जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 85/2023. तक्रार दाखल दिनांक : 11/04/2023. तक्रार निर्णय दिनांक : 04/01/2024.
कालावधी : 00 वर्षे 08 महिने 24 दिवस
राजेश्वर त्र्यंबक हैद्राबादे, वय 46 वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. गांजूरवाडी, ता. चाकूर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
ग्रामीण उपविभाग, बोथी रोड, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता : स्वत: उपस्थित.
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अमोल एम.निंबुर्गे
आदेश
श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, सन 2001 पासून ते विरुध्द पक्ष यांचे घरगुती वीज जोडणीचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्र. 624280986035 आहे. जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 कालावधीकरिता विरुध्द पक्ष यांनी त्यांना प्रतिमहा 89 युनीटचे सरासरी आकारणी करुन वीज देयक दिले आणि जे तक्रारकर्ता यांनी भरणा केलेले आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, मार्च 2023 मध्ये विरुध्द पक्ष यांनी त्यांना रु.64,830/- रकमेचे चुकीचे वीज देयक दिले. वास्तविक त्यांच्या घरामध्ये 2 एल.ई.डी. बल्ब व एक पंखा याकरिता विद्युत वापर होतो आणि त्या विद्युत वापराप्रमाणे कथित वीज वापर होणे अशक्य आहे. विरुध्द पक्ष यांच्याकडे चुकीच्या वीज देयकाबद्दल अर्ज सादर केला असता दखल घेण्यात आली नाही; परंतु विद्युत देयकाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देण्यात आली. उक्त कथनांच्या अनुषंगाने 8 महिन्यांचे सरासरी देयक व अवाजवी रु.64,800/- रकमेचे देयक रद्द करण्याचा; मानसिक त्रास व आर्थिक खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा व विद्युत पुरवठा खंडीत न करण्याबद्दल विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचे निराकरण केले असून त्यांना गैरवाजवी देयक दिलेले नाही. विद्युत मीटर तक्रारकर्ता यांच्या घरामध्ये बसविण्यात आलेले होते. कोविड कालावधीमध्ये तक्रारकर्ता कुटुंबियासमवेत गावी रहावयास गेले होते. त्या कालावधीमध्ये मीटर रिडींग घेण्याचे काम बंद असल्यामुळे सरासरी वीज वापराचे देयक दिले होते. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वीज वापराची नोंद घेण्यात आली आणि त्यानुसार अचूक देयक देण्यात आले.
(4) विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन असे की, ग्राहक तक्रार दाखल करण्यापूर्वीच तक्रारकर्ता यांना रु.43,330/- चे देयक दुरुस्त दिले आहे. मागील कालावधीतील सरासरी देयकाचे व कोविड कालावधीतील वापराचे ते देयक आहे. तसेच वीज देयक पडताळणी माहे मे 2016 पासून केली आहे. तक्रारकर्ता यांचे विद्युत मीटर घराबाहेर बसविण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार सबळ कारणांशिवाय असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाच्या निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून निवासी वापराकरिता विद्युत पुरवठा घेतला, याबद्दल उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांचा विद्युत ग्राहक क्र. 624280986035 असल्याचे विवादीत नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 कालावधीकरिता सरासरी आकारणीचे विद्युत देयक दिले, ही मान्यस्थिती आहे. विरुध्द पक्ष यांनी मार्च 2023 मध्ये तक्रारकर्ता यांना रु.64,830/- रकमेचे विद्युत देयक दिले, ही मान्यस्थिती आहे. मार्च 2023 च्या विद्युत देयकामध्ये रु.43,330/- प्रमाणे दुरुस्ती केल्याचे उभय पक्षांस मान्य आहे.
(7) उभयतांचा वाद-प्रतिवादानुसार विरुध्द पक्ष यांनी दि.13/3/2023 रोजी दिलेल्या रु.64,030/- च्या विद्युत देयकामुळे विवाद निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष हे वादकथित देयकाचे समर्थन करीत असले तरी त्यामध्ये रु.43,330/- रकमेची दुरुस्ती केल्याचे त्यांना मान्य आहे. वादकथित देयकाच्या समर्थनार्थ विरुध्द पक्ष यांनी मांडलेल्या मुद्यांनुसार विद्युत मीटर तक्रारकर्ता यांच्या घरामध्ये असणे; कोविड कालावधीमध्ये तक्रारकर्ता गावी जाणे; तसेच त्या कालावधीमध्ये मीटर रिडींग घेण्याचे काम बंद असणे; सरासरी विद्युत वापराचे देयक दिले जाणे इ. बाबी नमूद आहेत. तसेच विरुध्द पक्ष कथन करतात की, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वीज वापराची नोंद घेऊन वादकथित देयक दिले असून ते अचूक आहे आणि त्या विद्युत देयकाची पडताळणी माहे मे 2016 पासून केल्याचे विरुध्द पक्ष नमूद करतात.
(8) उभयतांचा वाद-प्रतिवाद व कागदपत्रे पाहता माहे तक्रारकर्ता यांच्या जुन 2022 पर्यंत आलेल्या विद्युत देयकांबद्दल उभयतांमध्ये विवाद नाही. वादविषयानुसार तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत सरासरी युनीटप्रमाणे विद्युत देयक दिलेले आहे. तसेच त्यानंतर मार्च 2023 मध्ये वादकथित देयक निर्गमीत झालेले आहे. उभय पक्षातर्फे तक्रारकर्ता यांच्या विद्युत वापराचा ग्राहक वैयक्तिक उतारा (Consumer Personal Ledger) दाखल केलेला असून तक्रारकर्ता यांचा जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत विद्युत वापर खालीलप्रमाणे दिसतो.
महिना व वर्ष | मीटर क्रमांक | मीटर स्थिती | चालू नोंद | मागील नोंद | युनीट वापर | देयक रक्कम |
जुलै 2022 | 09800315017 | Locked | 4135 | 4135 | 89 | रु.685.68 |
ऑगस्ट 2022 | 09800315017 | Locked | 4135 | 4135 | 89 | रु.680.92 |
सप्टेंबर 2022 | 09800315017 | Locked | 4135 | 4135 | 89 | रु.676.15 |
ऑक्टोंबर 2022 | 09800315017 | Locked | 4135 | 4135 | 89 | रु.669.86 |
नोव्हेंबर 2022 | 09800315017 | R.N.T. | 4135 | 4135 | 89 | रु.637.57 |
डिसेंबर 2022 | 09800315017 | Locked | 4135 | 4135 | 89 | रु.677.28 |
जानेवारी 2023 | 09800315017 | Faulty | 4135 | 4135 | 89 | रु.670.99 |
फेब्रुवारी 2023 | 09800315017 | Faulty | 4135 | 4135 | 89 | रु.670.34 |
मार्च 2023 | 09800315017 | Normal | 4135 | 7834 | 3699 | रु.64030.23 |
(9) प्रामुख्याने, जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 कालावधीमध्ये Locked, R.N.T., Faulty या कारणास्तव सरासरी 89 युनीटचे विद्युत देयक दिलेले आहेत. तसेच मार्च 2023 च्या वादकथित देयकासाठी 'मागील युनीट 4135' व 'चालू युनीट 7834' नोंद दर्शवून 3699 युनीटचे विद्युत देयक आकारलेले दिसते. त्यापुढे एप्रिल 2023 मध्ये 34, मे 2023 मध्ये 66 युनीट वापर दिसून आढळतो. त्यानंतर जुन 2023 पासून विद्युत मीटर क्र. 09612369759 प्रमाणे विद्युत वापर दिसून येतो. अशा स्थितीत, माहे मार्च 2023 मध्ये अचानक अवास्तव व अवाजवी 3699 युनीट नोंद का दर्शविण्यात आली, हाच प्रश्न निर्माण होतो. विरुध्द पक्ष यांनी मार्च 2023 मध्ये दिलेल्या देयकाचे समर्थन केले असले तरी रु.43,330/- रकमेची दुरुस्ती केल्याचे नमूद केले. त्यामुळे एका अर्थाने तक्रारकर्ता यांचे मार्च 2023 चे विद्युत देयक दुरुस्त केल्यामुळे ते अचूक व योग्य नव्हते, हे ग्राह्य धरावे लागेल. विरुध्द पक्ष यांनी सहायक अभियंत्यामार्फत स्थळ पाहणी करुन देयकामध्ये रु.43,330/- रकमेची दुरुस्ती केल्याचे नमूद केले असले तरी त्यासंबंधी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. इतकेच नव्हेतर, मार्च 2023 च्या देयकामध्ये अनियमीत व अवाजवी प्रमाणामध्ये युनीट नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यासंबंधी सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा अवाजवी व अवास्तव युनीट नोंद होण्यामागील कारणांचा शोध घेतल्याचे दिसून येत नाही.
