(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 29 जुलै 2016)
1. तक्रारकर्त्याची ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 आणि 3 हे अनुक्रमे नागपूर आणि मेहरी तालुका, जिल्हा – सेलम (तामिलनाडु) येथील बँकेच्या शाखा आहेत. विरुध्दपक्ष क्र.2 हे प्रताप नगर, नागपूर येथील बँक ऑफ बडोदा आहे. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्र.3 कडे बचत खाते असून त्या खात्यावर त्याला एक ATM कार्ड देण्यात आले आहे. दिनांक 18.11.2012 ला सकाळी 7.27 च्या दरम्यान तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 च्या ATM मधून कार्डव्दारे रुपये 10,000/- काढले. त्यादिवशी अंदाजे एक मिनिटाच्या अंतराने कोणी अज्ञात व्यक्तीने त्याचे खात्यातून पुन्हा रुपये 10,000/- काढले होते. अशाप्रकारे त्याच्या खात्यातून त्यादिवशी रुपये 20,000/- काढण्यात आले व त्याची सुचना त्याचे मोबाईलवर SMS व्दारे त्याला प्राप्त झाली. त्याच्या खात्यातून रुपये 10,000/- अज्ञान व्यक्तीने काढल्या बद्दलची तक्रार विरुध्दपक्ष क्र.1 व 3 कडे दिली, तसेच काही महिण्याच्या अंतराने पोलीस स्टेशन, प्रताप नगरला सुध्दा दिली. विरुध्दपक्षाने त्याला आश्वासन दिले की, त्याच्या खात्यातून रुपये 10,000/- ची जी रक्कम काढण्यात आली ती त्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. परंतु, रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली नाही म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षांना आदेश देण्याची विनंती केली आहे की, त्याचे रुपये 10,000/- ची रक्कम त्याला व्याजासह परत मिळावी आणि झालेल्या ञासाबद्दल रुपये 25,000/- व खर्चाबद्दल रुपये 5000/- मिळावे.
3. तिन्ही विरुध्दपक्षांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली, ते वकीला मार्फत हजर झाले. विरुध्दपक्ष क्र.1 व 3 ने निशाणी क्र.12 खाली आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांनी प्राथमिक आक्षेप असा घेतला की, तक्रारकर्त्याचे बचत खाते शाखा नेहरी (तामिलनाडु) येथे असल्यामुळे या मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार येत नाही. त्यांनी हे कबुल केले आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 18.11.2012 ला विरुध्दपक्ष क्र.2 च्या ATM मधून रुपये 10,000/- काढले होते. परंतु, हे नाकबूल केले आहे की, त्यादिवशी त्याचे खात्यातून कोणी अज्ञात व्यक्तीने पुन्हा रुपये 10,000/- काढले. दोन्ही रकमा तक्रारकर्त्यानेच ATM कार्डव्दारे काढल्या होत्या व त्याची सुचना त्याचे मोबाईलवर देण्यात आली होती. तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीवर योग्य ती शहानिशा करण्यात आली व त्यात कुठलाही गैरप्रकार आढळला नाही. त्याने हे नाकबूल केले आहे की, तक्रारकर्त्याला रुपये 10,000/- परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सबब तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. विरुध्दपक्ष क्र.2 ने आपला लेखी जबाब निशाणी क्र.17 खाली दाखल केला. त्यांनी सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 व 3 च्या लेखी जबाबानुसार तक्रारीतील मजकूर नामंजूर केला आहे. परंतु, असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांच्या बँकेच्या ATM मधून कार्डव्दारे दोनवेळा रुपये दहा-दहा हजार काढले होते. पुढे असे नमूद केले आहे की, ATM चे कार्य हे DIE याव्दारे नियंञीत केल्या जाते व विरुध्दपक्षाचा ATM मशीनवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंञण नसते. ATM मशीनमधील पैसे काढण्यासाठी ATM कार्ड व पीनची गरज असते, पीन हा गोपानीय असतो व तो केवळ ATM धारकालाच माहित असतो. त्यामुळे कोणी दुसरा व्यक्ती ATM कार्डशिवाय किंवा त्याच्या पीन शिवाय ATM मशीन मधून रक्कम काढू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे अविश्वसनिय आहे की, कोणी अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यातून ATM मशीनव्दारे रुपये 10,000/- काढले. म्हणून ही तक्रार खोटी असून खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
5. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावरील दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर एक बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या खात्यातून ATM मधीनव्दारे दिनांक 18.11.2012 ला दोनवेळा रुपये दहा-दहा हजार काढण्यात आले होते. दोन्ही व्यवहारामध्ये एक मिनिट पेक्षापण कमी वेळेचे अंतर आहे. याचाच अर्थ जेंव्हा तक्रारकर्त्याने पहिल्यांदा रुपये 10,000/- काढले तेंव्हा त्याच्याच उपस्थितीत आणि त्याच ATM सेंटर मधून त्याच्याच कार्डव्दारे आणि पीनचा उपयोग करुन दुस-या व्यक्तीने रुपये 10,000/- काढले, परंतु असे घडणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तक्रारकर्त्याला कोणत्या व्यक्तीने त्याच्या समक्ष रुपये 10,000/- काढले हे माहित नसणे विश्वासार्ह वाटत नाही. त्याचबरोबर तच्या ATM कार्डशिवाय व पीन शिवाय त्याच्या खात्यातून ATM मशीनव्दारे एक मिनिटाच्या आंत कोणी अज्ञात व्यक्ती पैसे काढू शकेल, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
7. तक्रारकर्त्याने जी पोलीस मध्ये तक्रार केली त्यातील मजकूर बराचसा असंबंध आहे. कारण ती तक्रार वाचल्यावर असे दिसते की, त्याने दोनवेळा रुपये 10,000/- काढले, परंतु पुढे म्हटले आहे की, कोणी रुपये 20,000/- अज्ञात व्यक्तीने काढले आहे. त्यामुळे तक्रारीत त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे समजून येत नाही. वर सांगितल्या प्रमाणे याबद्दल वाद नाही की, ATM मशीनमधून रुपये 10,000/- दोनवेळा काढण्यात आले होते. परंतु, दुस-यांदा काढलेले रुपये 10,000/- तक्रारकर्त्याच्या कार्ड व पीन शिवाय कोणी अज्ञात व्यक्तीने काढले या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि त्याचा पुरावापण अभिलेखावर नाही. सबब, यामध्ये विरुध्दपक्षांची कुठलिही चुक किंवा सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. विरुध्दपक्षांनी मंचाला अधिकारक्षेञ येत नाही असा आक्षेप घेतला आहे. परंतु तो योग्य नाही, कारण तक्रारी नुसार तक्रार दाखल करण्याचे कारण नागपूर येथे घडले आहे, त्यामुळे मंचाला अधिकारक्षेञ येते. परंतु, वर दिलेल्या कारणासाठी ही तक्रार तथ्यहीन दिसते म्हणून ती खारीज होण्या लायक आहे.
सबब, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 29/07/2016