Dated the 25 Jun 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
- सामनेवाले ही सहकारी बँक आहे. सामनेवाले क्र. 2 ही कुरियर कंपनी आहे. तक्रारदार या ठाणे येथील महिला रहिवासी आहेत. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांचे दोन धनादेश हरवल्याच्या बाबीमधून प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले क्र. 1 यांचे बँकेमध्ये तक्रारदारांचे बचत खाते क्र. 13289 असून त्यांनी सदर बचत खात्यामध्ये धनादेश क्र. 872799 रु. 2 लाख व धनादेश क्र. 876810 रु. 1,15,000/- हे जनसेवा सहकारी बँक, पुणे या बँकेवर काढलेले दोन धनादेश वठविण्यासाठी जमा केले. तथापि सदर धनादेश एक्सीडस् अॅरेंजमेंट, प्लीज प्रेझेन्ट अगेन ( Exceeds Arrangement Please Present again) या मेमोसह जनसेवा सहकारी बँक, पुणे यांचेकडून सामनेवाले क्र. 1 यांचेकडे आले व सामनेवाले क्र. 1 यांनी ही बाब दि. 04/03/2008 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांना कळविली. सदर पत्रानुसार तक्रारदारांनी सदर दोनही धनादेश पुन्हा दि. 02/04/2008 रोजी बचत खाते क्रमांक 13289 मध्ये जमा केले. तथापि, यानंतर बराच काळ सामनेवाले क्र. 1 यांनी सदर दोन धनादेशांबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी दि. 26/05/2008 रोजी तक्रारदारांना कळविले की, तक्रारदारांचे नमूद 2 धनादेश जनसेवा सहकारी बँक, पुणे यांचेकडे वठविण्यासाठी सामनेवाले 2 या कुरियर संस्थेमार्फत पाठविले असता ते प्रवासामध्ये दि. 8/4/2008 रोजी गहाळ झाले. त्याबाबत पोलिस तक्रार दाखल केली आहे. धनादेश बराच काळ न सापडल्याने तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांना पत्र पाठवून धनादेश परत करण्याची मागणी केली. परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन दोन धनादेशांची एकूण रक्कम रु. 3.15 लाख 10% व्याजासह मिळावी, अशी मागणी केली आहे.
- अ. सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी कैफियत दाखल करुन असे नमूद केले की तक्रारदारांचे धनादेश हरवल्याची बाब ही खरी असून ती सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना पत्राद्वारे कळविली होती. यानंतर तक्रारदारांना ज्या व्यक्तीकडून धनादेश मिळाले त्यांच्याकडून गहाळ धनादेशाच्याऐवजी नविन धनादेश घेऊन वटविण्यासाठी जमा करणे आवश्यक नव्हेच तर, ती त्यांची जबाबदारी असतांना तक्रारदारांनी तसे न केल्याने ती तक्रारदारांची चूक आहे. त्यामुळे सामनेवाले क्र. 1 यांचा कोणताही निष्काळजीपणा अथवा सदोष सेवा नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
ब. सामनेवाले क्र. 2 यांनी कैफियत दाखल करुन तक्रारदारांची पूर्ण तक्रार नाकारली व असे नमूद केले की सामनेवाले क्र. 1 यांजकडून जनसेवा सहकारी बँक यांना दयावयाचे धनादेश त्यांनी पुणे विभागात डिलीव्हरी करण्यासाठी त्यांना नेमलेले स्कायलार्क एक्सप्रेस कुरियर यांचेकडे दिले. तथापि, सदर कुरियर संस्थेने धनादेशाचे पाकीट हरवले त्यामुळे स्कायलार्क एक्सप्रेस कुरियर हे जबाबदार आहेत. त्यांना सदर तक्रारीमध्ये समाविष्ट केले नसल्याने सामनेवाले क्र. 2 यांची प्रकरणात कोणतीही जबाबदार नाही.
