::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष. )
(पारीत दिनांक–30 डिसेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष कार डिलरचे विरुध्द सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष डिलर कडून टाटा इंडीगो ही कार दिनांक-14/02/2012 रोजी खरेदी केली होती. विरुध्दपक्ष हा टाटा कंपनी निर्मित वाहनांचा अधिकृत विक्री डिलर आहे. गाडी विकत घेतल्याच्या एक महिन्या नंतर गाडीमध्ये एकाएकी समस्या निर्माण व्हावयाला सुरुवात झाली. गाडीचा क्लच दाबल्या नंतर अचानक ती बंद पडायची तसेच डॅश बोर्ड मधून आवाज येत होता आणि गाडी चालविताना संपूर्ण गाडीमध्ये कंपन निर्माण होत होता, अशा प्रकारच्या समस्या गाडी मध्ये सुरु झाल्यात. गाडी सर्व्हीसिंगला टाकल्या नंतर त्या समस्या काही काळ दुर व्हावयाच्या परंतु पुन्हा काही दिवसा नंतर गाडी मध्ये त्याच समस्या निर्माण होत होत्या, त्याने ब-याच वेळा ती गाडी सर्व्हीसिंगला टाकली. सतत उदभवणा-या समस्यांमुळे तक्रारकर्त्याला संशय आल्याने त्याने सदर गाडीची सर्व्हीस हिस्टरी शिट तपासणी साठी विरुध्दपक्षाशी संपर्क साधला असता त्याला माहिती पडले की, सदर गाडी तक्रारकर्त्याच्या अगोदर अमीत टावरी नावाच्या व्यक्तीच्या नावावर होती. सदर गाडी त्याच्या पूर्वी अमीत टावरीने वापरल्याचे निदर्शनास आले. विरुध्दपक्षाने अशा प्रकारे त्याचेशी धोखाघडी केली आणि सेवेमध्ये कमतरत ठेवल्यामुळे त्याने ही तक्रार दाखल करुन अशी विनंती केली की, विरुध्दपक्षाने त्याने गाडीच्या खरेदीपोटी अदा केलेली संपूर्ण रक्कम रुपये-5,17,802/- वार्षिक-18% दराने व्याजासह परत करावी. तसेच झालेल्या मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
03. विरुध्दपक्ष कार डिलरने आपला लेखी जबाब सादर करुन असा आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने केवळ गाडीच्या खरेदीपोटी दिलेली रक्कम परत मागितली आहे आणि त्यासाठी तक्रारकर्त्याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे गरजेचे आहे, सबब ही तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच तक्रारकर्त्याने गाडीत निर्मिती दोष (Manufacturing defects) असल्या बद्दल लिहिले आहे. विरुध्दपक्ष हे गाडीचे निर्माते नसून ते केवळ विक्रेता आहेत, म्हणून गाडीची निर्माता कंपनी (Manufacturing Company) मे.टाटा मोटर्स यांना तक्रारीत सामील करणे गरजेचे होते परंतु त्यांना तक्रारीत प्रतिपक्ष न बनविल्याने ही तक्रार “Non-Joinder of necessary parties” या तत्वा नुसार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने त्याचे कडून ती गाडी विकत घेतली होती हे मान्य करुन त्यामध्ये सुरुवाती पासूनच काही समस्या निर्माण झाल्यात हा आरोप नाकबुल केला. गाडी सर्व्हीसिंगला आणताना तक्रारकर्त्याने तो म्हणतो त्या प्रमाणे कुठलीही वाहनातील दोषा संबधी तक्रार केली नव्हती. तसेच ती गाडी पूर्वी अमीत टावरीचे नावावर होती आणि जुनी वापरलेली गाडी तक्रारकर्त्याला विकली हे सुध्दा नाकबुल करण्यात आले. सबब ही तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षाने केली.
04. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत वाहनाचे आर.सी.बुक, गाडीची इन्व्हाईस, इन्शुरन्स कव्हर नोट, टॅक्स इन्व्हाईस, डेबीट नोट व्हाऊचर,सर्व्हीस डिटेल्स प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच प्रतीउत्तर दाखल केले.
05. विरुध्दपक्षाने लेखी उत्तरा सोबत गाडीची सर्व्हीस हिस्ट्री संबधीचा दस्तऐवज दाखल केला.
06. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री हेमके तर विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री देवरस यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर आणि उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केल्या नंतर अतिरिक्त ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष::
07. तक्रारीतील मजकूर पाहता, तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार गाडीतील निर्मित दोष (Manufacturing defects) आणि जुनी गाडी विकल्या संबधीची आहे. गाडीतील निर्मित दोषा संबधीचा विचार करता तक्रारकर्त्याला गाडीच्या निर्माता कंपनीला (Manufacturing Company) मे.टाटा मोटर्स या कंपनीला तक्रारीत प्रतिपक्ष बनविणे जरुरीचे होते. तसेच गाडीतील उदभवलेल्य समस्या या निर्मित दोषा संबधीच्या होत्या या संबधी विशेष तज्ञांचा अहवाल (“Expert opinion”) किंवा इतर कुठलाही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. इतकेच नव्हे तर, गाडी सर्व्हीसिंगचे वेळी तयार केलेल्या जॉब कॉर्डसच्या प्रती सुध्दा त्याने दाखल केलेल्या नाहीत. अशाप्रकारे केवळ तक्रारीतील विधानां शिवाय असा कुठलाही पुरावा किंवा दस्तऐवज तक्रारकर्त्याने दाखल केलेले नाहीत, ज्यावरुन गाडी मध्ये निर्मिती दोष होता या आरोपाला बळकटी मिळू शकेल.
