जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 193/2021. तक्रार दाखल दिनांक : 22/09/2021. तक्रार निर्णय दिनांक : 30/01/2024.
कालावधी : 02 वर्षे 04 महिने 08 दिवस
श्री. वामन मनोहर पोतदार (मयत) तर्फे वारस :- :- तक्रारकर्ते
(1) लक्ष्मीबाई भ्र. वामन पोतदार, वय 54 वर्षे, व्यवसाय : गृहिनी.
(2) शाम पि. वामनराव पोतदार, वय 30 वर्षे, व्यवसाय : खाजगी नोकरी.
(3) गणेश पि. वामनराव पोतदार, वय 25 वर्षे, व्यवसाय : मजुरी,
सर्व रा. हारवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर.
ह. मु. नेताजी नगर, लातूर, ता. जि. लातूर.
विरुध्द
(1) ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि., शाखा स्टॉक :- विरुध्द पक्ष
एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400 023.
(2) लक्ष्मण ऊर्फ दादाराव हणमंतराव शिवणकर,
(सी.एस.सी. प्रतिनिधी), रा. हारवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर.
(3) तालुका कृषि अधिकारी, कार्यालय रेणापूर, ता. रेणापूर, जि. लातूर.
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- संजय भगवानराव माने
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. दिवाण
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- बी. ई. कवठेकर
विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत:
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती क्र.1 यांचे पती व तक्रारकर्ते क्र.2 व 3 यांचे पिता वामन मनोहर पोतदार (यापुढे "मयत वामन") यांनी सन 2019 खरीप हंगामामध्ये रेणापूर मंडळातील त्यांच्या मौ. हारवाडी येथील त्यांच्या गट क्र. 90 मधील क्षेत्र 1 हे. 73 आर. शेतजमिनीमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन पिकासाठी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामार्फत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा उतरविलेला होता. त्यासंबंधीत पावती क्र. 040127190010718928301 व विमा हप्ता रु.1,387.8 स्वीकारलेला होता. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी मौ. हारवाडी येथील शेतक-यांना हेक्टरी रु.22,912.51 पैसे पीक विमा मंजूर केला. मयत वामन यांच्या पिकास विमा संरक्षण असतानाही त्यांना विमा रक्कम मंजूर झाली नाही. मयत वामन यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडे पाठपुरावा केला असता दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांच्या चुकीमुळे तक्रारकर्ते यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून पीक विम्याची मागणी केली असता दखल घेतलेली नाही. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन रु.39,638/- विमा रक्कम, मानसिक त्रासाकरिता रु.25,000/-, शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/-, ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- व अन्य खर्च रु.15,000/- याप्रमाणे एकूण रु.1,07,638/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याविरुध्द आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने त्यांनी अमान्य केले आहेत. प्रथमत: त्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल असणा-या तरतुदीचे विवेचन केले. त्यांचे पुढे कथन असे की, मयत वामन यांच्या पीक विमा अर्ज क्र. 040127190010718928301 ची माहिती विमा संकेतस्थळावर तपासली असता त्या अर्जापुढे श्री. व्यंकट रामचंद्र गडेकर यांच्या नांवे विमा झाल्याचे दिसून आले. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांना पीक विमा संकेतस्थळावरील माहितीमध्ये खरीप 2019 हंगामात मयत वामन यांच्या नांवे पीक विमा अर्ज दिसून आला नाही. शासन निर्णय व योजनेच्या तरतुदीनुसार ज्या शेतक-यांच्या पीक विम्याची माहिती विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या पीक विमा संकेतस्थळावर प्राप्त होते, अशा पात्र शेतक-यांना नुकसान भरपाई रक्कम अदा केलेली आहे. योजनेतील तरतुदीनुसार शेतकरी किंवा सी.एस.सी. केंद्रचालक यांच्या चुकीसाठी विरुध्द पक्ष क्र.1 जबाबदार नाहीत आणि तक्रारकर्ते यांना विमा रक्कम देण्याचे त्यांच्यावर दायित्व येत नाही. अर्ज क्र. 040127190010718928301 नुसार व्यंकट रामचंद्र गडेकर यांना रु.11,456.25 रक्कम अदा करण्यात आलेली आहे. सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही आणि त्यांच्याविरुध्द "विनालेखी निवेदनपत्र" आदेश करण्यात आले.
(4) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय (वि.प. क्र.1 यांनी)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. सन 2019 खरीप हंगामाकरिता मयत वामन यांनी सोयाबीन पिकासाठी विमा उतरविल्यासंबंधी पावती अभिलेखावर दाखल आहे. तक्रारकर्ते यांच्या कथनानुसार मयत वामन यांनी मौ. हारवाडी येथील त्यांच्या गट क्र. 90 मधील क्षेत्र 1 हे. 73 आर. शेतजमिनीमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला; परंतु त्यांच्या पिकाकरिता विमा रक्कम मंजूर केलेली नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या कथन असे की, मयत वामन यांच्या पीक विमा अर्ज क्र. 040127190010718928301 ची माहिती विमा संकेतस्थळावर तपासली असता त्या अर्जापुढे श्री. व्यंकट रामचंद्र गडेकर यांच्या नांवे विमा झाल्याचे दिसून आले. खरीप 2019 हंगामात मयत वामन यांच्या नांवे पीक विमा अर्ज नसल्यामुळे तक्रारकर्ते यांना विमा रक्कम देण्याचे त्यांच्यावर दायित्व येत नाही.
