::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–31 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्तीने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली तक्रार विरुध्दपक्षांनी रद्द केलेल्या विमान तिकिटाची रक्कम परत न केल्याने व इतर अनुषंगिक मागण्यांसाठी विरुध्दपक्षां विरुध्द दाखल केली आहे.
02. तक्रारकर्तीचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही नागपूर शहरात प्रसुती तज्ञ म्हणून वैद्दकीय व्यवसाय करते. विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमान वाहतुक सेवा देणारी कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) हे विरुध्दपक्ष क्रं-1) चे नागपूर येथील अधिकारी असून, विरुध्दपक्ष क्रं-1) विमान कंपनीचा संपूर्ण व्यवसाय हा विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेच नियंत्रणा खाली असतो.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने विरुध्दपक्ष विमान कंपनीचे विमान 6-ई-134 चे दिनांक-30/04/2012 रोजीचे सकाळी-07.40 वाजताचे नागपूर ते दिल्ली या प्रवासाचे तसेच विमान-6-ई-135 चे दिनांक-01/05/2012 रोजीचे सकाळी-09.05 वाजताचे दिल्ली ते नागपूर परतीचे विमान प्रवासाचे तिकीट रुपये-17,735/- मोबदला बँकेच्या कॉर्डव्दारे अदा करुन दिनांक-29/04/2012 रोजी काढले. सदर तिकिटाचा पीएनआर क्रं-WFJLCE असा आहे. परंतु काही कारणास्तव तक्रारकर्तीला सदर प्रवास रद्द करावा लागला, त्यामुळे तिने विरुध्दपक्ष क्रं-1) विमान कंपनीचे जाण्या-येण्याचे तिकिट रद्द केले. तिकिट रद्द केल्या नंतर विरुध्दपक्ष विमान कंपनीने तिकिटाची रक्कम तक्रारकर्तीचे युनियन बँकेच्या खाते क्रं-543002010002105 मध्ये परस्पर जमा करणे बंधनकारक असताना रद्द झालेल्या तिकिटाची नियमा नुसार देय असलेली रक्कम रुपये-15,835/- जमा केली नाही वा तक्रारकर्तीला ती रक्कम दिली नाही. तक्रारकर्ती आपल्या बँकेच्या खाते उता-याची प्रत या सोबत सादर करीत आहे, ज्यावरुन अशी विमान तिकिट रद्द केल्या नंतर नियमा नुसार देय रक्कम तिचे बँकेच्या खाते उता-यात जमा झाली नसल्याचे दिसून येते. तक्रारकर्ती ही वैद्दकीय व्यवसायात व्यस्त असल्याने तिने श्री हिमांशू बिलाखीया यांचे मार्फतीने विरुध्दपक्षाशी ई मेल व्दारे पत्रव्यवहार केला असता विरुध्दपक्ष विमान कंपनीचे अधिकारी श्री मोहित जैन यांनी दिनांक-03/01/2013 रोजीचे ई-मेल व्दारे कळविले की, तक्रारकर्तीला तिकिटाची रक्कम रुपये-15,835/- दिनांक-04/01/2012 रोजी A.N.R.No.-74678722127069769202613 अन्वये परत केल्याचे कळविले. हा ई-मेल प्राप्त होताच तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा कडे विचारणा केली की, तिचे तिकिट हे एप्रिल-2012 चे असताना त्यापूर्वीचे तारखेत म्हणजे दिनांक-04/01/2012 रोजी अस्तित्वात नसलेल्या तिकीटाचा परतावा कसा शक्य आहे. यावरुन स्पष्ट हेते की, विरुध्दपक्ष विमा कंपनी ही तिकिट प्रवास रद्द केल्या बाबतची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे म्हणून तिने ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्रारकर्तीला रद्द विमान प्रवास तिकिटाची रक्कम रुपये-15,835/- दिनांक-30/04/2012 पासून वार्षिक 18% दराने व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे. याशिवाय तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षा तर्फे नि.