्तव्‍य व जबाबदारी पार पाडली पाहिजे.

(17)     असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी 3 महिन्यांचा अधिस्थगन कालावधीचा लाभ घेतला. त्यामुळे कर्ज परतफेडीच्या कालावधीमध्ये पुढे 3 महिन्यांची वाढ होणे अपेक्षीत होते. परंतु Foreclosure पत्रामध्ये कर्ज परतफेडीचा कालावधी 82 महिने दर्शविलेला दिसतो. तक्रारकर्ते यांच्या कर्ज परतफेडीचा कालावधी 70 महिने असताना  तो कालावधी 73 महिने होणे आवश्यक होते. परंतु कर्ज परतफेडीचा कालावधी 82 महिने करण्यात आला. तक्रारकर्ते यांनी त्या कर्ज हप्त्यांच्या संख्येबद्दल आक्षेप घेतलेला आहे. कर्ज परतफेडीच्या सुधारीत पत्रकामध्ये 83 हप्त्यांच्या करण्यात आलेल्या वाढीस उचित आधार नाही. असे दिसते की, 82 हप्त्यांसाठी पूर्वीप्रमाणेच रु.17,319/- हप्ता कायम ठेवण्यात आला. तक्रारकर्ते यांचे 9 कर्ज हप्ते वाढल्यामुळे कर्ज परतफेडीच्या रकमेत अतिरिक्त व अनुचित वाढ झाल्याचे ग्राह्य धरावे लागेल आणि ओरिगो फायनान्सने खाते Foreclosure करताना केलेली आकारणी रु.5,98,945/- अनुचित व अयोग्य ठरते.

(18)     Foreclosure पत्रामध्ये दि.31/3/2022 अखेर मुद्दल रु.5,52,825/- दर्शवून व्याज, Foreclosure शुल्क व अन्य शुल्क इ. प्रमाणे रु.5,98,945/- निश्चित करण्यात आले. रु.5,98,945/- रक्कम निश्चित करताना एकूण 83 हप्त्यांकरिता व्याज आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांच्याकडून 9 हप्त्यांकरिता रु.1,55,871/- अतिरिक्त वसूल करण्याचा प्रयत्न ओरिगो फायनान्सने केल्याचे सिध्द होते. ओरिगो फायनान्सचे प्रस्तुत कृत्य सेवेतील त्रुटी ठरते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ते हे अनुतोषास पात्र आहेत आणि Foreclosure प्रमाणे रु.5,98,945/- मधून अतिरिक्त 9 हप्त्यांची रक्कम रु.1,55,871/- कपात करुन उर्वरीत रु.4,43,074/- भरण्यास तक्रारकर्ते यांच्यावर बंधन येते. तक्रारकर्ते यांनी ओरिगो फायनान्स यांच्याकडे रु.4,01,000/- चा भरणा केलेला असल्यामुळे उर्वरीत रु.42,074/- भरण्यास केल्यास ओरिगो फायनान्सने तक्रारकर्ते यांना वादकथित कर्ज परतफेडीच्या दायित्वातून मुक्त करणे उचित ठरेल.

(19)     तक्रारकर्ते यांच्या कथनानुसार ओरिगो फायनान्सने कर्जासाठी 22 टक्के व्याज दर असल्याचे सांगितले; परंतु कर्ज मंजुरी पत्रामध्ये कर्ज रकमेस 25 टक्के व्याज दर नमूद केला. आमच्या मते, तक्रारकर्ते यांनी कर्ज मंजुरी पत्रानुसार 25 टक्के व्याज दर स्वीकारलेला आहे आणि कर्ज रक्कम घेऊन त्यांची परतफेड सुरु केली. कर्ज रक्कम व त्याच्या व्याज दराबद्दल तक्रारकर्ते यांच्या स्वीकृतीमुळे त्यांचा मुद्दा दखलपात्र ठरत नाही.

(20)     तक्रारकर्ते यांनी ओरिगो फायनान्स यांच्याकडे रु.4,01,000/- रकमेचा वेळोवेळी भरणा केला आणि उर्वरीत रु.42,074/- रकमेचा भरणा करणे त्यांना शक्य होते. परंतु वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी त्या रकमेचा भरणा केला नसावा. असे असले तरी, न्यायाच्या दृष्टीने उर्वरीत रक्कम रु.42,074/- दि.1/11/2022 पासून द.सा.द.शे. 25 टक्के व्याज दराने ओरिगो फायनान्स यांना अदा करण्याचे निर्देश उचित ठरतात.

(21)     तक्रारकर्ते यांच्या कथनानुसार ओरिगो फायनान्स यांनी तक्रारकर्ती क्र.2 यांना त्रास दिल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर ओरिगो फायनान्स यांच्या     अधिका-यांशी झालेले Whatsapp संदेशवहन व वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे दाखल केले. तक्रारकर्ते यांनी एकरकमी रक्कम भरणा न केल्यामुळे ओरिगो फायनान्स यांच्याकडून पाठपुरावा झालेला दिसतो. तक्रारकर्ती क्र.2 यांचा गर्भपात झालेला असला तरी त्याकरिता ओरिगो फायनान्स यांच्या अधिका-यांचा त्रासच कारणीभूत होता, या निष्कर्षाप्रत येणे संयुक्तिक नाही; किंबहुना त्याप्रमाणे वैद्यकीयदृष्टया प्रमाणीकरण केलेले नाही.

(22)     तक्रारकर्ते यांनी स्वतंत्रपणे रु.25,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. निश्चितपणे, त्या मागणीपृष्ठयर्थ समर्पक विवेचन व पुरावा नाही. आमच्या मते, त्यांची प्रस्तुत मागणी अवास्तव व अनुचित आहे. तसेच ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी रु.2,00,000/- खर्चाबद्दलच्या सविस्तर विवेचन व पुरावा नाही.

(23)     आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ते यांना ओरिगो फायनान्स यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ते यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

(24)     उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

 

ग्राहक तक्रार क्र. 150/2023.

आदेश

 

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) तक्रारकर्ते यांनी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ओरिगो फायनान्स यांच्याकडे रु.42,074/- व त्यावर दि.1/11/2022 पासून द.सा.द.शे. 25 टक्के दराने व्याजाचा भरणा करावा.

(3) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ओरिगो फायनान्स यांनी तक्रारकर्ते यांच्याकडून आदेश क्र.2 प्रमाणे रक्कम स्वीकारावी.

(4) उक्त आदेश क्र.2 प्रमाणे रक्कम प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ओरिगो फायनान्सने तक्रारकर्ते यांना वादकथित कर्ज परतफेडीच्या दायित्वातून मुक्त करुन बेबाकी प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांच्याकडे तारण ठेवलेले मुळ खरेदीखत तक्रारकर्ते यांना परत करावे.

(5) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ओरिगो फायनान्स यांनी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.