तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(20/08/2013)
प्रस्तुतची तक्रार ही ग्राहकाने जाबदेणारांविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटी केल्यामुळे दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालील प्रमाणे आहेत.
1] तक्रारदार यांनी जुलै 2011 मध्ये दैनिक सकाळमधील जाबदेणार यांची फर्निचर तयार करण्याबाबतची जाहीरात वाचली व त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जाबदेणार व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तक्रारदार यांच्या घरी आले व तक्रारदार यांच्या सांगण्यावरुन मास्टर बेडरुममध्ये एक वॉर्डरोब व ड्रेसिंग टेबल, मुलाच्या खोलीत वॉर्डरोब तसेच देवाच्या खोलीत देवघर व एका माळ्याला दरवाजा इ. काम करण्याचे जाबदेणार यांनी मान्य केले. जाबदेणार यांनी सदरचे फर्निचरचे काम दोन दिवसांमध्ये करण्याचे मान्य केले. त्यासाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना एकुण रक्कम रु.95,000/- चेकद्वारे दिले. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 5,000/-, रु.15,000/-, रु. 25,000/- व रु. 50,000/- या रकमा चेकने दि. 29/07/2011, दि.05/08/2011 व दि. 23/08/2011 या कालावधीमध्ये दिले. सदरचे चेक जाबदेणार यांनी वटविले व सदरची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली. तक्रारदार यांनी वारंवार विनंती केल्यानंतरही जाबदेणार यांनी सदरचे फर्निचर वेळेत तयार करुन दिले नाही. जी काही कामे केली, ती अर्धवट केली. दरवाजाची रुंदी जास्त झाल्यामुळे दरवाजे लागत नव्हते. अशाप्रकारे जाबदेणार यांनी सेवा देताना त्रुटी निर्माण केलेली आहे. दि.13/01/2013 रोजी तक्रारदार जाबदेणार यांच्या ऑफिसमध्ये गेले असता, फर्निचर तयार करुन देतो असे मान्य केले व विश्वास वाटावा म्हणून रक्कम रु. 17,000/- व रक्कम रु. 50,000/- चे दोन चेक दिले. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे फर्निचर व्यवस्थित करुन दिले नाही, त्याचप्रमाणे दिलेले चेक जमा केले असता, जाबदेणार यांच्या खात्यामध्ये रक्कम नसल्यामुळे ते वटले नाहीत. तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी केलेल्या अपुर्या फर्निचरची किंमत रु. 28,000/- असावी व त्यांच्याकडून
रक्कम रु. 67,000/- येणे आहे. जाबदेणार यांनी सेवा न पुरविल्यामुळे सदरची रक्कम परत मिळावी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- आणि तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदार करतात.
2] जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, ते नोटीस बजवूनही गैरहजर राहिले, त्यामुळे हे प्रकरण गुणवत्तेवर एकतर्फा नेमण्यात आले.
3] तक्रारदार यांनी आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, फर्निचरचे फोटोग्राफ्स, त्यांचा खातेउतारा, जाबदेणार यांनी लिहून दिलेली वर्क ऑर्डर, जाबदेणार यांनी दिलेले चेक इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
4] तक्रारदार यांनी दिलेला पुरावा निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही पुरावा किंवा त्यांची लेखी कथन दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी सेवा देताना कसुर केलेली आहे. तक्रारदार यांनी जाबदेणारांनी केलेल्या फर्निचरची किंमत रक्कम रु. 28,000/- मान्य केलेली आहे व त्या रकमेची सुट दिलेली आहे. उर्वरीत फर्निचरची रक्कम रु. 67,000/- मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी व दाव्याच्या खर्चापोटी तक्रारदार रक्कम रु. 15,000/- मिळण्यास पात्र ठरतात. वर उल्लेख केलेले कथनांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देताना त्रुटी
निर्माण केलेली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना एकुण रक्कम
रु. 82,000/- (रु. ब्यॅअंशी हजार फक्त) या
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा
आठवडयांच्या आत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.