तक्रारदार स्वत: हजर
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
निकालपत्र
12/06/2014
प्रस्तुतची तक्रार ही ग्राहकाने शैक्षणिक संस्थेविरुद्ध सेवेतील त्रुटीकरीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. त्यातील कथने खालीलप्रमाणे.
1] तक्रारदार हे मांजरी बुद्रुक येथील रहीवासी असून जाबदेणार ही बालाजीनगर, पुणे येथील शैक्षणिक संस्था आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचे संस्थेमध्ये ‘मास्टर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग’ या एका वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. परंतु तक्रारदार यांना या संस्थेने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 35,000/- फी घेतली. जाबदेणार यांनी अभ्यासक्रम पूर्ण न करता, कोणतीही परीक्षा न घेता, डमी विद्यार्थी बसवून प्रमाणपत्र दिले आणि मार्कलिस्ट दिली. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग न देता अनुभवाचे प्रमाणपत्र दिले व खोटी जॉब लेटर्स दिले. तक्रारदार यांना या संस्थेमध्ये हजर राहण्यासाठी दरमहा रक्कम रु. 1500/- खर्च करावा लागला. तक्रारदाराकडून जाबदेणार यांनी भरमसाठ फी घेऊन त्याला ज्ञान दिले नाही किंवा नोकरीसाठी मदत केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ही नुकसान भरपाई मिळवी म्हणून दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी एकुण रक्कम रु. 2,99,480/- नुकसान भरपाई मागितलेली आहे.
2] या प्रकरणात जाबदेणार हे नोटीस बजवूनही गैरहजर राहीले, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत करण्यात आला.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे रक्कम रु. 35,000/- फी भरली होती. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या एस.टी. पासच्या नकलांवरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी या संस्थेमध्ये जाण्या-येण्यासाठी खर्च केलेला आहे. तक्रारदार यांनी प्रमाणपत्र व मार्कलिस्ट दाखल केलेली आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी तक्रारदारांची कोणतीही परिक्षा न घेता खोटे प्रमाणपत्र दिले, तसेच खोटे जॉब लेटर्स दिले व त्यांची फसवणुक केली. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्य प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन जाबदेणार यांनी पूर्ण केले नाही. ही बाब म्हणजे सेवेतील त्रुटी आहे, असे या मंचाचे मत आहे. यासाठी तक्रारदार जाबदेणार यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन त्यांनी जाबदेणारांकडे कोर्सची फी रक्कम रु. 35,000/- भरलेली होती, हे सिद्ध होते. त्यामुळे तक्रारदार सदरची रक्कम मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे सेवेतील त्रुटी करीता नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून फीची
रक्क्म घेऊन योग्य प्रशिक्षण न देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की,
त्यांनी तक्रारदार यांना फीपोटी घेतलेली रक्कम रु. 35,000/- (रु. पस्तीस हजार फक्त) आणि नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.