क्रं-8 प्रमाणे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीने मंचा समक्ष चुकीची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे आणि तिने मंचा पासून काही बाबी लपवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे तिची तक्रार मंजूर होण्यास पात्र नाही. तक्रारकर्तीने तिकिट खरेदी करण्यासाठी ज्या बँकेचे क्रेडीट कॉर्ड अथवा डेबीट कॉर्डचा वापर केला त्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली नाही. तक्रारकर्तीने युनियन बँकेचा जो खाते उतारा दाखल केलेला आहे त्यावरुन 29.04.2012 रोजी तिचे खात्यातून रुपये-17,735/- एवढी रक्कम डेबीट झाल्याचे दिसून येत नाही. तिकिटाचे आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया ही संगणकीय आहे आणि सर्व पेमेंटस हे ई-बँकींगव्दारे हेत असतात त्यामुळे ज्या खात्या मधून रक्कम प्राप्त झालेली आहे त्याच खात्यामध्ये रक्कम परताव्याची रक्कम जमा होते. संगणकीय रेकॉर्ड प्रमाणे तक्रारकर्तीने तिकीट खरेदी करण्यासाठी ज्या कॉर्डचा वापर केला त्याचे शेवटचे क्रमांक-1224 असे आहे आणि तिला जे विमान तिकीट रद्द केल्या बाबत जो परतावा देण्यात आला तो त्याच खात्यामध्ये देण्यात आला होता ज्या खात्यामधून तिकिट खरेदीच्या रकमेचे पेमेंट करण्यात आले होते आणि त्याचा ARN Number-74678722127069769202613 असा आहे, या संदर्भात विरुध्दपक्ष हे बँकेचे दिनांक-31/10/2013 रोजीचे प्रमाणपत्र सादर करीत आहे, त्यावरुन हे दिसून येते की, विरुध्दपक्षाचे खात्या मधून दिनांक-06 मे, 2012 रोजी रकमेचा परतावा करण्यात आलेला आहे आणि आता विरुध्दपक्षाला काहीही देणे रक्कम नाही. विरुध्दपक्ष हे आपल्या व्यवसायीक व्यवहाराच्या संगणकीय प्रती सादर करीत आहेत, ज्यावरुन दिसून येईल की, तक्रारकर्तीला तिचे रद्द केलेल्या तिकिटाच्या रकमेचा परतावा मिळालेला आहे. तक्रारकर्तीला सदरील बाब विरुध्दपक्षाचे दिनांक-28/09/2012 आणि दिनांक-07/01/2013 चे ई मेल व्दारे कळविलेली आहे. तक्रारकर्तीने परताव्याच्या रकमेची शहानिशा न करता विरुध्दपक्षा विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षांव्दारे अभिलेखावरील दाखल दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले.. उभय पक्षांनी दाखल केलेले लेखी दस्तऐवज व युक्तीवादा वरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
05. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष विमान कंपनीचे दिनांक-30/04/2012 रोजीचे सकाळचे नागपूर ते दिल्ली या प्रवासाचे तसेच दिनांक-01/05/2012 रोजीचे सकाळचे दिल्ली ते नागपूर परतीचे विमान प्रवासाचे तिकीट युनियन बँकेच्या कॉर्डव्दारे रुपये-17,735/- अदा करुन दिनांक-29/04/2012 रोजी काढले या बद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. तसेच पुढे तक्रारकर्तीने नागपूर ते दिल्ली येथे जाण्या-येण्याचा प्रवास रद्द केला व तिला नियमा नुसार रुपये-15,835/- एवढी तिकिट परताव्याची रककम नियमा नुसार देय होती या बद्दलही उभय पक्षांमध्ये विवाद नाही.
06. उभय पक्षांमधील विवादाचा संक्षीप्त मुद्दा असा आहे की, तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष विमान कंपनीने तिकिटाची रक्कम तिचे युनियन बँकेच्या खाते क्रं-543002010002105 मध्ये परस्पर जमा करणे बंधनकारक असताना रद्द झालेल्या तिकिटाची नियमा नुसार देय असलेली रक्कम रुपये-15,835/- जमा केली नाही वा तक्रारकर्तीला ती रक्कम दिली नाही. तिने अशी रक्कम आपल्या युनियन बँकेच्या खाते उता-यात जमा झाली नसल्या संबधाने बँकेच्या खाते उता-याची प्रत पुराव्या दाखल सादर केलेली आहे.