(10) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांच्या घरामध्ये 2 एल.ई.डी. बल्ब व एक पंखा याकरिता विद्युत वापर होतो आणि ते कथन विरुध्द पक्ष यांनी नाकारलेले नाही. तक्रारकर्ता यांचा मार्च 2023 पूर्वीचा व नंतरचा विद्युत वापर पाहता निश्चितच वाजवी स्वरुपात दिसतो. वाद-तथ्ये व पुरावे पाहता मार्च 2023 देयकामध्ये 3699 युनीट नोंदीकडे विरुध्द पक्ष यांनी गांर्भियाने पाहिलेले नाही. शिवाय, विरुध्द पक्ष यांनी विद्युत देयक दुरुस्त केल्याचे मान्य केले असले तरी त्यामध्ये कोणती चुक झाली होती आणि देयकामध्ये कशा पध्दतीने दुरुस्ती केली, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. अनेकवेळा विद्युत देयकामध्ये आढळणा-या त्रुटीकरिता मीटर वाचकाची चूक, मीटरमध्ये निर्माण झालेला दोष किंवा अन्य तांत्रिक बाबी कारणीभूत असू शकतात. आमच्या मते, ज्यावेळी विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे विद्युत देयक दुरुस्त करुन दिले, त्यावेळी त्यांच्याकडून चुक झालेली होती, हे स्पष्ट आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी सादर केलेले पुरावे पाहता विरुध्द पक्ष यांनी सरासरी देयके देण्यासंबंधी मांडलेले मुद्दे तथ्यहीन असल्याचे आढळतात.
(11) तक्रारकर्ता यांनी जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 कालावधीतील सरासरी देयकांचा भरणा केला, हे उभयतांना मान्य असून Consumer Personal Ledger वरुन तशी नोंद दिसून येते. तसेच जुन 2023 पासून विद्युत मीटर क्र. 09612369759 द्वारे नोंदलेल्या युनीटचे विद्युत देयक दिल्याचे दिसते. म्हणजचे जुन 2023 मध्ये किंवा तत्पूर्वी तक्रारकर्ता यांचे विद्युत मीटर बदलण्यात आल्याचे ग्राह्य धरावे लागेल.
(12) ज्या विद्युत मीटर क्र. 09800315017 द्वारे मार्च 2023 चे वादकथित देयक दिले, ते मीटर बदलले असले तरी त्यामध्ये काही दोष होता किंवा नाही, याची तपासणी केल्याचा पुरावा नाही किंवा विरुध्द पक्ष यांचे त्याबद्दल उचित कथन नाही. इतकेच नव्हेतर, मार्च 2023 नंतर त्याच विद्युत मीटरद्वारे 34 व 66 युनीट नोंदीचे देयक आकारलेले आहे. त्यामुळे अचानक मार्च 2023 मध्ये 3699 युनीट नोंद का झाली ? ते मीटर बदलल्यानंतर तपासणी केले काय ? मीटर क्र. 09800315017 बदलताना त्यावर असणा-या नोंदीसंबंधी अहवाल किंवा पंचनामा तयार केला काय ? इ. बाबी अनुत्तरीत आहेत.
(13) उक्त स्थिती पाहता, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 चे सरासरी स्वरुपाचे व मार्च 2023 चे अवाजवी व चूक विद्युत देयक दिल्याचे सिध्द होते. न्यायाच्या दृष्टने ते देयके रद्द होण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्ता यांचा जुलै 2022 पूर्वीच्या व मार्च 2023 नंतरच्या 5 महिन्यांचा सरासरी विद्युत वापर 55 युनीट आढळतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते मार्च 2023 कालावधीकरिता प्रतिमहा 55 युनीट विद्युत वापराचे देयक आकारणी करणे न्यायोचित ठरेल. तसेच जुलै 2022 ते मार्च 2023 कालावधीच्या देयकासाठी तक्रारकर्ता यांनी भरणा केलेली रक्कम दुरुस्त देयकामध्ये समायोजित करणे योग्य राहील.
(14) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता हे नोकरी करतात आणि वादकथित देयकांच्या अनुषंगाने त्यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्या अनुषंगाने योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 85/2023.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते मार्च 2023 कालावधीकरिता दिलेले विद्युत देयके रद्द करण्यात येते.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना जुलै 2022 ते मार्च 2023 कालावधीकरिता प्रतिमहा 55 युनीटचे विद्युत देयक आकारणी करावे.
(4) तक्रारकर्ता यांनी जुलै 2022 ते मार्च 2023 कालावधीच्या देयकांसाठी भरणा केलेली रक्कम उक्त आदेश क्र. 3 प्रमाणे देण्यात येणा-या देयकामध्ये समायोजित करावी.
(5) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(6) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-