निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार क्र. 1 गजानन पि. रघुनाथ निळकंठवार हा पाटोदा ता. किनवट जि. नांदेड येथील रहिवाशी आहे. अर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार 3 यांच्याकडून एक एल.जी. कंपनीचा एल.ई.डी. टी.व्ही. मॉडेल नं. 32एलएन5110 रु.25,000/- ला विकत घेतला. गैरअर्जदार यांनी अर्जदार नं. 1 यांना पावती क्र. 763 ची दिली. अर्जदार क्र. 1 यांनी सदर टी.व्ही. गैरअर्जदार क्र. 2 यांना भेट देण्यासाठी विकत घेतलेला होता. सदर टी.व्ही. खरेदी करतेवेळी गैरअर्जदार यांनी 1 वर्षाची वॉरंटी असल्याचे सांगितले होते. तसेच वॉरंटी कार्ड सुध्दा अर्जदार क्र. 1 यांना दिलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यानी सदरील टी.व्ही. अर्जदार क्र. 2 यांना भेट म्हणून दिला. गैरअर्जदार क्र. 2 यांच्या घरी सदर टी.व्ही. 5 महिने व्यवस्थीत चालता परंतू त्यानंतर सदर टी.व्ही.मध्ये वॉरंटी काळातच अचानकपणे आडवी रेषा येण्यास सुरुवात झाली होती व त्यात चित्र दिसेनासे झाले म्हणून अर्जदार यांनी सदर टी.व्ही. गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दिनांक 13/05/2014 रोजी दुरुस्तीसाठी नेला. गैरअर्जदार 2 यांनी सदर टी.व्ही. दुरुस्तीसाठी ठेवून घेतला व त्याबाबत रशीद दिली आणि 7 दिवसात टी.व्ही. दुरुस्ती करुन देण्याची हमी दिली. 7 दिवसानंतर अर्जदार गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे गेला असता सदर टी.व्ही. दुरुस्ती करण्यासाठी आणखी 14,000/- रुपये दया असे सांगितले आणि टी.व्ही. परत देण्यास नकार दिला. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकार कळविला परंतू त्यांनीही अर्जदारांना कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही व त्यांनी देखील अर्जदारांना 14,000/- देण्यास सांगितले. सदर टी.व्ही. मध्ये वॉरंटी काळात बिघाड झालेली असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचे कर्तव्य आहे की, टी.व्ही. दुरुस्ती करुन देणे परंतू गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हे अर्जदारास सदर टी.व्ही. दुरुस्ती करुन देत नाहीत व अर्जदाराकडून 14,000/- रुपयाची बेकायदेशीर मागणी करीत आहेत. असे करुन गैरअर्जदार हे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करीत आहेत व अर्जदार यांना सेवा त्रुटी देत आहेत. त्यामुळे अर्जदारांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे व याला गैरअर्जदार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार यांनी सदर टी.व्ही. ची रक्कम रु.25,000/- दि. 08/11/2013 पासून 18 टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश करावा किंवा सदर टी.व्ही. बदलून देण्याचा आदेश गैरअर्जदार यांना करावा. गैरअर्जदार यांनी दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व तक्रार खर्च रु. 5,000/- अर्जदारास गैरअर्जदार यांच्याकडून देण्याचा आदेश करावा.
गैरअर्जदार 1 व 2 यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर ते आपल्या वकिलामार्फत हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार 1 व 2 हे अर्जदाराच्या तक्रारीतील काही भाग नाकारतात. गैरअर्जदार क्र. 3 हा गैरअर्जदार क्र. 1 यांचा कायदेशीर अधिकृत विक्रेता आहे किंवा नाही यांचा सबळ पुरावा अर्जदाराने दिलेला नाही. अर्जदाराने पावती क्र. 763 गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केलेली नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांचे गैरअर्जदार क्र. 3 हे अधिकृत डिलर आहेत किंवा नाही हे सांगता येत नाही. गैरअर्जदार क्र. 1 हे एल.जी. कंपनीस जबाबदार आहेत व गैरअर्जदार क्र. 2 हे कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदर टी.व्ही. 5 महिने चांगला चालला असे अर्जदार स्वतः म्हणतो. त्यानंतर वॉरंटी कार्डमध्ये दिलेले नियम व अटी प्रमाणे विदयुत कनेक्शनमध्ये विदयुत प्रवाह बरोबर नसल्यास टी.व्ही. मध्ये बिघाड होवू शकतो. त्यास कंपनी किंवा दुरुस्ती केंद्राचा मालक मुळीच जबाबदार नाहीत. दिनांक 13/05/2014 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्या केंद्रावर सदर टी.व्ही. आणला त्यावेळी अर्जदाराच्या मागणीवरुन व कंपनीच्या नियमाप्रमाणे जॉबकार्ड देण्यात आले व टी.व्ही. दुरुस्ती/बिघाडाची ऑनलाईन वर गैरअर्जदार 1 यांच्याकडे तक्रार नोंदवावी परंतू अर्जदाराने तक्रारच नोंदवली नाही म्हणून अर्जदार यांना सदर तक्रार करण्याचा अधिकारच पोहचत नाही. अर्जदारास समक्ष टी.