- प्रकरणात तक्रारादार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या सर्व प्लिडींगस् चे कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः
- तक्रारदारांचे सामनेवाले क्र. 1 यांचे बँकेमध्ये बचतखाते क्र. 13289 असल्याची बाब, सदर खात्यामध्ये रु. 2 लाख रकमेचा धनादेश क्र. 872799 व रु. 1.15 लाख रकमेचा धनादेश क्र. 876810 असे एकूण रु. 3.15 लाख रकमेचा समावेश असलेले जनसेवा सहकारी बँक, पुणे या बँकेवर काढलेले 2 धनादेश वटविण्यासाठी तक्रारदारांनी जमा केल्याची बाब सामनेवाले क्र. 1 यांनी मान्य केली आहे. सदर दोन धनादेश न वटता जनसेवा सहकारी बँकेने Exceed Arrangement, please present again, या मेमोसह सामनेवाले क्र. 1 यांचेकडे पाठविले व ही बाब सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना दि. 04/03/2008 रोजीच्या पत्रान्वये कळविली ही बाबही उभयपक्षी मान्य आहे. यानंतर तक्रारदारांनी सदर धनादेश वटविण्यासाठी पुन्हा बचत खाते क्र. 13289 मध्ये दि. 02/04/2008 रोजी जमा केले व सदर धनादेश सामनेवाले क्र. 1 यांनी जनसेवा सहकारी बँक, पुणे यांचेकडे सामनेवाले क्र. 2 या कुरियर एजन्सीद्वारे पाठविले असता प्रवासादरम्यान दि. 08/04/2008 रोजी गहाळ झाल्याची बाबसुध्दा सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी मान्य केली आहे.
(ब) सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांचे रु. 3.15 लाख समावेश असलेले जनसेवा सहकारी बँकेवर काढलेले 2 धनादेश सामनेवाले क्र.1 यांचेकडे वटविण्यासाठी खात्यामध्ये जमा केल्यानंतर जनसेवा सहकारी बँकेस प्राप्त होण्यापूर्वीच सामनेवाले क्र. 1 यांच्या कुरियर संस्थेने गहाळ केल्याची बाब मान्य केली असल्याने तक्रारदारांच्या मागणीनुसार सामनेवाले क्र. 1 हे धनादेशामध्ये समाविष्ट असलेली रक्कम रु. 3.15 लाख मिळण्यास पात्र आहेत का? हे पाहणे आवश्यक आहे. यासंदर्भात असे नमूद करावेसे वाटते की, तक्रारदारांचे धनादेश हरवल्याची बाब सामनेवाले क्र. 1 यांनी दि. 26/5/2008 रोजी कळविल्यानंतर तक्रारदारांनी सदर बाब त्यांना ज्या व्यक्तीकडून धनादेश मिळाले त्यांच्या निदर्शनास आणून हरवलेल्या धनादेशाचे अधिदान रोखून ठेवण्याची सूचना जनसेवा सहकारी बँक, पुणे यांना देऊन त्या दोन गहाळ धनादेशाच्याऐवजी तेवढयाच रकमेचे नविन धनादेश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी दि. 26/5/2008 ते तक्रार दाखल दिनांक 30/07/2010 पर्यंतच्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये अशी कृती केल्याबाबत कोणताही पुरावा अथवा तक्रारदारांचे भाष्य आढळून येत नाही.