(6) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसंबंधी उपलब्ध केलेल्या पोर्टलवरुन मयत वामन यांनी त्यांच्या सर्वे नं. 90 मधील 1.73 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी पावती क्र. 040127190010718928301 अन्वये रु.71,600/- विमा उतरविल्याचे व रु.1,387.8 विमा हप्ता अदा केल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन असे की, खरीप 2019 हंगामाकरिता पीक विमा अर्ज क्र. 040127190010718928301 साठी श्री. व्यंकट रामचंद्र गडेकर यांच्या नांवे विमा झाल्यामुळे व्यंकट रामचंद्र गडेकर यांना रु.11,456.25 रक्कम अदा केले आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अर्ज क्र. 040127190010718928301 चे स्थितीदर्शक कागदपत्रे अभिलेखावर दाखल केले आहेत. त्याचे अवलोकन केले असता अर्ज क्र. 040127190010718928301 करिता व्यंकट रामचंद्र गडेकर यांचे नांवे आढळते. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या बचावाची दखल घेतली असता मयत वामन यांनी अर्ज क्र. 040127190010718928301 अन्वये सर्वे नं. 90 मधील 1.73 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी रु.71,600/- करिता विमा संरक्षण घेतल्याचे स्पष्ट असताना व्यंकट रामचंद्र गडेकर यांचे नांवे विमा रक्कम मंजूर होण्यामागे सी.एस.सी. किंवा शेतकरी यांची चूक होती, हे सिध्द होत नाही. मयत वामन यांच्या अर्ज क्र. 040127190010718928301 पुढे अन्य व्यक्तीची नोंद होऊन विमा रक्कम दिल्याच्या त्रुटीचे उचित स्पष्टीकरण किंवा निराकरण विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे झालेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांचा बचाव स्वीकारार्ह ठरत नाही. पुराव्याअभावी मयत वामन यांना विमा रकमेपासून वंचित ठेवता येणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे. उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना मयत वामन यांच्या सोयाबीन पिकाच्या विमा जोखीमेनुसार विमा रक्कम अदा न करुन सेवेमध्ये त्रुटी केली आणि तक्रारकर्ते त्याप्रमाणे विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत
(7) तक्रारकर्ते यांनी विमा रकमेची 12 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी व्यंकट रामचंद्र गडेकर यांना दि.5/3/2020 रोजी पीक विमा रक्कम दिलेली असल्यामुळे त्याच तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करणे न्यायोचित राहील.
(8) विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यातर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. /विरुध्द/ नैन सिंग", रिव्हीजन पिटीशन नं. 2393-2394/2008 मध्ये दि.22/4/2009 रोजी दिलेल्या; "सिंडीकेट बँक /विरुध्द/ रंगा रेड्डी", रिव्हीजन पिटीशन नं. 2143-2148/2009 मध्ये दि.20/9/2010 रोजी दिलेल्या; "आंध्रा प्रगथी ग्रामीण बँक /विरुध्द/ सिंगम सिवा संकर रेड्डी", रिव्हीजन पिटीशन नं. 2673/2013 मध्ये दि.30/10/2015 रोजी दिलेल्या; मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने जनहीत याचिका क्र. 73/2018 'अमरसिंह शिवाजीराव पंडीत /विरुध्द/ स्टेट ऑफ महाराष्ट्र' प्रकरणामध्ये दि.7/8/2017 रोजी दिलेल्या व मा. राष्ट्रीय आयोगाच्या "कॅनरा बँक /विरुध्द/ सेठ प्रकाश चंद्रा जैन", रिव्हीजन पिटीशन नं. 4589/2013 मध्ये दि.11/12/2013 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. उक्त न्यायनिर्णयांमध्ये पीक विम्याचा वादविषय दिसून येत असला तरी प्रस्तुत प्रकरणाच्या वस्तुस्थिती व कायदेशीर प्रश्नांशी भिन्न आहेत.
(9) तक्रारकर्ते यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/-, शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चासह अन्य खर्चाकरिता एकूण रु.18,000/- रकमेची मागणी केलेली आहे. निश्चितच, नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. तक्रारकर्ते यांच्या उक्त मागण्यांकरिता उचित पुरावा व स्पष्टीकरण नाही. हे सत्य आहे की, तक्रारकर्ते यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना विमा रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच त्यांना आर्थिक खर्च करावा लागला, असे दिसते. पुराव्याअभावी व तर्काचा आधार घेऊन योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(10) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.
(11) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना मौजे हारवाडी, ता. रेणापूर येथील गट क्र. 90 मधील 1.73 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी विमा रक्कम मंजूर करुन देय विमा रक्कम अदा करावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उक्त उक्त विमा रकमेवर दि. 5/3/2020 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-