व्ही.ची पाहणी केली असता असे दिसते की, सदर टी.व्ही. वरुन खाली पडलेला असावा, टी.व्ही. डॅमेज झालेला होता. जरी असे नुकसान झालेले असेल तर त्यास कंपनी किंवा दुरुस्ती केंद्र जबाबदार नाही. ही कल्पना अर्जदारास दिलेली होती. शिवाय जे योग्य व लागणारे साहित्य खरेदी करुन दया असे कळवले व पैशाची मुळीच मागणी केलेली नव्हती. अर्जदार हा राजकीय पक्षाशी संबंधीत होते. त्यांनी जोरजोराने व मोठयाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व धमकी देवून निघून गेले. तेव्हा पासून अर्जदार मुळीच आलेला नाही किंवा फोनही केलेला नाही उलट गैरअर्जदार क्र. 2 यांनी फोन करुन सामान आणुन दया व टी.व्ही. दुरुस्ती नंतर घेवून जा असा सल्ला दिला परंतू आजपर्यंत अर्जदार यांनी प्रतिसाद दिलेला नाही म्हणून सदरची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द रद्द करण्यात यावी. गैरअर्जदार 1 व 2 यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज रु.5,000/- च्या खर्चासह फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर ते मंचात हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर टी.व्ही. विकत घेतलेल्या पावतीच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. सदर टी.व्ही. बिघडला होता व तो गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिलेला होता. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या जॉबशीटच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने सदर टी.व्ही. हा दि. 08/11/2013 रोजी खरेदी केलेले आहे. सदर टी.व्ही.ची वॉरंटी ही 12 महिन्याची आहे. म्हणजेच टी.व्ही.मध्ये बिघाड हा वॉरंटी काळातच झालेला आहे हे स्पष्ट आहे. अर्जदाराची तक्रार आहे की, सदर टी.व्ही. च्या स्क्रीनवर लार्इन येणे चालू झाले व त्यात चित्र दिसेनासे झाले. अर्जदाराने दिनांक 08/11/2013 रोजी गैरअर्जदार क्र. 2 रॉयल युनिक सर्व्हीस सेंटर हया गैरअर्जदार क्र. 1 च्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिलेला होता. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास जॉबकार्ड दिलेले आहे. सदर जॉबकार्डचे अवलोकन केले असता असे दिसते की, Defect Reported By Customer हया सदरासमोर लाइन प्रॉब्लेम असे लिहिलेले आहे. Defect detected by Engineer हया सदरासमोर काही एक लिहिलेले नाही. यावरुन अर्जदाराचे म्हणणे की, सदर टी.व्ही.च्या Screen वर line येत होते व चित्र दिसत नव्हते, हे योग्य आहे. गैरअर्जदार 1 व 2 यांनी असे म्हटले आहे की, अर्जदार क्र. 2 यानी सदर टी.व्ही. पाडली होती व त्यामुळे टी.व्ही. फुटली व वॉरंटीच्या नियमाप्रमाणे अशा टी.व्ही.ची वॉरंटी देता येत नाही. सदरचे गैरअर्जदाराचे म्हणणे मान्य करता येत नाही. कारण टी.व्ही. फुटलेला असल्यास त्यावर Line रेषा येण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या वॉरंटी कार्डाचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट आहेत. सदर वॉरंटी कार्डामध्ये This warranty is not applicable in any of the following cases. हया सदराखाली कलम 4 पुढील प्रमाणे आहे.
4. Defects are caused by improper or reckless use, which shall be determined by the company personnel.
वरील नियमाप्रमाणे जर टी.व्ही. Reckless use मुळे बिघडला असल्यास त्याची पाहणी करुन रिपोर्ट देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. कंपनीने आपल्या इंजिनिअर करवी टी.व्ही.ची पाहणी करुन बिघाडाबद्दल तसा अहवाल दिलेला नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता असे दिसते की, अर्जदाराचा टी.व्ही. हा वॉरंटी कालावधीत बिघडलेला आहे व त्याची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क. 1 व 2 याची आहे व ती जबाबदारी गैरअर्जदार यांनी पार पाडलेली नाही व असे करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे व मानसिक त्रास दिलेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यांचा टी.व्ही. आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दुरुस्ती करुन दयावा.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- दयावेत.
4. वरील आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पूर्ततेच्या
अहवालासाठी ठेवण्यात यावे.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.