जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 193/2020. तक्रार दाखल दिनांक : 24/11/2020. तक्रार निर्णय दिनांक : 26/09/2022.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 02 दिवस
अदित्य पिता महावीर कोराळे, वय 26 वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. मोती नगर, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) एम.आय. शाओमी (MI Xiaomi) कन्सल्टींग रुमस् प्रा.लि.,
202 डिविएस बिझनेस, कॅनॉट प्लेस, न्यू दिल्ली, दिल्ली 110 001.
(2) एम.आय. सर्व्हीस सेंटर, प्रोप्रा. अरिहंत निंबाळकर,
आयरिस, गांधी मार्केट, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही.व्ही. सलगरे
विरुध्द पक्ष क्र.1 अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- बी.पी. राजमल्ले
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांनी दि.20/7/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून X15 NKPP Redmi भ्रमणध्वनी संच खरेदी केला असून ज्याचा IMEI No. 866772040267129 व Tax Invoice No. PL-F53970802 आहे. भ्रमणध्वनी खराब झाल्यामुळे दि.12/11/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला. त्यांनी भ्रमणध्वनीचा Display बदलण्याकरिता दि.13/11/2020 रोजी रु.7,536.66 स्वीकारले; परंतु मागणी करुनही त्याचे देयक दिले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी भ्रमणध्वनीचा Display जुना बसविलेला असून त्यावर ओरखडे दिसून येतात. तसेच Ear Piece Speaker मध्ये धुळ दिसून येते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी Display जुना बसवून फसवणूक केली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे GST देयकाची मागणी करुनही पूर्तता केलेली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने नुकसान रु.7,537/-; मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांना सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदपत्र' आदेश करण्यात आले.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य करुन ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी वादकथित भ्रमणध्वनी संच खरेदी केलेला आहे, असे दिसून येते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना दिलेल्या तपासणी सूचीनुसार वादकथित भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी स्वीकारल्याचे व रु.7,536.66 दुरुस्ती खर्च असल्याचे दिसून येते.
(6) तक्रारकर्ता यांचे वादकथन असे की, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी भ्रमणध्वनीचा Display जुना बसविलेला असून त्यावर ओरखडे आहेत आणि Ear Piece Speaker मध्ये धुळ दिसून येते. तसेच, विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे GST देयकाची मागणी करुनही पूर्तता केलेली नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्रामध्ये वादकथने अमान्य केले आहे. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामध्ये संदेशवहन झालेले दिसून येते आणि त्यामध्ये Tax Invoice व Mobile Display संबंधी उल्लेख आढळतो. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी खंडन केलेले नाही किंवा अन्य भाष्य केलेले नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरणे न्यायोचित आहे. आमच्या मते, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना Tax Invoice न देऊन व Mobile Display दोषयुक्त देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र ठरतात.
(7) तक्रारकर्ता यांच्या भ्रमणध्वनीकरिता दोषयुक्त Display बसविल्यामुळे तक्रारकर्ता यांना भ्रमणध्वनीचा योग्य वापर करता आला नाही. त्यामुळे Display बसविण्याचे शुल्क विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना परत करावेत, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(8) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना भ्रमणध्वनी योग्य Display साठी व Tax Invoice मिळविण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(9) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता रु.7,536.66/- द्यावेत.
तसेच, उक्त रकमेवर तक्रार दाखल दि. 24/11/2020 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 193/2020.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-