तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणारंतर्फे अॅड. श्रीमती गायकवाड हजर
द्वारा मा. श्री. मोहन एन. पाटणकर, सदस्य
निकालपत्र
18/06/2014
1] प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी हे थेरगाव, पुणे – 33 येथील रहिवासी असून जाबदेणार नवी पेठ, पुणे – 30 येथे व्यवसाय करतात. जाबदेणार हे ‘हॉलिडे होम’ सकल्पनेतून ग्राहक सदस्यांना रिसॉर्ट सेवा पुरवतात. तक्रारदाराने जाबदेणार संस्थेचे सदस्यत्व स्विकारल्यानंतर मिळालेल्या सेवेतील त्रुटीबाबत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारदाराचे कथनातील मुद्दे पुढीलप्रमाणे.
2] तक्रारदाराने जाबदेणार यांची हॉलिडे होम रिसॉर्टची सेवा घेण्यासाठी रु.1,50,000/- रकमेपोटी सदस्यत्व स्विकारण्याचे मान्य केले. त्यासाठी रक्कम रु.16,668/- ही प्राथमिक रक्कम दि. 11/06/2012 रोजी चेकने जाबदेणार यांना प्रदान केली. त्यानंतर दि. 15/10/2012 पर्यंत आणखी रक्कम रु. 75,002/- चेकद्वारे दिले. जाबदेणार यांनी दि. 14/06/2012 चे पत्राद्वारे तक्रारदार यांना सदस्यत्व दिले. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे दि. 15/11/2012 ते दि.18/11/2012 दरम्यान काळासाठी राजस्थानमधील बुकिंग्ज नोंदविली. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे दोन्ही बुकिंग निश्चित केले. जाबदेणार यांनी त्यासाठी रक्कम रु.2500/- एक्सचेंज फी लागू केली. ही अचानक मागणी पाहून तक्रारदाराने, फसवणूक होत असल्याची धारणा झाल्याने राजस्थानची बुकिंग रद्द करावी आणि सदस्यत्वासाठी भरलेली रक्कम रु. 91,670/- परत करुन सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. जाबदेणार यांनी दि. 14/06/2012 च्या पत्रामध्ये अटी व शर्ती नमुद केल्या असल्याचे कळविले. तसेच वेलकम किट पाठविले असल्याचे नमुद केले. तक्रारदारांना वेलकम किट मिळालेच नाही, कारण त्यांनी सदस्यत्वाची पूर्ण रक्कम भरलेली नव्हती. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांना वेळोवेळी पत्रे पाठवून सदस्यत्व रद्द करुन तक्रारदार यांची रक्कम रु. 91,670/- परत करण्याबाबत विनंती केली. जाबदेणार यांनी दि. 13/12/2012 च्या पत्राद्वारे व्यवस्थापनाचा याबाबतचा निर्णय 30 दिवसांत जाबदेणार कळविणार आहेत, असे नमुद केले. आजपर्यंत कोणताही निर्णय प्राप्त न झाल्याने तक्रारदार यांनी आर्थिक नुकसान व मानसिक त्रासापोटी त्यांनी दिलेली रक्कम व्याजासहित आणि रक्कम रु. 1,25,000/- नुकसान भरपाई व खर्चापोटी मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचापुढे दाखल केली आहे.
3] जाबदेणार यांनी त्यांच्या दि. 17/01/2014 रोजीच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदारांची मागणी अमान्य करुन तक्रार खर्चासह फेटाळण्याची मागणी केली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दि. 14/06/2012 चे पत्राद्वारे जाबदेणार यांचे मालकीशिवाय अन्य रिसॉर्टच्या बुकिंगसाठी एक्सचेंज फी आकारली जाण्याबाबत कळविले आहे. सबब, ही मागणी अचानक नसुन तक्रारदारांना राजस्थानमधील बुकिंगची मागणी करण्यापूर्वीच ज्ञात होती, असे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी ठरलेली रक्कम पूर्ण भरलेली नसूनदेखील त्यांना रिसॉर्टची सुविधा पुरविण्याचे मान्य केले होते. तक्रारदारांनी बाकी रक्कम 45 दिवसांत भरणे आवश्यक होते, ती भरली नसल्याने त्यांना वेलकम किट पाठविले नव्हते. जाबदेणार हे अद्यापही तक्रारदार यांना हॉलिडे होमची सेवा 15 वर्षांकरीता पुरविण्यास तयार आहेत. सबब, जाबदेणार यांनी सेवेत कोणतीही कसुर किंवा त्रुटी ठेवलेली नाही.
4] या प्रकरणात तक्रारदारांची तक्रार, कथने, शपथपत्रे आणि कागदपत्रे अभ्यासता पुढील मुद्दे या मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? | होय |
2. | जाबदेणार हे तक्रारदारास सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाई आणि खर्च देण्यास जबाबदार आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश ? | तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने खालील कारण मिमांसा नमुद करण्यात येते.
5] तक्रारदार यांनी प्राथमिक रक्कम रु. 16,668/- आणि त्यानंतर रक्कम रु.75,002/- असे एकुण रक्कम रु. 91,670/- जाबदेणार यांना दिलेले आहेत. तक्रारदारांनी जाबदेणार यांना द्यावयाची एकुण रक्कम रु. 1,50,000/- ची पुर्तता केलेली नाही. जाबदेणार यांनी दि. 14/06/2012 चे पत्रामध्ये सदस्यत्व रद्द करण्याबाबत कोणत्या अटी व शर्ती आहेत, याची माहिती तक्रारदार यांना दिलेली नाही. सदस्यत्वाची पूर्ण रक्कम प्राप्त झाली नसतानाही जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रिसॉर्टची सेवा राजस्थानात देण्याचे नक्की केले, मात्र तक्रारदारांना वेलकम किट पाठविलेले नाही. सदस्यत्व रद्द करण्याचे झालेस, अटी व शर्ती काय आहेत हे तक्रारदारास कधीही अवगत केलेले नाही. तक्रारदारास त्याने दिलेल्या रकमेच्या पावत्या दिलेल्या नाहीत. जाबदेणार यांनी सदस्यत्व रद्द करण्याच्या तक्रारदाराच्या विनंतीबाबत 30 दिवसांत निर्णय घेण्यात येईल असे दि. 13/12/2012 च्या पत्राद्वारे कळविले, परंतु असा कोणताही निर्णय कळविला नाही. जाबदेणार यांनी मंचापुढेही या अनुषंगाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही अथवा अटी व शर्ती सादर केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत जाबदेणार यांनी त्यांचे सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 14 अन्वये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करुन पुढील आदेश देण्यात येतो.
आदेश
1.
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना, त्यांनी भरलेली रक्कम रु.91,670/- (रु. एक्यान्नव हजार सहाशे सत्तर फक्त), तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानापोटीपोटी भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.