जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 53/2023. तक्रार दाखल दिनांक : 15/02/2023. तक्रार निर्णय दिनांक : 18/12/2023.
कालावधी : 00 वर्षे 10 महिने 03 दिवस
1. श्रीमती कल्पना भ्र. चंद्रकांत वानखेडे, वय : 38 वर्षे, व्यवसाय : गृहिणी,
रा. 14085/78/1, अवंती नगर, बार्शी रोड, लातूर - 413 512.
2. कु. सुहानी पिता चंद्रकांत वानखेडे, वय : 13 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. 14085/78/1, अवंती नगर, बार्शी रोड, लातूर - 413 512.
3. चि. श्रमण पिता चंद्रकांत वानखेडे, वय : 11 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. 14085/78/1, अवंती नगर, बार्शी रोड, लातूर - 413 512.
(तक्रारकर्ते क्र.2 व 3 अज्ञान असून त्यांच्याकरिता पालनकर्ती आई
तक्रारकर्ती क्र.1 श्रीमती कल्पना भ्र. चंद्रकांत वानखेडे) तक्रारकर्ते
विरुध्द
1. आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
नोंदणीकृत कार्यालय : आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड हाऊस, 414,
वीर सावरकर मार्ग, सिध्दी विनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई - 400 025.
2. आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड हेल्थ केअर, आय.सी.आय.सी.आय. बँक टॉवर,
प्लॉट नं. 12, फायनान्शीयल डिस्ट्रीक्ट, नानाक्रम गुडा, गोचीबोवली, हैद्राबाद - 500 032.
3. आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
शाखा कार्यालय : लातूर, हॉटेल व्यंकटेश, तिसरा मजला,
औसा रोड, लातूर - 413 512 यांचेकरिता :- Branch Service Manager.
4. आय.सी.आय.सी.आय. होम फायनान्स, शाखा : लातूर, सोनवणे कॉम्प्लेक्स,
दुसरा मजला, कामदार पेट्रोल पंपाशेजारी, मेन रोड, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- उमाकांत व्यं. पाटील
विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.4 : एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती क्र.1 ह्या कै. चंद्रकांत वासुदेव वानखेडे (यापुढे 'विमाधारक चंद्रकांत') यांच्या पत्नी आहेत आणि तक्रारकर्ते क्र. 2 व 3 हे त्यांची मुले आहेत. विमाधारक चंद्रकांत यांनी विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे 'आयसीआयसीआय होम फायनान्स') यांच्याकडून गृहकर्ज घेतलेले होते आणि गृहकर्जाचा खाते क्र. NHLAT00001247590 आहे. आयसीआयसीआय होम फायनान्सच्या सूचनेनुसार विमाधारक चंद्रकांत यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 (यापुढे 'आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स') यांच्याकडून विमापत्र घेतले होते. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने दि.14/7/2017 रोजी विमाधारक चंद्रकांत यांना दि.30/6/2017 ते 29/6/2022 कालावधीकरिता विमा प्रमाणपत्र क्र. 4080/IBHFCLL/133105590/00/000 निर्गमीत केले. विमापत्रानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सन विमाधारक चंद्रकांत यांची रु.10,08,100/- रकमेची विमा जोखीम स्वीकारलेली होती.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि. 26 जानेवारी, 2022 रोजी विमाधारक चंद्रकांत यांना अचानक पोटामध्ये तीव्र व असह्य वेदना, मळमळ उलट्या व श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर अतिदक्षता कक्षामध्ये वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. विमाधारक चंद्रकांत यांना मुत्रपिंडाचा आजार असल्याचे व dialysis करावे लागेल, असे सांगण्यात आले. मयत विमाधारक यांचे dialysis करण्यात आले; परंतु त्याच दिवशी रात्री 9.30 वाजता कै. चंद्रकांत मृत्यू पावले.
