जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : २२९/२०१८. तक्रार दाखल दिनांक : १३/०७/२०१८.
तक्रार निर्णय दिनांक : ०१/०७/२०२१.
कालावधी : ०२ वर्षे ११ महिने १९ दिवस
वर्षा नवनाथ गोरे, वय : ३३ वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. नायगांव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(१) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., ३२१/ए/२, ओसवाल बंधू समाज बिल्डींग
जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज् समोर, पुणे – ४११ ०४२.
(२) जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला, जायका बिल्डींग,
कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कळंब. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
मा. श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- अजय दिलीपराव भिसे
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- डी.आर. कुलकर्णी
विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.३ स्वत:
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्या मयत नवनाथ दशरथ गोरे (यापुढे “मयत नवनाथ”) यांच्या पत्नी आहेत. मयत नवनाथ यांचे नांवे मौजे नायगांव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथे गट क्र.३६४, क्षेत्र ० हे. ०३ आर. शेतजमीन आहे. मयत नवनाथ हे मुरुड येथील सुभाष सुराणा यांच्या शेतामध्ये सालगडी होते. दि.२७/७/२०१७ रोजी मयत नवनाथ हे सुभाष सुराणा यांच्या मुरुड शिवारातील शेतामध्ये गेले होते. त्यावेळी ते चालवत असणारी मोटार सायकल घसरल्यामुळे ते खाली पडले आणि डोक्यास गंभीर मार लागून बेशुध्द झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर येथे औषधोपचार सुरु असताना दि.३/८/२०१७ रोजी मृत्यू पावले. मयत नवनाथ हे शेतकरी असल्यामुळे व त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत रु.२,००,०००/- रक्कम मिळण्याकरिता दि.१३/९/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु विरुध्द पक्ष क्र.३ यांनी दि.४/५/२०१८ रोजीच्या पत्रानुसार मृताकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नाही, या कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारला. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी मयत नवनाथ यांच्या विम्याची रक्कम रु.२,००,०००/- तक्रार दाखल तारखेपासून ९ टक्के व्याज दराने देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.१०,०००/- देण्याचा व रु.५,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. तक्रारीतील कथने चूक व अर्धवट माहितीवर आधारीत असल्यामुळे अमान्य केलेली आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारीतील घटनेची तारीख २७/७/२०१७; घटनेबाबत पोलिसांना प्रथम माहिती अहवाल दिल्याची तारीख १३/८/२०१७; तसेच विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याची तारीख १३/९/२०१७ व तक्रार दाखल केल्याची तारीख १३/७/२०१८ लक्षात घेता विमा करारातील घटनेबद्दल विरुध्द पक्ष क्र.१ यांना तात्काळ माहिती देणे अनिवार्य व बंधनकारक असताना तक्रारकर्ती यांनी त्या अटी व शर्तीचे अनुपालन केलेले नाही आणि तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खर्चासह नामंजूर होणे न्यायोचित आहे. विरुध्द पक्ष क्र.१ यांचे पुढे असे कथन आहे की, मयत नवनाथ यांचा वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना अनेकवेळा मागणी करुनही दाखल केलेला नाही. त्यामुळे करारातील अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव त्यांनी नामंजूर केला आणि त्याप्रमाणे दि.४/५/२०१८ रोजी तक्रारकर्ती यांना लिखीत स्वरुपामध्ये कळविण्यात आले. त्यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.२ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. लेखी निवेदनामध्ये सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्या पतीचे निधन झाले. तक्रारकर्ती यांनी योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे अर्ज सादर केला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत तो विरुध्द पक्ष क्र.२ यांना प्राप्त झाला. तो दावा त्यांनी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे पाठविला. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.१ यांनी मयत व्यक्तीच्या नांवे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे दि.४/०५/२०१८ रोजीच्या पत्राद्वारे नामंजूर केला. विरुध्द पक्ष क्र.२ यांनी त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.३ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांचे कथन आहे की, मयत नवनाथ यांचा दि.२७/७/२०१७ रोजी अपघात झाला. लाभार्थ्याने दि.१३/९/२०१७ रोजी त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. तो विमा प्रस्ताव त्याच दिवशी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे पाठविलेला आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे.
