निकालपत्र
(दि.14.08.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांनी त्यांचे व्यवसायासाठी ‘’फोड फिगो’’(टायटॉनीएम) हे चार चाकी वाहन क्रमांक एम एच 26/व्ही 6433 खरेदी केले. सदरील वाहनाची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराने घेतलेली असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 11.03.2013 ते दिनांक 10.03.2014 असा आहे. दिनांक 28.08.2013 रोजी नांदेड बायपास रोडावर अर्जदाराचे वाहनास अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांना घटनेची माहिती दिली व अर्जदाराने फोर्ड कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्रावर वाहन दुरुस्तीसाठी नेले. त्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास सुचना दिलेल्या होत्या. अर्जदाराचे वाहनासाठी एकूण रक्कम रु.2,73,322/- एवढा खर्च आलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे सांगण्यावरुन दुरुस्ती केंद्रावर सदरील रक्कम जमा केली आहे. वाहनाचे झालेली नुकसान भरपाईची पडताळणी करणेकरीता गैरअर्जदार यांनी अधिकृत वाहन पडताळणी अधिकारी यांची नियुक्ती करुन अहवाल मागविला. अर्जदार यांना रक्कम रु.2,28,024/- एवढा खर्च वाहन दुरुस्तीसाठी येऊ शकतो असा अहवाल सदरील अधिकारी यांनी दिलेला आहे. अर्जदाराने नुकसान भरपाईची रक्कम मिळणेसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रे गैरअर्जदार यांचेकडे सादर केली. त्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास पत्राव्दरे कळविले की, तुम्ही दाखल केलेला नुकसान भरपाईचा अर्ज नामंजूर करण्यात येत असून तुम्हास नुकसान भरपाई देतायेणार नाही असे सांगितले. गैरअर्जदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या वाहनाची पुर्वीच्या वर्षी भारती एक्सेल जनरल इंशुरन्स यांचा विमा घेतला होता. त्या वर्षात अर्जदाराने त्याच्या झालेल्या वाहनाचे नुकसान भरपाई त्या विमा कंपनीकडून घेतली आहे. ती बाब अर्जदाराने गैरअर्जदार यांना विमा काढतांना न सांगितल्यामुळे आम्ही अर्जदाराच्या वाहनाची नुकसान भरपाई देत नाही. अर्जदाराने त्याचे वाहनाचा विमा काढीत असतांना सर्व बाबींची पुर्तता व भरावी लागणारी रक्कमही गैरअर्जदार यांच्या नांदेड कार्यालयात जमा केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा चुकीच्या कारणावरुन गैरअर्जदार यानी नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा बेकायदेशीररीत्या नाकारल्यामुळे सेवेत त्रुटी दिलेली असल्यामुळे सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विनंती केलेली आहे की, अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेकडून वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रक्कम रु.2,73,322/- , मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व दाव्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी अर्जदार यानी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदारास दिलेली पॉलिसी गैरअर्जदार यांना मान्य असून उर्वरीत कथन गैरअर्जदार यांनी अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने सदर वाहनाची विमा पॉलिसी घेतेवेळेस गैरअर्जदार यांचेपासून काही बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. अर्जदाराने विमा पॉलिसी घेतेवेळेस डिक्लेरेशन दिलेले आहे की, तो ‘’नो क्लेम बोनस’’ घेण्यास पात्र आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदारास 20 टक्के ‘’नो क्लेम बोनस’’ दिलेला आहे. अर्जदार यांनी अपघातानंतर गैरअर्जदार याचेकडे क्लेम दाखल केल्यानंतर ‘’नो क्लेम बोनस’’च्या डिक्लेरेशनची पडताळणी केली असता गैरअर्जदार यांचे असे लक्षात आले की, अर्जदाराचे वाहन क्रमांक एम एच 26/व्ही 6433 हे यापुर्वीच्या वर्षात भारती एक्सेल जनरल इंशुरन्स कंपनीकडे विमाकृत होते व या पॉलिसी अंतर्गत अर्जदाराने दिनांक 10.07.2012 च्या अपघाताकरीता रु.12,807/- नुकसान भरपाई पुर्वीच कंपनीकडून घेतलेली होती. पुर्वी क्लेम घेऊनही अर्जदाराने त्याने कोणताही क्लेम घेतलेला नाही असे डिक्लेरेशन दिले व वरील बाब गैरअर्जदार याचेपासून लपवली व 20 टक्के ‘’नो क्लेम बोनस’’ 1997/- रुपयाचा डिडक्शन गैरअर्जदार यांचेकडून घेतले त्यामुळे अर्जदाराने चुकीची माहिती देऊन पॉलिसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम योग्यरीत्या नाकारलेला आहे. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास वाहन क्रमांक एम एच 26/व्ही 6433 ची विमा पॉलिसी देण्यात आली व सदरील पॉलिसीचा कालावधी दिनांक 11.03.2013 ते दिनांक 10.03.2014 असा आहे ही बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारीमध्ये हजर होऊन आपला लेखी जबाब दिनांक 16.01.2014 रोजी दाखल केलेला आहे. लेखी जबाबामध्ये गैरअर्जदार यांनी नमुद केलेले आहे की, अर्जदाराने पॉलिसी काढतांना पुर्वी अर्जदाराच्या वाहनाचा कुठलाही अपघात झालेला नसल्यामुळे नुकसान भरपाई स्विकारलेली नाही असे खोटे डिक्लेरेशन दिलेले असल्याने अर्जदाराने ‘’नो क्लेम बोनस’’ ची पॉलिसी घेतांना घेतलेली आहे असे कथन केलेले आहे. गैरअर्जदार यांचे या कथनावर अर्जदाराने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही किंवा अर्जदार युक्तीवादास हजर राहिलेला नाही. अर्जदार दिनांक 22.09.2014 पासून युक्तीवादाचा दिनांक 07.08.2015 पर्यंत प्रकरणात एकदाही हजर राहिलेला नसून गैरअर्जदार यांच्या ‘’नो क्लेम बोनस’’ च्या कथनावर कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही. यावरुन अर्जदाराने सदरील पॉलिसी घेणेपुर्वी पुर्वीच्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई स्विकारलेली असल्याचे स्पष्ट होते व ही बाब अर्जदाराने पॉलिसी घेतांना गैरअर्जदार यांचेपासून लपवून ठेवलेली असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.