जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 27/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 24/01/2023.
तक्रार दाखल दिनांक : 23/03/2023. तक्रार निर्णय दिनांक : 03/06/2024.
कालावधी : 01 वर्षे 04 महिने 10 दिवस
श्री. पांडुरंग मारोती गवळी, वय 67 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. धडकनाळ, पो. टाकळी (वा.), ता. उदगीर, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) ए.पी.एस.डी. सिडस. इंडिया प्रा. लि., लातूर.
जुनी एम.आय.डी.सी., दुध डेअरीच्या समोर, लातूर - 413512.
(2) तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ म.,
उदगीर, जिल्हा लातूर - 413 517. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही. एस. बिरादार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एल. डी. पवार
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. आर. सोनी
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, धडकणाळ, पो. टाकळी येथे त्यांची वडिलोपार्जीत शेतजमीन असून त्याचा सर्वे व गट क्रमांक 2/1 व 10/5 आहे. दि.15/6/2021 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे उत्पादीत सोयाबीन बियाणे जे.एस.335 च्या 10 पिशव्या विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून रु.30,000/- मुल्य देऊन खरेदी केल्या. त्यांनी बियाण्याची पेरणी केली; परंतु बियाण्याची उगवण झाली नाही. त्यांनी तक्रार केली असता पाहणी करण्यात आली. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या सूचनेनुसार त्यांनी दि.3/7/2021 रोजी दुबार पेरणी केलेली आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने मशागत, बियाणे, वाहतूक, खते, पेरणी, दुबार पेरणी, अपेक्षीत उत्पन्न, मानसिक त्रास व ग्राहक तक्रार खर्च इ. करिता एकूण रु.5,42,500/- नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, त्यांनी विक्री केलेल्या सोयाबीन 335 वाणाच्या बियाण्याची दुस-या शेतक-यांकडून तक्रार आलेली नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या पंचनाम्यास आक्षेप घेऊन बियाणे निरीक्षकांनी नियमानुसार कार्यवाही केली नसल्याचे नमूद केले. त्यांच्या कथनानुसार बियाण्याच्या उगवणशक्तीवर अनेक बाबींचा परिणाम होत असतो. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेले बियाणे खरेदी करुन विक्री केलेले आहे. बियाण्यातील दोषाबद्दल ते जबाबदार नाहीत. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करावी, अशी विनंती केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेले बियाणे
सदोष असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे उत्पादीत सोयाबीन जे.एस. 335 बियाणे खरेदी केले, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी बियाण्याची पेरणी केल्यानंतर त्याची उगवण न झाल्यामुळे केलेल्या तक्रारीनुसार बियाणे निरीक्षकांनी क्षेत्रीय भेट देऊन अहवाल व निष्कर्ष मांडणारा अहवाल दिलेला आहे. अहवालामध्ये काही क्षेत्रामध्ये दुबार पेरणी केल्याचे नमूद करुन बियाणे सदोष नसल्याचा निष्कर्ष नोंदविल्याचे दिसून येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी त्याच अहवालाचा आधार घेऊन नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांनी दुबार पेरणी केलेली असून ज्यावेळी बियाण्याचे पाहणी करण्यात आली, त्यावेळी वादकथित बियाण्याद्वारे करण्यात आलेल्या पेरणीची स्थिती अस्तित्वात नव्हती. कागदोपत्री पुरावे व वाद-तथ्ये पाहता वादकथित बियाण्यांमध्ये दोष होता, हे सिध्द होत नाही आणि वादकथित बियाण्यांमध्ये दोष होता, या सिध्दतेकरिता अभिलेखावर पुरावा नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे उत्पादीत बियाणे सदोष असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरत नाहीत. करिता, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-