(५) तक्रारकर्ती यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
निर्माण केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(२) तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. 1 व 2 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विमा कंपनीने अपघाती विमा संरक्षण दिल्याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत नवनाथ यांचा वाहन अपघातामध्ये डोक्यास इजा होऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मयत नवनाथ यांच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्यामार्फत विमा दावा दाखल केला असता विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दि.४/५/२०१८ रोजीच्या पत्राद्वारे अपघात हा मोटार सायकल चालविताना झालेला आहे व अपघातसमयी मृतकाकडे मोटार सायकल चालविण्याच्या वैध परवाना नाही, असे कारण देऊन विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते.
(७) विरुध्द पक्ष क्र.१ यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत नवनाथ यांच्याकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता; जो की करारातील अटी व शर्तीनुसार बंधनकारक आहे आणि त्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. उलटपक्षी तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत नवनाथ यांचा वाहन अपघातामध्ये मृत्यू झालेला असून विरुध्द पक्ष क्र.१ यांनी चूक कारण देऊन विमा दावा नामंजूर केलेला आहे. तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने ‘लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-४’, रिट पिटीशन नं.१०१८५/२०१५, निर्णय दि.६/३/२०१९ व मा. राज्य आयोग, महाराष्ट्र यांच्या प्रथम अपिल क्र.१००९/२००७ “आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ सिंधुबाई खंडेराव खैरनार”, निर्णय दि. ७/१/२००८ या निवाड्यांचा आधार घेतला आहे.
(८) ‘लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-4’ या न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता वाहन चालविण्याच्या परवान्याची मुदत संपुष्टात आलेली होती आणि त्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नव्हते. तसेच मयतास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झालेला होता आणि मयताचा दोष आढळून आलेला नव्हता. परंतु प्रस्तुत प्रकरणाच्या वस्तुस्थितीनुसार मयत नवनाथ याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असल्याचे तक्रारकर्ती यांचे कथन नाही आणि मयत नवनाथ हे स्वत: मोटार सायकलवरुन पडून अपघातामुळे मृत्यू पावले आहेत. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ती यांचेतर्फे दाखल करण्यात आलेल्या लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-4 या न्यायनिर्णयाचा अत्युच्च आदर ठेवून तो येथे लागू पडणार नाही, असे आम्ही नमूद करीत आहोत.
(९) “आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ सिंधुबाई खंडेराव खैरनार” हा न्यायनिर्णय पाहता त्यामध्ये सन २००५ च्या शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा उल्लेख आहे. तथापि प्रस्तुत प्रकरणामध्ये सन २०१७ मध्ये अपघाती घटना घडलेली आहे. विमा करार हे भिन्न असल्यामुळे तो न्यायनिर्णय येथे लागू पडणार नाही, असे आम्ही नमूद करतो.
(१०) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ती यांनी मयत नवनाथ यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.१ यांनी विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विरुध्द पक्ष क्र.१ यांनी चुकीचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला आहे. आमच्या मते, विमा दावा नामंजूर करण्याचे कृत्य चूक व अयोग्य आहे, हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्ती यांच्यावर येते. त्या अनुषंगाने मयत नवनाथ यांच्याकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना होता, असे तक्रारकर्ती यांचे कथन नाही. विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे विमा दाव्यासोबत किंवा जिल्हा आयोगाकडे प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी मयत नवनाथ यांचा वाहन चालविण्याचा वैध परवाना दाखल केलेला नाही.