(3) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, विमाधारक चंद्रकांत यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती क्र.1 यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. मात्र आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने दि.12/3/2022 रोजीच्या पत्राद्वारे दि.29/1/2022 रोजीच्या Emergency Certificate चा आधार घेऊन विमाधारक चंद्रकांत यांना गंभीर आजार असल्यासंबंधी पुरावा नसल्याचे खोटे व चूक कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्ती यांना दि.6/4/2022 रोजी आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटीकल केअर ॲन्ड डायलिसीस सेंटर, लातूर यांच्याकडून विमाधारक चंद्रकांत यांचे Final Death Certificate प्राप्त झाल्यानंतर विहीत मुदतीमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडे दाखल केले. त्यानंतर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विमा रकमेची मागणी केली असता विमापत्राप्रमाणे रु.10,08,100/- विमा रक्कम देण्याकरिता टाळाटाळ केलेली आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून विमा रकमेची मागणी केली असता दखल घेतलेली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.10,08,100/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई देण्यासाठी व ग्राहक तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्याचा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(4) आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने अभिलेखावर लिखीत निवेदनपत्र सादर केले. ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने खोटे असल्याचे नमूद करुन अमान्य केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ते यांच्याकडून विमा दावा प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करुन दि.12/3/2022 रोजी त्यामध्ये निर्णय घेण्यात येऊन दावा नाकारलेला आहे. वैद्यकीय माहितीनुसार विमाधारक चंद्रकांत यांना Major Medical Illness नसल्यामुळे विमा प्रस्ताव बंद करण्यात आला. विमाधारक चंद्रकांत यांना कोणताही गंभीर आजार नव्हता आणि त्यांना गंभीर आजार असल्यासंबंधी तक्रारकर्ती क्र.1 यांनी पुरावा दिलेला नाही. विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार Major Medical Illness असल्यास विमापत्राचा लाभ मिळतो. संपूर्ण वैद्यकीय कागदपत्रांची छाननी केली असता तक्रारकर्ते यांचा विमा दावा विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये संरक्षीत होत नसल्यामुळे नाकारला आणि त्याप्रमाणे तक्रारकर्ती क्र.1 यांस दि.12/3/2022 रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. तक्रारकर्ती क्र.1 यांनी विधिज्ञांमार्फत बेकायदेशीर सूचनापत्र पाठविल्यामुळे त्याचे उत्तर देण्यात आलेले नाही. त्यांनी तक्रारकर्ते यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) आयसीआयसीआय होम फायनान्स यांना सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहून त्यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने तक्रारकर्ती क्र.1 यांचा
विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, विमाधारक चंद्रकांत यांनी आयसीआयसीआय होम फायनान्स यांच्याकडून गृहकर्ज घेतले; आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने विमाधारक चंद्रकांत यांना विमा प्रमाणपत्र क्र. 4080/IBHFCLL/133105590/00/000 निर्गमीत केले; विमापत्रानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांनी विमाधारक चंद्रकांत यांची रु.10,08,100/- रकमेची विमा जोखीम स्वीकारली इ. बाबी वादग्रस्त नाहीत.
(8) तक्रारकर्ती क्र.1 यांच्याकडून विमा दावा प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्ण पडताळणी केली असता विमाधारक चंद्रकांत यांना Major Medical Illness नव्हता आणि त्यांना गंभीर आजार असल्यासंबंधी पुरावा दिलेला नाही; तसेच, विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये विमा दावा संरक्षीत होत नसल्यामुळे दि.12/3/2022 रोजीच्या पत्राद्वारे नाकारण्यात आला, असे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने नमूद केलेले आहे.
(9) उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमाधारक चंद्रकांत यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती क्र.1 यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडे विमा दावा दाखल केला आणि तो विमा दावा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने दि.12/3/2022 रोजीच्या पत्राद्वारे नामंजूर केला, ही उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे.
(10) प्रामुख्याने, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने विमा दावा नामंजूर करण्यासाठी दिलेले कारण खालीलप्रमाणे आहे.
Sr. No. | Policy Condition | Clause(s) |
1 | Part II of The Schedule 2.1 Section I (Major Medical Illness And Procudure) | There is no evidence of any of the Major Medical Illness / Procedure defined and covered under the policy. |
Remarks | As per Emergency Certificate of Icon Super Speciality Hospital, Latur dated 29 Jan. 2022, Insured was hospitalized for Hypertension, Diabetes, Factor XIII Deficiency with Massive Gastro Intenstinal Bleeding with Hemarrhagic Shock and Acute Kidney Injury and expired on 26 Jan. 2022. On further verification there is no evidence of any Major Medical Illness and Procedure as defined and covered under the policy. Hence the claims falls outside the purview of policy terms and conditions. |
(11) असे दिसते की, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने विमा दावा नामंजूर करण्यासाठी विमापत्राच्या कथित अटीचा आधार घेतलेला आहे. तसेच, विमा दावा नामंजूर करणा-या पत्रामध्ये व लेखी निवेदनपत्रामध्ये विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा नामंजूर केल्याचे नमूद दिसते.
(12) तक्रारकर्ते यांच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विमाधारक चंद्रकांत यांचे मुत्रपिंड निकामी झाले होते आणि तो गंभीर आजार असल्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने चुकीच्या कारणास्तव तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उलटपक्षी, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विमाधारक चंद्रकांत यांच्या मृत्यूचे Final Death Certificate त्यांना प्राप्त झाल्यासंबंधी तक्रारकर्ते यांचे कथन खोटे आहे. तक्रारकर्ती यांचा विमा दावा विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार नामंजूर केला असून विमाधारक चंद्रकांत यांना गंभीर आजार नव्हता. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या विधिज्ञांनी असेही निवेदन केले की, तक्रारकर्ते यांनी सादर केलेले न्यायनिर्णय लागू पडत नाहीत.
