निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द तक्रार दाखल केलेली असून तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक क्र. एमएच-26/एडी-0534 हा बेकायदेशीररित्या जप्त केलेला असल्याने तो परत दयावा तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्त केल्यामुळे अर्जदाराला त्याच्या व्यवसायात प्रतीदिन रु.5,000/- नुकसान भरपाई सहन करावी लागली म्हणून अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/- 12 टक्के व्याजासह तसेच अर्जदाराचा ट्रक बेकायदेशीररित्या जप्त करुन चुकीचे सेवा व निष्काळजीपणाची वागणूक दिल्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश करावा. अशी तक्रारीद्वारे मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत अंतरिम मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केलेला आहे. मंचाने अर्जदाराच्या मनाई हुकूमाच्या अर्जावर दिनांक 19/11/2014 रोजी आदेश पारीत केलेला होता परंतू सदर आदेश पारीत केल्यानंतर गैरअर्जदार हे दि. 21/01/2014 रोजी मंचासमोर हजर झाले व अंतरिम मनाई हुकूमाचा आदेश रद्द करावा असा अर्ज दिला. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे दिले. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्यात अर्जदार यांच्याकडे एकूण थकबाकी दिनांक 21/11/22014 पर्यंत रक्कम रु. 3,27,000/- इतकी असल्याचे नमूद केलेले आहे. अर्जदाराने सदर अर्जावर आपले म्हणणे देवून अर्जदार हा गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. 3,27,000/- भरण्यास तयार असल्याचे लेखी म्हणणे दिले. त्यानुसार मंचाने दिनांक 24/11/2014 रोजी अर्जदाराला आदेश दिला की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. 3,27,000/- जमा करावी. अर्जदाराने रक्कम जमा केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन त्वरीत परत करावे. त्यानुसार अर्जदार यांनी दिनांक 24/11/2014 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. जमा केलेली आहे व गैरअर्जदार यांनीही अर्जदाराचे वाहन परत केलेले आहे. अर्जदाराने आजरोजी सदर रक्कमेच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांच्या वतीने अॅड. सुखमणी यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांच्यावतीने अॅड. खानगुडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी दिसून येतात.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक क्र. एमएच-26/एडी-0534 हा अर्जदाराने हप्ते भरलेले नसल्यामुळे जप्त केलेला होता व अर्जदाराने विनंती करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन परत दिलेले नसल्याने अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराने तक्रार प्रलंबित असतांना थकीत हप्त्याची रक्कम व्याजासह रु. 3,27,000/- गैरअर्जदार यांच्याकडे जमा केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक अर्जदारास परत केलेला आहे. यावरुन अर्जदाराचे तक्रारीतील मागणी क्र. 1 चे निराकरण झालेले असल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी तक्रारीत याशिवाय मानसिक त्रासापोटी रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराचे हप्ते थकीत ठेवलेले आहेत. अर्जदार यांनी अर्जदाराचे राहिलेले भविष्यातील उर्वरीत हप्ते वेळेवर स्विकारुन गैरअर्जदार यांनी गाडीचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्र अर्जदारास दयावेत अशी मागणी तक्रारीमध्ये केलेली आहे. त्याबाबत मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे पुढील हप्ते नियमित भरणा करावेत.
3. अर्जदाराचे सलग 3 हप्ते थकल्यास गैरअर्जदार यांनी अर्जदारावर नियमाप्रमाणे कार्यवाही करावी.
4. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास ना-हरकत प्रमाणपत्र दयावे.
5. खर्चाबाबत आदेश नाही.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.