(११) शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देण्याबद्दल शासन व विमा कंपनी यांच्यामध्ये यांच्यामध्ये झालेले विमा करारपत्र अभिलेखावर दाखल नसले तरी जिल्हा आयोगापुढे अशाप्रकारच्या दाखल झालेल्या प्रकरणांतील करारपत्राची न्यायिक दखल घेतली असता करारपत्रातील अट क्र.6 प्रमाणे जर मयत स्वत: वाहन चालवत असेल तर त्याचा वैध वाहन चालविण्याचा परवाना दाखल करणे आवश्यक आहे. त्या तरतुदीनुसार वाहन चालविण्याचा परवाना नसताना अपघात घडल्यास वाहन चालविणा-या चालक (Driver) शेतक-याव्यतिरिक्त इतर शेतकरी दाव्याकरिता पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
(१२) आम्हाला हे सुध्दा नमूद करावेसे वाटते की, मोटार वाहन कायद्याचे कलम 3 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीस तिला मोटार वाहन चालविण्यास प्राधिकार देणारे खुद्द तिला देण्यात आलेले परिणामक चालन लायसन धारण करीत असल्याशिवाय, तिला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन चालविता येणार नाही. याचाच अर्थ सार्वजनिक स्थळी वाहन चालविण्याकरिता कार्यक्षम (Effective) ड्रायव्हींग लायसेन्सची आवश्यकता वाहनचालकाकडे असणे गरजेचे आहे. तसेच वाहन अपघाताविषयी दावे निकाली काढण्याकरिता अट (VI) तरतूद विमा करारपत्रामध्ये समाविष्ट केलेली आहे. मयत नवनाथ यांच्याकडे अपघातसमयी मोटार सायकल चालविण्याचा वैध व कार्यक्षम वाहन परवाना नव्हता आणि त्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला असल्यास विमा कंपनीचे ते कृत्य सेवेतील त्रुटी ठरणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे.
(१३) विरुध्द पक्ष क्र.१ यांचेतर्फे विधिज्ञांनी असाही युक्तिवाद केला की, तक्रारीतील घटनेची तारीख २७/७/२०१७; घटनेबाबत पोलिसांना प्रथम माहिती अहवाल दिल्याची तारीख १३/८/२०१७; तसेच विमा दाव प्रस्ताव दाखल केल्याची तारीख १३/९/२०१७ व तक्रार दाखल केल्याची तारीख १३/७/२०१८ लक्षात घेता विमा करारातील घटनेबद्दल विरुध्द पक्ष क्र.१ यांना तात्काळ माहिती देणे अनिवार्य व बंधनकारक असताना तक्रारकर्ती यांनी त्या अटी व शर्तीचे अनुपालन केलेले नाही आणि तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खर्चासह नामंजूर होणे न्यायोचित आहे.
(१४) तक्रारकर्ती यांचेतर्फे अभिलेखावर महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय क्रमांक : शेअवि-२०१६/प्र.क्र.१८४/११-अे, दि.२५/११/२०१६ दाखल केला असून जो सन २०१६-१७ वर्षाकरिता राबविण्यात येणा-या विमा योजनेसंदर्भात आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की,
५. विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे, तसेच, योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी, योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत, तालुका कृषि अधिका-यांकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. शिवाय समर्थनीय कारणांसह ९० दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव सुध्दा स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. प्रस्ताव मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्तव विमा कंपनीचा विमा प्रस्ताव नाकारता येणार नाही.
६. विमा कंपनीला सुस्पट कारणांशिवाय विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपनीने नामंजूर केलेल्या विमा दाव्याप्रकरणी सुस्पष्ट कारणमीमांसा संबंधीत शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविणे व त्याची प्रत नियुक्त करण्यात आलेली विमा सल्लागार कंपनी / आयुक्त (कृषि) / संबंधीत विभागीय कृषि सहसंचालक / जिल्हा अधीक्षक कृषि अधिकार / तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे पाठविणे अनिवार्य आहे.
(१५) असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा विहीत मुदतीनंतर प्राप्त झाल्यामुळे त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशाप्रकारे सूचना केल्याचे दिसून येत नाही किंवा त्यांचे त्याप्रमाणे कथन नाही. इतकेच नव्हेतर विमा दावा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचे कारण समाधानकारक असल्यास विमा कंपनी तो विलंब क्षमापित करु शकते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.१ यांनी आपल्या लेखी निवेदनामध्ये घेतलेला उक्त बचाव योग्य व उचित ठरत नाही.
(१६) वरील विवेचनाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती ह्या विमा नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. अंतिमत: मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
ग्राहक तक्रार क्रमांक : २२९/२०१८.
आदेश
(१) तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(२) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-