द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 24 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या शनिवार पेठेतील एन मार्ट मध्ये सदस्यत्वासाठी अॅक्सीस बँकचा चेक क्र.666408, दिनांक 15/6/2011 अन्वये रुपये 5500/- भरले. जाबदेणार यांचे प्रवक्ते श्री. परदेशी यांच्याशी पुणे येथील शनिवार पेठेत वारंवार प्रयत्न करुनही तक्रारदारांचे अकाऊंट आय डी अॅक्टीव्ह झाले नाही. तक्रारदारांनी वारंवार ई-मेल, फोन करुनही उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 5500/-, मानसिक त्रासापोटी रुपये 1500/-, तक्रारीचा खर्च रुपये 200/-, व्याजापोटी रुपये 800/- एकूण रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या अकाऊंट लेजर एन्क्वायरी चे मंचाने अवलोकन केले असता त्यात जाबदेणार यांच्या नावे रुपये 5500/- दिनांक 16/6/2011 रोजी जमा झाल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांना दिनांक 16/6/2011 रोजी रक्कम प्राप्त होऊनही, तक्रारदारांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करुन जाबदेणार यांनी तक्रारदारांचे अकाऊंट आय डी अॅक्टीव्हेट केले नाही व रक्कमही परत केली नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे, तक्रारदारांना कार्ड अॅक्टीव्हेशनचे फायदे मिळू शकले नाहीत, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 5500/- दिनांक 16/6/2011 पासून 9 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदारांची व्याजाची मागणी मंजुर करण्यात आल्यामुळे तक्रारदारांच्या नुकसान भरपाई पोटी व इतर खर्चापोटी केलेल्या मागण्या मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना
रक्कम रुपये 5500/- दिनांक 16/6/2011 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[2] जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- अदा करावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.