क. तक्रारदारांनी जमा केलेले नमूद दोन धनादेश तक्रार दाखल करेपर्यंत अथवा तद्नंतरच्या कालावधीमध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीने वटविल्याची अथवा त्या रकमेची अफरातफर (Misappropriate) केल्याची बाब अभिलेखावर किंवा उभय पक्षांच्या प्लिडींगस् मध्ये नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये वठवणूकीसाठी पाठविण्यात आलेले धनादेश प्रवासादरम्यान गहाळ झाले असल्याने म्हणजेच त्याचे अधिदान अदयाप झाले नसल्याने सामनेवाले बँकेस धनादेशामधील रकमेस जबाबदार धरणे अनुचित होईल. मा. राष्ट्रीय आयोगाने श्री. अे.बी. बोपान्ना वि. कोडागू डिस्टि्रक्ट को. ऑपरेटीव्ह सेंट्रल बँक, रिव्हीजन पिटीशन क्र. 5/2005 आदेश दि. 17/12/2008 या अगदी अशाच प्रकारच्या धनादेश गहाळ झाल्याच्या प्रकरणामध्ये सामनेवाले बँकेच्या धनादेश गहाळ करण्याच्या जबाबदारीबाबत खालीलप्रमाणे मत व्यक्त केले आहेः
“ It is not disputed before us that the cheque of Rs.21,000/- deposited by the petitioner has not been encashed. The cheque was lost in transit somewhere and was not traced. If the cheque sent for encashment is not traced or not honoured, there cannot be any liability on the respondent for the cheque amount. The liability, if any, can be limited to the deficiency in service.”
याशिवाय स्टेट बँक ऑफ पतियाला वि. राजेन्दर लाल आणि इतर IV (2003) CPJ 53 (NC) या प्रकरणामध्येसुध्दा धनादेश गहाळ प्रकरणी बँकेस धनादेशाची रक्कम देण्यास जबाबदार न धरता धनादेश गहाळ करण्याच्या बँकेच्या कृतीबद्दल व धनादेशाच्या रकमेबद्दल त्यांचेविरुध्द फौजदारी/दिवाणी दावा दाखल करण्याची मुभा असल्याने मा. राष्ट्रीय आयोगाने केवळ धनादेश हरवण्याच्या कसूरदार सेवेबद्दल बँकेस जबाबदार धरुन नुकसान भरपार्इ देण्याचे आदेश दिले.
मा. राष्ट्रीय आयोगाचे उपरोक्त आदेश विचारात घेता, तक्रारदारांची धनादेशामधील समाविष्ट रक्कम रु. 3.15 लाख मिळण्याची तक्रारादारांची गणी अयोग्य असल्याने ती नाकारणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
वास्तविक, तक्रारदारांनी ज्या व्यक्तीकडून धनादेश मिळाले त्या व्यक्तीकडून नविन धनादेश प्राप्त करुन वटवणूकीची पुढील कार्यवाही करणे आवश्यक असतांना तसे केल्याचे दिसून येत नाही. शिवाय धनादेशामध्ये समाविष्ट असलेली रक्कम मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडे दाद मागणे अनिर्वाय असतांना तशी कृती केल्याचे दिसून येत नाही.
5. सामनेवाले क्र. 2 यांचा तक्रारदारांना सेवा पुरविण्याबाबत संबंध येत नसल्याने त्यांच्याविरुध्द आदेश नाही.
उपरोक्त चर्चेनुरुप व निकषानुसार सामनेवाले क्र. 1 यांना धनादेशामधील समाविष्ट रक्कम रु. 3.15 लाख या रकमेबाबत जबाबदार न धरता धनादेश गहाळ करण्याच्या कसूरदार सेवेबद्दल जबाबदार धरण्यात येते व त्यानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
- तक्रार क्र. 289/2010 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांचे वटवणूकीसाठी स्विकारलेले धनादेश गहाळ करुन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराचे धनादेश गहाळ करण्याच्या कसूरदार सेवेबद्दल रु. 75,000/- इतकी नुकसान भरपाई दि. 31/07/2015 पूर्वी तक्रारदारांना अदा करावी. सदर आदेशपूर्ती दि. 31/07/2015 पूर्वी न केल्यास आदेशपूर्ती होईपर्यंत दि. 01/08/2015 पासून 12% व्याजासह संपूर्ण रक्कम अदा करावी.
- तक्रार खर्चाबद्दल रु. 10,000/- सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना दि. 31/07/2015 पूर्वी दयावे.
- सामनेवाले क्र. 2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- आदेशपूर्ती झालेबद्दल/न झालेबद्दल उभय पक्षांनी दि. 10/08/2015 रोजी शपथपत्र दाखल करावे.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विनाशुल्क देण्यात याव्यात.