08. उलटपक्षी, विरुध्दपक्षाने त्या गाडीची सर्व्हीस हिस्टरी शिट दाखल केली आहे, ज्या वरुन असे दिसते की, तक्रारकर्ता म्हणतो त्या सारख्या समस्या त्या गाडीमध्ये नव्हत्या. गाडीच्या सर्व्हीस हिस्टरी वरुन हे पण दिसून येते की, ती गाडी विकत घेतल्या पासून 04 महिन्या मध्ये 10,000 किलो मीटरच्या वर चाललेली होती आणि एकदा ती गाडी अपघातग्रस्त पण झाली होती, त्या गाडीचा वापर जास्त मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसून येते, त्यामुळे गाडीमध्ये साधारण “Wear & Tear” होण्याची शक्यता फेटाळता येत नाही. तक्रारकर्त्याच्या वकीलानां जेंव्हा आम्ही विचारले की तक्रारकर्त्याची नेमकी तक्रार काय आहे, तेंव्हा त्यांनी सांगितले की, ही तक्रार गाडीतील निर्मित दोषा संबधीची नसून, जुनी वापरलेली आणि सदोष गाडी विकल्या संबधीची आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत गाडीतील निर्मित दोषा संबधीची तक्रार केवळ गाडी विक्रेत्या विरुध्द विचारात घेतल्या जाऊ शकत नाही, जो पर्यंत गाडीच्या निर्माता कंपनीला या तक्रारीत प्रतिपक्ष बनविल्या जात नाही, परिणामतः या कारणास्तव ही तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी खारीज होण्यास पात्र आहे.
09. तक्रारकर्त्याची दुसरी तक्रार अशी आहे की, त्याला विरुध्दपक्षाने जुनी वापरलेली गाडी विकत दिली आणि त्यासाठी तक्रारकर्ता दस्तऐवज क्रं-7 वर आपली भिस्त ठेवीत आहे, या दस्तऐवजा मध्ये तक्रारकर्त्याचे गाडीचा नोंदणी क्रमांक आणि अमीत टावरी या ईसमाचे नाव लिहिलेले आहे, हा दस्तऐवज गाडीच्या सर्व्हीस डिटेल्स संबधी असल्याचे दिसते परंतु नेमका हा कुठल्या प्रकारचा दस्तऐवज आहे अणि तक्रारकर्त्याने तो कोठून मिळविला या संबधीचे स्पष्टीकरण दिलेले नाही, हा दस्तऐवज एक संगणकीय प्रत (Computerized document) आहे, त्याशिवाय थोडया वेळ करीता असे गृहीत धरले की, सदर्हू गाडी अमीत टावरी या ईसमाचे नावाने होती, तरी या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, त्या गाडीवर अमीत टावरीचे नाव दिनांक-05/03/2012 ते दिनांक-04/06/2012 या अवधी मध्येच लागल्याचे दिसून येते. महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने ती गाडी दिनांक-04/02/2012 ला खरेदी केली होती, म्हणजेच अमीत टावरीचे नावाने ती गाडी ज्या तारखेला लागलेली दिसून येते, त्याचे पूर्वीच तक्रारकर्त्याने ती विकत घेतली होती. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की, तक्रारकर्त्याच्या पूर्वी ती गाडी अमीत टावरीचे नावाने नोंदणीकृत झाली होती आणि वापरलेली गाडी तक्रारकर्त्याला विकत देण्यात आली होती, त्यामुळे या दस्तऐवजाला किती महत्व द्दायचे हा प्रश्न निर्माण होतो तसेच त्या दस्तऐवजावर कोणत्याही कंपनीचा किंवा कार्यालयाचा शिक्का किंवा कोणाची सही नाही आणि ती एक संगणकीय प्रत(Computerized document) आहे आणि ती प्रत कुठून उपलब्ध झाली या बद्दल कुठलाही खुलासा नसल्याने हा दस्तऐवज विचारात घेता येऊ शकत नाही आणि या दस्तऐवजा वरुन तक्रारकर्त्याची तक्रार सुध्दा सिध्द होत नाही. या दस्तऐवजा व्यतिरिक्त ती गाडी वापरलेली होती या संबधीचा इतर कुठलाही दस्तऐवज पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केला नाही. आम्ही तक्रारकर्त्याला त्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफीकेट अमीत टावरीचे नावाने असल्या बद्दलचे दस्तऐवज दाखल करण्यास पुरेशी संधी दिली होती परंतु तक्रारकर्ता तसा कुठलाही दस्तऐवज दाखल करु शकल नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्याला वापरलेली सदोष गाडी विकली या संबधीचा कुठलाही सबळ पुरावा या प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केला नसल्याने ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री निलेश केशव फुंडे यांची, विरुध्दपक्ष ए.के.गांधी कारस, शाखा ग्रेट नगर रोड, उंटखाना, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी खारीज करण्यात येते.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.