07. या उलट विरुध्दपक्षांचे असे म्हणणे आहे की, संगणकीय रेकॉर्ड प्रमाणे तक्रारकर्तीने तिकीट खरेदी करण्यासाठी ज्या कॉर्डचा वापर केला त्याचे शेवटचे क्रमांक-1224 असे आहे आणि तिला विमान तिकीट रद्द केल्या बाबत जो परतावा देण्यात आला तो त्याच खात्यामध्ये देण्यात आला होता ज्या खात्यामधून तिकिट खरेदीच्या रकमेचे पेमेंट करण्यात आले होते आणि त्याचा ARN Number-74678722127069769202613 असा आहे.
विरुध्दपक्षां तर्फे तक्रारकर्तीला तिने रद्द केलेल्या तिकिटांचे परताव्याची रककम परत करण्यात आली याचे पुराव्यार्थ दिनांक-31 ऑक्टोंबर, 2013 रोजीचे पत्राची प्रत दाखल करण्यात आली, जे पत्र आयसीआयसीआय बँके तर्फे विरुध्दपक्षाला देण्यात आलेले आहे, त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद केलेले आहे-
Mid- 50193464
Location- Nagpur
Card No.- 421368********1224
Txn.Date- 29th April, 12.
Txn.Amt.- 15,835/-
Refund Date- 06th May,12
ARN No.- 74678722127069769202613
विरुध्दपक्ष कंपनी तर्फे त्यांचे व्यवहाराचा उतारा पुराव्या दाखल सादर करण्यात आला. त्यामध्ये 421368********1224 दिनांक-05/06/2012 रोजी रुपये-15,835/- परत केल्याची नोंद दिसून येते.
08. परंतु तक्रारकर्तीने प्रतिउत्तरा मध्ये ही बाब खोडून काढलेली आहे. तिने पुराव्यार्थ तिचे युनियन बँक ऑफ इंडीयाचे खाते उता-याची प्रत दाखल केली, त्यामध्ये तिने विरुध्दपक्ष कंपनीला विमान तिकिट खरेदीसाठी दिनांक-29/04/2012 रोजी रुपये-17,735/- पेमेंट केल्याची नोंद आहे मात्र दिनांक-06 मे,2012 रोजी विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी तिचे खात्यात रुपये-15,835/- तिकिट रद्द केल्या बाबत परताव्याची रक्कम परत केली असल्या बाबत कोणतीही नोंद दिसून येत नाही. उलट खाते उता-या मध्ये दिनांक-06/05/2012 रोजी तक्रारकर्तीने 1000/- उचल केल्याची नोंद दिसून येते.
09. मंचाचे मते, ज्याअर्थी विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे ज्या खात्यातून विमान तिकिट खरेदीसाठी पेमेंट करण्यात आले, त्याच खात्यामध्ये तिकिट रद्द केल्या नंतर परताव्याची रक्कम जमा केली जाते. विरुध्दपक्षांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तिकिट परताव्याची रक्कम तक्रारकर्तीचे बँक खात्यात जमा केली तर ती रक्कम तक्रारकर्तीचे युनियन बँकेच्या खात्यात जमा होणे आवश्यक होते परंतु तशी रक्कम जमा झाल्याची नोंद तक्रारकर्तीचे खाते उता-या वरुन दिसून येत नाही. तक्रारकर्ती ही उच्चशिक्षीत स्त्री रोग प्रसुती तज्ञ आहे आणि तिला विरुध्दपक्षा विरुध्द मंचा समक्ष खोटी तक्रार तसेच खोटे प्रतिज्ञालेख सादर करण्याचे करण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. विरुध्दपक्ष कंपनीने परत केलेली रक्कम तिचे खात्यात जमा झालेली नाही ही वस्तुस्थिती दिसून येते, या बाबतीत तक्रारकर्तीने वारंवार ई मेल व्दारे कळवूनही विरुध्दपक्ष कंपनीने तिचे तक्रारीवर शहानिशा केली नसल्याचे दिसून येते.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र असून आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहेत-
::आदेश::
1) तक्रारकर्ती डॉ.वैदेही विरल शाह यांची विरुध्दपक्ष क्रं-1) इंटर ग्लोब एव्हीएशन लिमिटेड मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी गुडगाव (हरीयाणा) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) इंटर ग्लोब एव्हीएशन लिमिटेड मार्फत मॅनेजर, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिकिट परताव्याची नियमा नुसार देय असलेली रक्कम रुपये-15,835/- (अक्षरी रुपये पंधरा हजार आठशे पस्तीस फक्त) दिनांक-06/05/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह परत करावी.
3) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्रारकर्तीला द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.