(पारीत व्दारा मा. श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां कडून विमा रक्कम मिळावी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अंतर्गत प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे मालकीचे मारुती अर्टीका वाहन असून त्याचा नोंदणी क्रं-MH-49/A.S.-1150 असा आहे. सदर वाहनाचे विम्याचा कालावधी हा दिनांक-17 जून, 1918 ते दिनांक-16 जून, 2019 असा होता आणि विम्याचा कालावधी संपत होता. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे कार्यरत कर्मचारी श्री रवी बैस याने तक्रारकर्त्यास कळविले होते की, वाहनाची मुदत संपत असून नुतनीकरण करावे लागेल, तक्रारकर्त्याने कर्मचारी श्री बैस याचेवर विश्वास ठेऊन त्याचे जवळ वाहनाचे नुतनीकरणासाठी कॅनरा बॅंक, शाखा भंडारा येथील धनादेश क्रं-962577, धनादेश दिनांक-28.06.2019 रक्कम रुपये-23,750/- चा प्रदान केला, त्यावेळी सदर कर्मचारी श्री बैस याचे सांगण्या वरुन ज्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खात्यात धनादेश जमा होणार होता तो रकाना रिकामा ठेवला. धनादेश निर्गमित केल्या नंतर एका आठवडयात विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी क्रं-3001/MH-765820/00/B00 मिळाली असून सदर विम्याचा कालावधी हा दिनांक-19 जून, 2019 ते दिनांक-18 जून, 2020 असा होता. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा पॉलिसी निर्गमित केलेली असल्यामुळे वाहन हे विमाकृत आहे असा समज होता. सहा महिन्याचे कालावधी नंतर सदर विमाकृत वाहनास अपघात झालेला असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी संपर्क साधला असता विमाकृत वाहन दुरुस्तीचे काम विमा कंपनीच करेल असे आश्वासन दिले त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरचे वाहन विमा कंपनीचे वर्कशाप Automative Manufactures Pvt. Ltd. कामठी रोड, नागपूर येथे पाठविले. दरम्यानचे काळात विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी व्दारे तक्रारकर्त्यास फोन वरुन कळविले की, तक्रारकर्त्याने विमा काढण्यासाठी जो नाव न टाकता रिकामा धनादेश दिलेला होता तो नावाचा रकाना रिकामा असल्यामुळे वटविल्या गेला नाही आणि त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीची वाहन दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी नाही. जेंव्हा की, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास वाहनाची विमा पॉलिसी सुध्दा दिली होती. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास या संबधात ई मेल व्दारे कळविले होते परंतु तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, 6 ते 7 महिन्याचा कालावधी मध्ये त्याला कुठलाही ई मेल आलेला नाही. तक्रारकर्त्यास त्याचे वाहन दुरुस्त झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी भंडारा ते नागपूर आणि नागपूर ते भंडारा प्रवास करावा लागला त्यासाठी त्याला रुपये-31,572/- खाजगी वाहनाने एवढा खर्च आला. तसेच तक्रारकर्त्यास स्वतः वाहनाचे दुरुस्तीचा खर्च रुपये-23,773/- करावा लागला. तक्रारकर्ता हा कापड व्यापारी असून त्याला व्यवसाया निमित्ताने वारंवार प्रवास करावा लागतो. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याने त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द पुढील मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला त्याचे वाहनास अपघात झाल्यामुळे दुरुस्ती संबधात विमा रक्कम रुपये-24,773/- देण्याचे आदेशित व्हावे आणि सदर रकमेवर दिनांक-01.01.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्त्यास त्याचे वाहन दुरुस्त झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी भंडारा ते नागपूर येथे जाण्या येण्या करीता जो खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला त्या खर्चा पोटी रुपये-31,572/- एवढी रक्कम विरुध्दपक्षांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्त्याने वाहनाचे विम्यासाठी जारी केलेला धनादेश क्रं-962577, धनादेश दिनांक-18.06.2019 रक्कम रुपये-23,750/- चा धनादेश विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी परत करण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- विरुध्दपक्षांनी व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी आपले लेखी उत्रा मध्ये असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 याचा वाहन विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी विरुध्दपक्ष क्रं 1 चा कुठलाही संबध नाही. दोन्ही विरुध्दपक्ष या वेगवेगळया कंपन्या आहेत. ग्राहकांना सुविधा व्हावी या दृष्टीने विरुध्दपक्ष क्रं 1 याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीला त्यांचे शोरुम मध्ये बसून ग्राहकांना विमा संबधी सेवा देण्याची परवानगी दिलेली आहे, त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 कुठलेही शुल्क आकारत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 किंवा त्याचे कुठल्याही कर्मचा-याने तक्रारकर्त्या कडून वाहनाचे विम्या संबधात कुठलाही धनादेश स्विकारलेला नाही, ते काम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 च्या कर्मचा-याने तक्रारकर्त्यास ज्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खात्यात धनादेश जमा होणार होता त्या धनादेशा मधील रकाना रिकामा ठेवायला सांगितला होता ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता स्वतःच्या निष्काळजीपणा बद्दलची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 1 वर टाकत