(13) असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी दि.6/1/2023 रोजी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांना विधिज्ञांमार्फत कायदेशीर सूचनापत्र पाठविलेले होते. त्यामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांच्याकडे Final Death Certificate दिल्याचे नमूद असून विमा रक्कम देण्याकरिता कळविलेले आहे. आमच्या मते, यदाकदाचित आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांना Final Death Certificate प्राप्त झालेले नव्हते तर त्याचवेळी तक्रारकर्ते यांच्या सूचनापत्रास उत्तर देऊन त्यासंबंधी खुलासा करता आला असता. परंतु आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने त्यासंबंधी कोणतीही दखल घेतलेली नाही. इतकेच नव्हेतर, तक्रारकर्ती क्र.1 यांनी विमा दाव्यासोबत विमाधारक चंद्रकांत यांच्या वैद्यकीय उपचाराचे Discharge Card दिलेले असून त्यामध्ये स्पष्टपणे Clinical Diagonsis : HTNc DM IIc Factor XIII deficiency c Massive GI Bleed c Hemorrhagic shock c AKI requiring dialysis. असा उल्लेख आढळतो. अशा स्थितीत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांचा बचाव तथ्यहीन असल्यामुळे ग्राह्य धरता येणार नाही.
(14) आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचा मुख्य बचाव असा की, विमाधारक चंद्रकांत यांना Major Medical Illness नव्हता आणि विमा दावा विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये संरक्षीत होत नसल्यामुळे दावा नामंजूर केलेला आहे.
(15) तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर विमा प्रमाणपत्र दाखल केले आहे. विमा प्रमाणपत्राच्या Section रकान्यामध्ये I. Major Medical Illness & Procedure नमूद आहे. तसेच Coverage रकान्यामध्ये (a) First Diagnosis of the below-mentioned Illness more specifically described below :
1) Cancer of specified severity
2) Kidney failure requiring regular Dialysis
3) Multiple Scelerosis with persisting symptoms
4) ..........................................
अशा प्रकारच्या अन्य आजारांचाही उल्लेख तेथे आढळतो.
(16) विमाधारक चंद्रकांत यांच्यावर वैद्यकीय उपचार करणा-या आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांनी दि.29/1/2022 रोजी दिलेल्या Emergency Certificate मध्ये खालीलप्रमाणे मजकूर आढळतो.
This is to certify that Mr. Wankhede Chandrakant Employed in MSEDCL was admitted in Icon Superspacility Hospital from 26-1-22 at 1:30 pm to 26-1-22 at 9:35 pm as an emergency patient for the complaints of severe abdominal pain, nausea vomiting, breathlessness c advised emergency admission. He was detected with HTNc DM IIc Factor XIII Deficiency c Massive GI Bleed c Hemorrhagic shock c AKI; But he was expired on 26-1-22 at 9:35 pm. Certified that after emergency treatment the patient was expired.
विमाधारक चंद्रकांत यांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांनी दिलेल्या Discharge Card मध्ये खालीलप्रमाणे मजकूर आढळतो.
Clinical Diagonsis : HTNc DM IIc Factor XIII deficiency c Massive GI Bleed c Hemorrhagic shock c AKI requiring dialysis.
विमाधारक चंद्रकांत यांच्या मृत्यूसंबंधी त्यांच्यावर उपचार करणा-या आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांनी दि.6/4/2022 रोजी दिलेल्या Final Death Certificate मध्ये खालीलप्रमाणे मजकूर आढळतो.
This is to certify that Mr. Wankhede Chandrakant Employed in MSEDCL was admitted in Icon Superspacility Hospital from 26-1-22 at 1:30 pm to 26-1-22 at 9:35 pm as an emergency patient for the complaints of Severe abdominal pain, Nausea vomiting, Breathlessness c Advised emergency admission. He was detected with HTN c DM II c Factor XIII Deficiency c massive GI Bleed c Hemorrhagic shock c AKF (Acute Renal Failure). He was in need of permanant Haemodialysis. But his condition was not good enough to do Hemodialysis. We do dialysis for only 2 hours.
He was expired on 26-1-22 at 9:35 pm. Certified that after emergency treatment the patient was expired.
