न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे इमारत बांधकाम व विकसन करण्याचा स्वयंम व्यवसाय करतात. तक्रारदार यांना सर्व्हे नं.148/3, शाहुनगर, गोडोली, सातारा येथे बांधत असलेल्या अजिंक्य पुष्प या इमारतीसाठी इलेवेटर/लिफ्ट सेवा-सुविधा बसविणेची होती. जाबदार यांचा इलेव्हेटर बसविण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदारांनी जाबदारांशी असलेला पूर्वपरिचय व जाबदारांची कामासाठीची विनंती याचा विचार करुन तक्रारदाराने जाबदार यांना लिफ्ट बसविण्याचे काम देण्याचे निश्चित केले. त्याबाबत आवश्यक तो करार जाबदार यांनी तक्रारदारास लिहून दिला. सदरचे कामाची रक्कम रु. 5,90,000/- इतकी निश्चित करण्यात आली. त्याप्रमाणे तक्रारदाराने जाबदारास सातारा बॅंकेवरील चेक नं.48023 ने ता.21/04/2016 रोजी रु.1,00,000/- तसेच सारस्वत बॅंक शाखा सातारा येथून ता.27/05/2016 व 30/09/2016 रोजी अनुक्रमे चेक क्र. 48044 व 58532 ने प्रत्येकी रु.2,00,000/- तसेच दि.18/10/2019 रोजी दि विश्वेश्वर सहकारी बॅंक, शाखा सातारा यावरील चेक क्र. 14934 ने रक्कम रु.60,000/- असे एकूण रक्कम रु.5,60,000/- अदा केले आहेत. परंतु जाबदार यांनी सदरचे काम अतिशय दिरंगाईने केले आहे. जाबदारांनी कोणतेही काम योग्य वेळेत केले नाही. तसेच अर्धवट काम केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना त्याठिकाणचे सदनिका धारकांकडून नाहक त्रासास सामोरे जावे लागले आहे. जाबदारांनी केलेले काम योग्य दर्जाचे, करारातील ठरलेल्या प्रत, दर्जा तसेच मानांकनाप्रमाणे केलेले नाही. नाईलाजास्तव तक्रारदारांना सदरचे काम दुसरीकडून पूर्ण करुन घेणे भाग पडले आहे. तक्रारदारांच्या साईटवर जाबदारांनी सेफ्टी स्पीड गवर्नर बसविलेला नव्हता, साईटचे लायसेन्स चुकीचे दिले आहे. ए.आर.डी. बसविलेली नाही, लिफ्टसाठीचे सेफ्टी कीट बसविलेले नाही. इतर कामाचा खर्च रु. 60000/- करुन ती कामे तक्रारदारांनी दुसरीकडून पूर्ण करुन घेतलेली आहे. त्याचा वाढीव खर्च रु.30,000/- झालेला आहे. सदरचे रु.30,000/- देणेचे जाबदारांनी कबूल केले होते. लायसेन्सचे काम जाबदारांनी पूर्ण करुन दिलेले नाही. लिफ्ट बसविल्यानंतर त्याची सुरक्षा, वापराचा परवाना, त्याचे सुरक्षा परीक्षण व त्याअनुषंगिक बाबी पूर्ण न करता सेवेत त्रुटी निर्माण केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, जाबदार यांनी एक महिन्यात तातडीने पूर्तता करुन त्याचे सुरक्षा परीक्षण, वापराचा परवाना व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करुन द्यावी, तक्रारदाराने बाहेरुन काम करुन घेतले त्याचे जादा खर्चाचे रु.30,000/- मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- मिळावी व अर्जाचा खर्च रु.25,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत जाबदार यांचे पत्र, टॅक्स इन्व्हॉईस, तक्रारदार यांनी जाबदार यांना अदा केलेल्या रकमांचा तपशील, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या करारासोबतचे अपेंडीक्स, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार यांचेवर होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी म्हणणेही दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून लिफ्टबाबतच्या अपूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करुन मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही. |
4 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून जादा खर्चाचे रु.30,000/- तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | नाही. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार हे इमारत बांधकाम व विकसन करण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांना सर्व्हे नं.148/3, शाहुनगर, गोडोली, सातारा येथे बांधत असलेल्या अजिंक्य पुष्प या इमारतीसाठी इलेवेटर/लिफ्ट सेवा-सुविधा बसविणेची होती. जाबदार यांचा इलेव्हेटर बसविण्याचा व्यवसाय आहे. सबब, तक्रारदाराने जाबदार यांना लिफ्ट बसविण्याचे काम देण्याचे निश्चित केले. त्याबाबत आवश्यक तो करार जाबदार यांनी तक्रारदारास लिहून दिला. सदर करारासोबतचे अपेंडीक्स ए-2 व ए-3 यांच्या प्रती तक्रारदाराने याकामी दाखल केल्या आहेत. सदर कामासाठी तक्रारदाराने जाबदार यांना दिलेली रक्कम रु.5,00,000/- च्या तपशीलाबाबत जाबदार यांचे लेजर अकाऊंटचा तपशील तक्रारदारांनी दाखल केला आहे. जाबदार यांनी याकामी हजर होवून सदरच्या बाबी व कागदपत्रे नाकारलेली नाहीत. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे व तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेल्या नोटीशीचे अवलोकन करता, असे दिसून येते की तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सर्व्हे नं.148/3, शाहुनगर, गोडोली, सातारा येथे बांधत असलेल्या अजिंक्य पुष्प या इमारतीसाठी इलेवेटर/लिफ्ट सेवा-सुविधा बसविणेबाबत करार झाला होता व त्यानुसार तक्रारदार यांनी जाबदार यांना काही रक्कमही अदा केलेली आहे. तक्रारदारांचे कथनानुसार, जाबदारांनी कोणतेही काम योग्य वेळेत केले नाही, तसेच अर्धवट काम केलेले आहे. जाबदारांनी केलेले काम योग्य दर्जाचे, करारातील ठरलेल्या प्रत, दर्जा तसेच मानांकनाप्रमाणे केलेले नाही. नाईलाजास्तव तक्रारदारांना सदरचे काम दुसरीकडून पूर्ण करुन घेणे भाग पडले आहे. तक्रारदारांच्या साईटवर जाबदारांनी सेफ्टी स्पीड गवर्नर बसविलेला नव्हता, साईटचे लायसेन्स चुकीचे दिले आहे. ए.आर.डी. बसविलेली नाही, लिफ्टसाठीचे सेफ्टी कीट बसविलेले नाही. इतर कामाचा खर्च रु. 60000/- करुन ती कामे तक्रारदारांनी दुसरीकडून पूर्ण करुन घेतलेली आहे. त्याचा वाढीव खर्च रु.30,000/- झालेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या युक्तिवादात सदर खर्चाची योग्य ती पावती जोडल्याचे कथन केले आहे. परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही पावती मे.आयोगात दाखल केलेली नाही. तसेच लायसेन्सचे काम जाबदारांनी पूर्ण करुन दिलेले नाही. लिफ्ट बसविल्यानंतर त्याची सुरक्षा, वापराचा परवाना, त्याचे सुरक्षा परीक्षण व त्याअनुषंगिक बाबी पूर्ण न करता सेवेत त्रुटी निर्माण केली आहे असे तक्रारदारांचे कथन आहे. परंतु सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वास्तविक पाहता, जाबदारांनी केलेले काम अर्धवट असल्यास तसेच बांधकामामध्ये त्रुटी असल्यास तक्रारदारांनी शासनमान्य तज्ञ इंजिनिअर मार्फत सदरचे कामाची पाहणी करुन त्याचा अहवाल व शपथपत्र याकामी दाखल करणे आवश्यक होते. परंतु तसा कोणताही प्रयत्न तक्रारदारास संधी असूनही त्याने केल्याचा दिसून येत नाही. तक्रारदाराने जे जादा काम करुन घेतले, त्याचा सविस्तर तपशील दाखल केलेला नाही. याबाबतची कोणतीही बिले दाखल केलेली नाहीत.
8. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जासोबत कागदयादी क्र.1 ला जाबदार यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदर पत्रानुसार जाबदार यांनी तक्रारदार यांना लिफ्टचे काम पूर्ण करुन दिलेबाबत कथन दिसून येते. मात्र तक्रारदार यांनी लिफ्टचे काम अपूर्ण असलेबाबत कोणताही ठोस पुरावा आयोगासमोर दाखल केलेला नाही.
9. तसेच तक्रारदारांनी उभय पक्षांमध्ये झालेल्या कराराची मूळ प्रत दाखल केलेली नाही. केवळ अपेंडीक्स ए-2 व ए-3 यांच्या प्रती तक्रारदाराने याकामी दाखल केल्या आहेत. त्यामुळे करारातील संपूर्ण अटी व शर्ती या आयोगासमोर आलेल्या नाहीत. तक्रारदाराने त्यांचे तक्रारअर्जात केलेली कथने ही केवळ मोघम स्वरुपाची आहेत. सदर कथनांचे पुष्ठयर्थ कोणताही ठोस पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब, कोणत्याही ठोस पुराव्याअभावी तक्रारदारांचे कथनांवर विश्वास ठेवता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदारांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
10. जाबदारांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नसलेने तक्रारदार हे जाबदार यांचेकडून लिफ्टबाबतच्या अपूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करुन मिळण्यास पात्र नाहीत तसेच जादा खर्चाचे रु.30,000/- तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.