आहे. तक्रारकर्त्याचे तक्रारी मध्ये तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा पॉलिसी जारी केली होती असे नमुद केलेले आहे, यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये व्यवहार झाला होता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे चुकीमुळे तक्रारकर्त्याने विम्यापोटी जारी केलेला धनादेश वटविल्या गेला नाही. तक्रारकर्त्याने विम्या संबधी कुठलेही शुल्क विरुध्दपक्ष क्रं 1 ला दिलेले नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 चा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने धनादेश ज्याचे नावाने दयावयाचा असतो तो रकाना रिकमा ठेवला असताना त्याने सदर धनादेश वटविल्या गेला किंवा कसे याची शहानिशा बॅंकेतून करणे आवश्यक होते. ज्याअर्थी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा प्रमाणपत्र जारी केले त्याअर्थी त्यांची विमा रक्कम देण्याची जबाबदारी येते. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करावी.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने वाहनाचे विम्या संबधी ज्या रवि बैस नामक व्यक्तीला धनादेश दिलेला आहे त्या रवि बैस व्यक्तीला सदर तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केलेले नाही म्हणून आवश्यक प्रतीपक्षाचे अभावी तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्ता याने स्वतःहून विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे वाहन दुरुस्ती करीता नेले, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये वाहन दुरुस्ती संबधात कोणतीही सुचना तक्रारकर्त्यास दिलेली नव्हती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडे कधीही विमा दावा दाखल केलेला नाही, तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती बाबत दाखल केलेली बिले सुध्दा बनावट व खोटी आहेत. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार खोटी व बनावटी असल्याने खारीज करण्यात यावी असे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे नमुद करण्यात आले.
05 तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 व विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी दाखल केलेले लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 1 आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांचा शपथेवरील पुरावा तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 चा लेखी युक्तीवाद, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे वकील श्रीमती सरीता भूरे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
.
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास वाहनाचे दुरुस्ती संबधात विम्याची रक्कम नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते काय? | -नाही- |
2 | विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्ती व विक्री करणा-या कपंनीने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
3 | काय आदेश? | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते 3-
06. प्रस्तुत तक्रारी मधील विवादातील महत्वाचा मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मालकीचे मारुती अर्टीका वाहन असून त्याचा नोंदणी क्रं-MH-49/A.S.-1150 असा आहे, त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे कार्यरत कर्मचारी श्री रवी बैस याचे जवळ वाहनाचे नुतनीकरणासाठी कॅनरा बॅंक, शाखा भंडारा येथील धनादेश क्रं-962577, धनादेश दिनांक-28.06.2019 रक्कम रुपये-23,750/- चा प्रदान केला होता, त्यावेळी सदर कर्मचारी श्री बैस याचे सांगण्या वरुन ज्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खात्यात धनादेश जमा होणार होता तो रकाना रिकामा ठेवला होता. धनादेश निर्गमित केल्या नंतर एका आठवडयात विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी क्रं-3001/MH-765820/00/B00 मिळाली असून सदर विम्याचा कालावधी हा दिनांक-19 जून, 2019 ते दिनांक-18 जून, 2020 असा होता. सहा महिन्याचे कालावधी नंतर सदर विमाकृत वाहनास अपघात झालेला असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी संपर्क साधला असता विमाकृत वाहन दुरुस्तीचे काम विमा कंपनीच करेल असे आश्वासन दिले होते त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरचे वाहन विरुध्दपक्ष कं 2 विमा कंपनीचे वर्कशाप , विरुध्दपक्ष क्रं 1 Automative Manufactures Pvt. Ltd. कामठी रोड, नागपूर येथे पाठविले. दरम्यानचे काळात विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीव्दारे तक्रारकर्त्यास फोन वरुन कळविले की, तक्रारकर्त्याने विमा काढण्यासाठी जो नाव न टाकता रिकामा धनादेश दिलेला होता तो नावाचा रकाना रिकामा असल्यामुळे धनादेश वटविल्या गेला नाही आणि त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीची वाहन दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी नाही असे सांगितले.
07. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता व वाहन दुरुस्त करणा-या कंपनीने तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीने तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये उल्लेख केलेला कर्मचारी श्री रवि बैस याचे नावाचा कोणताही उल्लेख लेखी उत्तरा मध्ये केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता व वाहन दुरुस्ती करणा-या कंपनीने लेखी उत्तरा मध्ये त्यांचे शोरुम मध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी वाहनाचे विम्याचा व्यवसाय करते ही बाब मान्य केलेली आहे.
08. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, या सर्व प्रकारा मध्ये तक्रारकर्त्याची सुध्दा चुक दिसून येते याचे कारण असे की वाहनाचे विम्या संबधी धनादेश निर्गमित करताना ज्याचे नावे धनादेश देण्यात येतो तो धनादेशाचा रकाना रिकामा ठेऊन धनादेश कर्मचारी श्री रवि बैस याचे जवळ दिला. असा धनादेश दिल्या नंतर तो बॅंकेतून वटविल्या गेला किंवा कसे या बाबतची शहानिशा करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची होती परंतु तसे तक्रारकर्त्याने केलेले नाही. असेही दिसून येते की, तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता व दुरुस्त करणा-या कंपनीचा कर्मचारी श्री रवि बैस याचे संबधात जे विधान केलेले आहे, त्या संबधात सदर कर्मचारी श्री रवि बैस यास प्रस्तुत तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केलेले नाही.
09. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता व दुरुस्ती करणारी कंपनीने आपले युक्तीवादाचे समर्थनार्थ मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग, नवि दिल्ली यांनी 2015 SCC Online NCDRC 1589 या ठिकाणी प्रकाशित झालेल्या “Unit Trust of India and Others –Versus-The consumer Rights Society and another ” या प्रकरणात दिनांक-27 जानेवारी, 2015 रोजी पारीत केलेल्या अपिलीय निवाडयावर ठेवली. सदर निवाडया प्रमाणे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी नुतनीकरणासाठी जो धनादेश यु.टी.आय. यांचे जवळ दिला होता तो धनादेश वटविल्या गेला किंवा कसे याची माहिती बॅंके मधून घेतली नाही आणि सदर धनादेश वटविल्या गेला नसलयाने तक्रारकर्त्याने ही बाब बॅंके मधून माहिती झाल्या नंतर यु.टी.आय. यांना देणे आवश्यक होते आणि योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्त्याने असे काहीही केले नाही, अशापरिस्थितीत यु.टी.आय. यांनी तक्रारकर्त्याची पॉलीसी रद्द करण्याची कृती ही दोषपूर्ण सेवे मध्ये मोडत नाही. परंतु यु.टी.आय. यांनी सुध्दा तक्रारकर्त्यास त्याने दिलेला धनादेश वटविल्या गेला नाही असे तक्रारकर्त्यास कळविले नाही. अशा परिस्थितीत यु.टी.आय. पॉलिसीची रक्कम देण्यास जबाबदार नाही मात्र तक्रारकर्त्याने पॉलिसीपोटी दिलेला धनादेश वटविल्या गेला नाही ही बाब तक्रारकर्त्यास न कळविल्यामुळे त्याला जो मानसिक त्रास झाला त्याची नुकसान भरपाई याचीकाकर्ता यु.टी.आय. यांनी तक्रारकर्त्याला देण्याचा मा. राज्य ग्राहक आयोगाचा आदेश कायम ठेवला.
10. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याचे मालकीचे वाहनास अपघात झाल्या नंतर त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे म्हणण्या प्रमाणे वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सदरचे कथन हे नामंजूर केलेले असून त्यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी तक्रारकर्त्यास वाहन दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 कडे वाहन दुरुस्त करावे असे सांगितले नव्हते तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये कोणताही विमा दावा दाखल केलेला नाही.
11 विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे विधान असे आहे की तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये विमा दावाच दाखल केलेला नाही हे म्हणणे तक्रारकर्त्याने खोडून काढलेले नाही व त्या संबधात प्रतीउत्तर सुध्दा दाखल केलेले नाही किंवा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये विमा दावा दाखल केला होता या संबधात कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही तसेच विमा दाव्या संबधी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी केलेला कोणताही पत्रव्यवहार पुराव्या दाखल सादर केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने ज्याअर्थी तक्रारकर्त्याचे वाहनाची विमा पॉलिसी जारी केली, त्याअर्थी तक्रारकर्त्याचा धनादेश वटविल्या गेला नसेल तर त्याची सुचना तक्रारकर्त्यास लेखी देणे आवश्यक होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सुध्दा तक्रारकर्त्याने वाहनाचे विम्या संबधात दिलेला धनादेश वटविल्या गेला नाही या संबधात तक्रारकर्त्यास लेखी सुचना दिल्या बाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: अंतीम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री कमल टेकचंद वाधवानी यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ऑटोमॅटीव्ही मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं 2 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्द योग्य त्या पुराव्या अभावी खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- सर्व पक्षकारांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
- सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.