जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : २२८/२०१८. तक्रार दाखल दिनांक : १३/०७/२०१८.
तक्रार निर्णय दिनांक : २५/०६/२०२१.
कालावधी : ०२ वर्षे ११ महिने १२ दिवस
गणेश तानाजी गायकवाड, वय २३ वर्षे,
रा. काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., ३२१/ए/२, ओसवाल बंधू समाज बिल्डींग
जे.एन. रोड, होटेल सेवन लव्हज् समोर, पुणे – ४११ ०४२.
(२) जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला, जायका बिल्डींग,
कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अजय दिलीपराव भिसे
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- जे.आर. शिंदे
विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.३ स्वत:
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ता यांच्या आई मयत सुनिता तानाजी गायकवाड (यापुढे “मयत सुनिता”) यांचे नांवे मौजे काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथे गट क्र.५६८, क्षेत्र १ हे. ८४ आर. शेतजमीन आहे. दि.७/३/२०१७ रोजी मयत सुनिता ह्या स्वत:च्या शेतामध्ये ज्वारी काढण्यासाठी गेल्या होत्या. परंतु दि.८/३/२०१७ रोजी शेतशेजारी अंबादास नारायणकर यांच्या विहिरीतील पाण्यामध्ये तरंगत असल्याच्या आढळून आल्या. घटनेबाबत चौकशी केली असता नंदकुमार उर्फ नाना नागनाथ मासाळ, रा. काटी यांनी मयत सुनिता यांचा गळा आवळून जिवे मारुन प्रेत विहिरीमध्ये टाकल्याचे आढळून आले. गुन्ह्याबाबत पोलीस ठाणे, तामलवाडी, ता. तुळजापूर येथे गु.र. नं.३५/२०१७ प्रमाणे नोंद झाली. मयत सुनिता ह्या शेतकरी असल्यामुळे व त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत रु.२,००,०००/- रक्कम मिळण्याकरिता दि.३/५/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दि.१६/११/२०१७ रोजीच्या पत्रानुसार मृताचा व्हिसेरा रिपोर्ट दाखल करण्याचे सूचित करुन विमा प्रस्ताव नाकारला. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी मयत सुनिता यांच्या विम्याची रक्कम रु.२,००,०००/- तक्रार दाखल तारखेपासून ९ टक्के व्याज दराने देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.१०,०००/- देण्याचा व रु.५,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांनी तक्रारीतील कथने अमान्य केली आहे. त्यांचे कथन आहे की, मयत सुनिता ह्या शेतकरी असल्याबाबत व तक्रारकर्ता हे वारस असल्याचे सिध्द करणे आवश्यक आहे. व्हिसेरा रिपोर्ट नसल्यामुळे तक्रार पुराव्याने सिध्द होऊ शकत नाही. मयत सुनिता यांनी आत्महत्या केली असेल असा शवविच्छेदन अहवाल असल्यामुळे तक्रारकर्ता हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
(3) विरुध्द पक्ष क्र.२ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ता यांच्या आईचे दि.८/३/२०१७ रोजी अपघाती निधन झाले. तक्रारकर्ता यांनी योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे दि.४/५/२०१७ रोजी अर्ज सादर केला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत तो विरुध्द पक्ष क्र.२ यांना दि.१२/८/२०१७ रोजी प्राप्त झाला. तो दावा त्यांनी दि.२४/१०/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे पाठविला. दावा विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे विचाराधीन आहे. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.३ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांचा विमा प्रस्ताव दि.४/५/२०१७ रोजी प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे पाठविलेला आहे.
(५) तक्रारकर्ता यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? होय.
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. 1 व 2 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेबाबत त्रिपक्षीय करारपत्र अभिलेखावर दाखल आहे. विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना दि.१/१२/२०१६ ते ३०/११/२०१७ कालावधीकरिता विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अपघाती मृत्यू व अपंगत्व याकरिता विमा संरक्षण दिलेले होते, ही बाब वादास्पद नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत सुनिता शेतकरी होत्या, हे स्पष्ट होते.
(७) अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत सुनिता गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(८) मयत सुनिता यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे विमा दावा दाखल केला, ही बाब विवादीत नाही. विरुध्द पक्ष क्र. १ यांचे दि.१६/११/२०१७ चे पत्र पाहता व्हिसेरा रिपोर्ट व पोलीस अंतिम अहवाल आवश्यक असल्याचे व ७ दिवसाचे आत कागदपत्रे न पाठविल्यास विमा संचिका बंद करण्यात येईल, असे कळविलेले आहे. त्रिपक्षीय करारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताचे प्रकार व त्याकरिता दाखल करावयाची कागदपत्रे नमूद केले आहेत. त्यामध्ये कलम – जी हे मनुष्यवधाबाबत आहे. मनुष्यवध असल्यास एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट, पोलीस फायनल रिपोर्ट; जेथे आवश्ययक असेल तेथे अशी कागदपत्रे नमूद आहेत. मनुष्यवधासंबंधी व्हिसेरा रिपोर्ट आवश्यक असल्याचे करारपत्रामध्ये नमूद नाही. तसेच पोलीस अंतिम अहवाल हा आवश्यकतेनुसार गरजेचा आहे. आमच्या मते, अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा हे मयत सुनिता यांचा मृत्यू हा मनुष्यवध असल्याचे स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. करारपत्रानुसार आवश्यक कागदपत्रांमध्ये व्हिसेरा रिपोर्टचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अंतिम अहवाल कोणत्या कारणास्तव व हेतुने आवश्यक आहे, याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दिलेले नाही. आमच्या मते, विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ता यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी केलेली आहे.
(९) शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात उदा. रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस अशा प्रकारच्या अपघातांमुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतक-यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देण्यामागे असणारा परोपकारी हेतू व त्यामागील सामाजिक बांधीलकी निदर्शनास येते.
(१०) तक्रारीतील वस्तुस्थिती पाहता सत्य (genuine) विमा दाव्याची रक्कम तांत्रिक कारण अमान्य करता येणार नाहीत. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ता यांना विमा रक्कम अदा न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ता हे विमा रक्कम रु.२,००,०००/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रार दाखल तारखेपासून विमा रकमेवर द.सा.द.शे. ८ टक्के व्याज मिळण्याकरिता तक्रारकर्ते पात्र ठरतात.
(११) तक्रारकर्ता यांना योग्यवेळी विमा रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागता, हे अमान्य करता येणार नाही. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे ग्राहक तक्रार दाखल करणे भाग पडले आणि त्यांना खर्च करावा लागला. त्या सर्वांचा विचार करुन तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकत्रितरित्या रु.१०,०००/- मंजूर करणे न्याय्य वाटते. मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.२,००,०००/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच दि.१३/७/२०१८ पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ८ टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. २२८/२०१८.
(३) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता रु.१०,०००/- द्यावेत.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाच्या आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/९४२१)