द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(22/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणार कॉम्प्युटर इन्सटीट्युट विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या कॉम्प्युटर इन्सटीट्युटमध्ये दि. 27/9/2010 रोजी “CAT – CJEV CJVEO” या कोर्सकरीता प्रवेश घेतला होता. सदरचा कोर्स मार्च 2011 मध्ये पूर्ण होणार होता. जाबदेणार संस्थेने विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरीता जाहीरात प्रसिद्ध केलेली होती आणि त्यामध्ये, 99 दिवसांमध्ये त्यांच्याकडे कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉब देऊ अशी हमी दिली होती. तक्रारदार यांनी, या जाहीरातीस आकर्षित होऊन जाबदेणार यांच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. या कोर्सपोटी तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे रक्कम रु. 15,994/- इतकी फी भरली. कोर्स सुरु झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये जाबदेणार यांचा बोगसपणा तक्रारदार यांना दिसून आला. जाबदेणार संस्थेकडे नियमीत शिक्षक नव्हते, ते विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे न येता त्यांच्या मनाप्रमाणे संस्थेमध्ये येत असत. त्यामुळे तक्रारदार यांना अनेक अडचणी येत होत्या. बर्याच वेळा वर्ग बंद राहत असत, नेहमीच नवीन शिक्षक येत असत, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एकवाक्यता व एकसंघता कधीच निर्माण झाली नाही. या सर्व अडचणींबद्दल तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकदे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणतीही तोंडी किंवा लेखी माहिती दिली नाही. दोन दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांना कुठलीही सुचना न देता संस्था दुसरीकडे स्थलांतरीत केली, त्याशिवाय त्यांचा फोन नंबरही बदलला. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या नवीन कार्यालयामध्ये विचारणा केली असता, तेथील अधिकृत व्यक्तीने योग्य माहिती दिली नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली. तेथील एका कर्मचार्याने, “तु ज्यांच्याकडे फी भरली आहे त्यांच्याकडे फी माग, आम्हाला ही नवीन एजन्सी मिळाली आहे” असे निष्काळजीपणाचे उत्तर दिले. त्यामुळे तक्रारदार यांना धक्का बसला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ज्या कोर्ससाठी त्यांनी प्रवेश घेतला होता, तो अपूर्ण राहीला, त्यामुळे त्यांची दोन शैक्षणिक वर्षे वाया गेली. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्याकडून कोर्सपोटी संपूर्ण फी घेऊन, कोर्स पूर्ण केला नाही, अर्धवट सोडला, त्याचप्रमाणे संस्था नवीन जागी स्थलांतरीत केली, त्यांचा फोन नंबर बदलला, याबाबत तक्रारदार यांना कोणतीही कल्पना दिली नाही व सदोष सेवा देऊन शैक्षणिक सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे. म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून त्यांनी जाबदेणार यांच्याकडे फीपोटी भरलेली रक्कम रु. 15,994/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मागतात.
2] तक्रारदार यांनी या तक्रारीच्या कामी त्यांचे शपथपत्र, जाबदेणार संस्थेने त्यांना दिलेले ओळखपत्र, फी भरल्याची पावती, पेंडींग इन्स्टॉलमेंट प्लॅनची प्रत व त्यांनी दुसर्या संस्थेमध्ये पूर्ण केलेल्या संस्थेचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3] सदर प्रकरणी जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील व शपथपत्रातील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबुल :
केल्याप्रमाणे परिपूर्ण शैक्षणिक सेवा न देऊन :
सदोष सेवा दिलेली आहे का ? : होय
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई व मागणी केल्याप्रमाणे फीची रक्कम :
परत देण्यास जबाबदार आहेत का ? : होय
[क ] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
5] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, जाबदेणार संस्थेने त्यांना दिलेले ओळखपत्र, फी भरल्याची पावती, पेंडींग इन्स्टॉलमेंट प्लॅनची प्रत व त्यांनी दुसर्या संस्थेमध्ये म्हणजे अॅपटेक कॉम्युटर एज्युकेश या संस्थेमध्ये पूर्ण केलेल्या संस्थेचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, जाबदेणार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीस आकर्षित होऊन तक्रारदार यांनी त्यांच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला, परंतु जाबदेणार यांनी त्या कोर्सचे योग्य शिक्षण तक्रारदार यांना दिले नाही व सदरचा कोर्स पूर्ण केला नाही. या कोर्सच्या बाबतीत शिक्षण घेत असताना, तक्रारदारांना नियोजित केल्याप्रमाणे शिक्षण दिले गेले नाही. याबाबत तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी त्याचे निरसन केले नाही. तक्रारदार यांना कोणतीही पूर्वसुचना न देता संस्था स्थलांतरीत केली. तक्रारदार यांनी स्वत: स्थलांतरीत संस्थेचा पत्ता शोधून तेथे विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे तक्रारदार यांनी कोर्सची पूर्ण फी भरुनही त्यांचा कोर्स अर्धवट राहीला. तक्रारदार यांनी फीची रक्कम परत मागीतली असता, ज्यांच्याकडे फी भरली, त्यांना फी परत मागा, ही नवीन एजन्सी आहे, अशा प्रकारची उत्तरे तक्रारदार यांना देण्यात आली. या सर्व गोष्टींना कटाळून नाईलाजाने तक्रारदार यांनी “अॅपटेक कॉम्युटर एज्युकेश” या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन “Aptech certified computer professional in Software Engineering” हा कोर्स पूर्ण केला, हे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रावरुन दिसून येते. त्यामुळे जाबदेणार यांनी नि:संशयरित्या तक्रारदार यांना दुषित व सदोष सेवा दिलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. यातील जाबदेणार यांना रितसर नोटीस पाठविण्यात आली, त्यांना नोटीस मिळूनही त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीस कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही वा स्वत: मंचासमक्ष उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडले नाही व तक्रारदार यांची तक्रार नाकारली नाही. या जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे, निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे तक्रारदार यांनी मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याचप्रमाणे कोर्स पूर्ण न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून फीची रक्कम रु. 15,994/- परत मिळण्यासाठी, तसेच रक्कम रु. 10,000/- मानसिक त्रासापोटी आणि रक्कम रु. 1,000/- तक्रारीच्या खर्चापोटी मिळण्यास पात्र ठरतात, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची अंशत: मंजूर करण्यात येते.
2] असे जाहीर करण्यात येते की जाबदेणार यांनी
तक्रारदार यांना कबुल केल्याप्रमाणे शैक्षणिक सेवा
परिपूर्णरित्या न देऊन सदोष सेवा दिलेली आहे.
3] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना, त्यांनी भरलेल्या
फीची रक्कम रु. 15,994/- (रु. पंधरा हजार नऊशे
चौर्यान्नव मात्र), रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार
मात्र) मानसिक त्रासापोटी व रक्कम रु. 1,000/-(रु. एक
हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
3] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठविण्यात यावी.