(17) अभिलेखावर दाखल Discharge Card, Emergency Certificate व Final Death Certificate पाहता विमाधारक चंद्रकांत यांना Acute Kidney Injury / Acute Renal Failure आजार झालेला होता आणि परिणामी त्यांचे 2 तास Dialysis सुध्दा केले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. विमाधारक चंद्रकांत यांचा अचानक झालेला मृत्यू व आजाराचे स्वरुप पाहता त्यांना निश्चितच मुत्रपिंडासंबंधी गंभीर स्वरुपाचा आजार होता, हे मान्यच करावे लागेल. निर्विवादपणे, विमा प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता Kidney failure requiring regular Dialysis म्हणजेच मुत्रपिंड निकामी होऊन नियमीत Dialysis करण्याची आवश्यकता असल्यास त्याकरिता विमा जोखीम लागू पडते. विमाधारक चंद्रकांत यांना Acute Kidney Injury / Acute Renal Failure आजार असल्यामुळे त्यांचे Dialysis केले होते आणि करणे आवश्यक होते. विमा प्रमाणपत्राच्या तरतुदीनुसार Acute Renal Failure आजार हा Major Medical Illness असल्यामुळे विमा संरक्षीत ठरतो. उलटपक्षी, विमाधारक चंद्रकांत यांचा Acute Renal Failure आजार विमा प्रमाणपत्रानुसार संरक्षीत नाही, हे सिध्द करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. इतकेच नव्हेतर, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने वैद्यकीय अन्वेषण अहवाल किंवा वैद्यकीय तज्ञांचे मत किंवा अन्य अनुषंगिक स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. पुढे असेही आढळते की, तक्रारकर्ते यांचा विमा दावा विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये संरक्षीत होत नाही, या बचावापृष्ठयर्थ आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने तक्रारकर्ते किंवा विमाधारक चंद्रकांत यांच्याकडून विमापत्राच्या कोणत्या अटी व शर्तीचे किंवा अपवर्जन कलमाचे उल्लंघन झाले किंवा कशाप्रकारे अटी व शर्तीनुसार विमा दावा संरक्षीत होत नाही, हे सिध्द केलेले नाही. तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने विमापत्राच्या कोणत्याही अटी किंवा शर्ती दाखल केलेल्या नाहीत.
(18) तक्रारकर्ते यांच्यातर्फे अभिलेखावर मा. सर्वोच्च न्यायालयाचा 'जे एस के इंडस्ट्रीज प्रा. लि. /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.' 2022 LiveLaw (SC) 884, तसेच 'लख्मी चंद /विरुध्द/ रिलायन्स जनरल' सिव्हील अपील नं. 49-50/2016 निर्णय दि. 7/1/2016 व मा. राष्ट्रीय आयोगाच्या 'न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ सुरींदर सिंग' रिव्हीजन पिटीशन नं. 1246/2014 निर्णय दि. 10/7/2020 या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर करण्यात आला.
(19) तक्रारकर्ते यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 'लख्मी चंद /विरुध्द/ रिलायन्स जनरल इन्शुरन्स' या प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.
18. It becomes very clear from a perusal of the above mentioned case law of this Court that the insurance company, in order to avoid liability must not only establish the defence claimed in the proceeding concerned, but also establish breach on the part of the owner/insured of the vehicle for which the burden of proof would rest with the insurance company.
(20) उक्त न्यायिक प्रमाण पाहता प्रस्तुत प्रकरणामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने विमाधारक चंद्रकांत यांचा विमा दावा विमापत्रानुसार संरक्षीत नव्हता, हे सिध्द केलेले नाही.
(21) तक्रारकर्ते यांच्यातर्फे सादर केलेल्या 'जे एस के इंडस्ट्रीज प्रा. लि. /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.' व 'न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ सुरींदर सिंग' न्यायनिर्णयांमध्ये विमा दावा नामंजूर करणा-या मुद्यांव्यतिरिक्त अन्य बचाव किंवा मुद्दे नंतर विमा कंपनीस उपस्थित करता येणार नाहीत, असे न्यायिक प्रमाण आढळते.
(22) उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ती क्र.1 यांनी दाखल केलेला विमा दावा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने चूक व अयोग्य कारणास्तव नामंजूर केल्याचे सिध्द होते. त्या अनुषंगाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. विमा प्रमाणपत्रानुसार रु.10,08,100/- विमा रक्कम निश्चित केलेली आहे. विमा प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्ती क्र.1 यांना नामनिर्देशीत केलेले आहे. अशा स्थितीत, तक्रारकर्ते हे रु.10,08,100/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(23) तक्रारकर्ते यांनी विमाधारक चंद्रकांत यांच्या मृत्यू तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील.
(24) तक्रारकर्ते यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, विमा दावा नांजूर केल्यामुळे तक्रारकर्ते यांना आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडे त्यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ते यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(25) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने यांनी तक्रारकर्ते यांना रु.10,08,100/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने तक्रारकर्ते यांना उक्त रकमेवर दि.15/2/2023 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 53/2023.
(3) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(5) विरुध्द पक्ष क्र.4 आयसीआयसीआय होम फायनान्स यांच्याविरुध्द आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-