::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री अमोघ श्यामकांत कलोती, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक –30 मार्च, 2013 ) 1. तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षा कडून एक तर सदनीकेचा ताबा मिळावा किंवा तसे करणे शक्य नसल्यास, सदनीका खरेदी पोटी, वि.प.ला दिलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे- 3. यातील विरुध्दपक्षाचा बांधकाम व्यवसाय असून, तक्रारकर्ती ही त्यांची ग्राहक आहे. तक्रारर्तीने मौजा भिलगाव, खसरा नं.10/4, प.ह.नं.15, ग्राम पंचायत भिलगाव, राष्ट्रीय महामार्ग क्रं 7, कामठी रोड, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथील मॅट्रीक्स फलोरेनटिआ या नामक प्रस्तावित ईमारतीतील पहिल्या मजल्या वरील विंग-बी, निवासी सदनीका क्रमांक-104 (टॉवर 1/1) विकत घेण्याचा करारनामा विरुध्दपक्षा सोबत दि.15.12.2010 रोजी केला.
4. करारा नुसार सदर सदनीकेची एकूण किंमत रुपये-13,47,225/- निश्चीत करण्यात आली होती. पैकी त.क.ने कराराचे दिवशीच म्हणजे दि.15.12.2010 रोजी बयाना दाखल रुपये-2,58,445/- एवढी रक्कम चेकद्वारे दिली. दि.03.11.2010 पासून दोन वर्षाचे आत सदनीकेचा ताबा देण्याचे वि.प.ने कबुल केले होते. ताबा न दिल्यास 2 टक्के व्याजाचे हिशोबाने वि.प., त.क.ला रक्कम परत करेल असे वि.प.ने कबुल केले होते.परंतु बराच कालावधी लोटूनही वि.प.ने सदनीकेचा ताबा दिला नाही व कामही सुरु केले नाही.
5. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस कोणतीही सुचना न देता साईट प्लॅनमध्ये बदल केला, जे अटी प्रमाणे बेकायदेशीर आहे. तक्रारकर्तीस सदर बदल मान्य नाही. तक्रारकर्ती जुन्या प्लॅन नुसार सदनीका विकत घेण्यास तयार आहे कारण संपूर्ण बदल दिशाहिन असल्याचे व त्यानुसार कोणतेही बांधकाम दिसून येत नसल्याचे नमुद केले. 6. म्हणून तक्रारकर्तीने, विरुध्दक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. त.क.ने आपले तक्रारीचे विनंती कलमात वि.प.ला करारा प्रमाणे सदनीकेचा ताबा देण्याचे आदेशित व्हावे, वि.प.ने तसे न केल्यास त.क.ने बयानापोटी दिलेली रक्कम प्रतीमहा 2 टक्के प्रमाणे घेतलेल्या तारखे पासून व्याजासह परत करण्यास वि.प.ला आदेशित करावे. त.क.ला न्यायमंचात तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च रुपये-20,000/- शारिरीक मानसिक त्रासा बद्यल रुपये-1,00,000/- आणि बयानापोटी दिलेली रक्कम रुपये-2,58,445/- असे एकूण रुपये-4,97,329/- व्याजासह वि.प.कडून मिळण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद त.क.चें बाजूने मिळावी, असे नमुद केले आहे. 7. तक्रारकर्तीने पान क्रं 10 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने करारनामा प्रत, रक्कम भरल्याची पावती प्रत, वि.प.ला पाठविलेली नोटीस, रजिस्टर पोस्टाची पावती, पोच पावती, जाहिर सुचना इत्यादीचा समावेश आहे. 8. प्रस्तुत तक्रार प्रकरणात वि.प.चे नावे नोंदणीकृत डाकेने पोच पावतीसह नोटीस पाठविली असता, सदर नोटीस वि.प.ला मिळाल्या बाबत वि.प.ची पोच अभिलेखावर पान क्रं-37 वर उपलब्ध आहे. परंतु वि.प.ला नोटीस प्राप्त होऊनही ते न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही दाखल केले नाही म्हणून वि.प.विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दि.27.02.2013 रोजी पारीत केला.
09. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे वकीलांनी युक्तीवादाचे दिवशी म्हणजे दि.14.03.2013 रोजी पुरसिस दाखल करुन त्यांची तक्रार हाच लेखी युक्तीवाद समजावा असे नमुद केले. 10. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत- मु्द्ये उत्तर (1) करारा प्रमाणे वि.प.ने, तक्रारकर्तीस विहित मुदतीत सदनिकेचे ताबा न देता वा रक्कम परत न करता आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?................. होय. (2) काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार ::कारण मिमांसा::
मु्द्या क्रं 1 बाबत- 11. तक्रारकर्तीने तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द (यातील “विरुध्दपक्ष” म्हणजे-मे.मॅट्रीक्स फलोरेनटिआ तर्फे कायदेशीर सही करणार सुचितकुमार वल्द दिवान रामटेके) प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. त.क.ने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ उभय पक्षांमध्ये सदनीकेचे खरेदी संबधाने दि.15.12.2010 रोजी झालेला करारनामा प्रत पान क्रं 11 ते 28 वर दाखल केली. विरुध्दपक्षास रुपये-11,000/- चेक क्रमांक 830013, चेक दि.22.11.2010 नुसार दिल्या बाबत दि.22.11.2010 रोजीची पावती क्रं 629 (पान क्रं 29) दाखल केली. तसेच विरुध्दपक्षास रुपये-1,50,000/- चेक क्रमांक 438124, चेक दि.05.12.2010 नुसार दिल्या बाबत दि.05.12.2010 रोजीची पावती क्रं 120 (पान क्रं 30) दाखल केली. त्याच बरोबर विरुध्दपक्षास रुपये-97,445/- चेक क्रमांक 438125, चेक दि.15.12.2010 नुसार दिल्या बाबत दि.15.12.2010 रोजीची पावती क्रं 133 (पान क्रं 30) दाखल केली. तसेच विरुध्दपक्षास पाठविलेली दि.22.06.2012 रोजीची नोटीसची प्रत (पान क्रं 32 ते 34), पोस्टाची पावती व पोच पावती (पान क्रं 35), हे दस्तऐवज अभिलेखावर दाखल केलेत.
12. तक्रारकर्तीने कथन केल्या प्रमाणे, विरुध्दपक्षा सोबत सदर सदनीकेचे खरेदी बाबत करारनामा केल्याची व त्याचे मोबदला रकमे पैकी एकूण रुपये-2,58,445/- विरुध्दपक्षास दिल्याची बाब अभिलेखावरील पान क्रं 29 वरील पावती क्रमांक 629 पावती दि.22.11.10 तसेच पान क्रमांक 30 वरील पावती क्रमांक 120, पावती दि.05.12.10 त्याच बरोबर पान क्रं 30 वरील पावती क्रमांक 133 , पावती दि.15.12.10 वरुन सिध्द होते. 13. करारनामा करुनही विरुध्दपक्षाने त्याचे पालन केले नाही. विहित मुदतीत तक्रारकर्तीस सदनीकेचा ताबा दिला नाही. तसेच त.क.ने मागणी करुनही तिने सदनीकेपोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कमही परत केली नाही, हा सर्व घटनाक्रम पाहता, विरुध्दपक्षाचे सेवेतील कमतरता सिध्द होते, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 14. विरुध्दपक्षाने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण न करणे, तक्रारकर्तीला सदनीकेचा ताबा न देणे व तक्रारकर्तीने मागणी करुनही तीने वि.प.कडे जमा केलेली रक्कम परत न करणे, या सर्व प्रकारामुळे त.क.ला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास, मनःस्ताप होणे स्वाभाविक आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. मु्द्या क्रं 2 बाबत- 15. वि.प.ने करारा नुसार, तक्रारकर्तीस ठरलेल्या मुदतीत सदनीकेचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिलेला नाही. तसेच मागणी करुनही त.क.ला तीची जमा रक्कम परत केली नाही. त.क.ने आपले तक्रारीचे विनंती कलमा मध्ये करारात नमुद केल्या प्रमाणे एक तर सदनीकेचा ताबा मिळावा किंवा वि.प.कडे सदनीकेपोटी जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळावी अशी विनंती केलेली आहे. परंतु वि.प.ने करारा नुसार प्रस्तावित ईमारतीचे बांधकाम केल्याचे दर्शविणारा कोणताही दस्तऐवज पुराव्या दाखल तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही, त्यामुळे त.क.ची सदनीकेचा ताबा देण्यास वि.प.ला आदेशित व्हावे ही मागणी मान्य करता येणे शक्य नाही. त्यामुळे त.क.ने सदनीकेपोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कम रुपये-2,58,445/- व्याजासह परत मिळण्यास त.क. पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास आणि मनःस्ताप-गैरसोयी बद्यल तसेच तक्रारखर्चा बद्यल त.क., वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 16. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: 1) तक्रारकर्तीची, विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस रक्कम रुपये-2,58,445/- (अक्षरी रुपये दोन लक्ष अठठावन्न हजार चारशे पंचेचाळीस फक्त) तक्रार दाखल दि.-05.11.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी.
3) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल नुकसानी दाखलरु.-10,000/-(अक्षरी रु. दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |