निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार यांनी दिनांक 22/02/2014 रोजी सॅमसंग कंपनीची बॅटरी क्र. EB615268VU ही विजय कम्युनिकेशन, नांदेड येथून खरेदी केली. सदर दुकानदाराने बॅटरीमध्ये काही प्राब्लेम झाल्यास सॅमसंगच्या ऑथोराईज्ड सर्व्हीस सेंटर मधून सदर बॅटरी बदलून घेवू शकतात असे सांगितले. बॅटरीची किंमत 1,250/- अर्जदाराकडून घेवून बिल क्र. 231चे दिले. अर्जदाराने सदर बॅटरी वापरने चालू केले परंतू जुलै 2014 मध्ये अर्जदाराच्या मोबाईलची डिस्प्लेची लाईट कमी जास्त झाल्याने अर्जदाराने त्याचे मोबाईलचे कव्हर काढून बघितले असता सदर सॅमसंग कंपनीच्या बॅटरीचे Connecting Socket हे आपोआप डॅमेज झालेले होते. अर्जदाराने सदरील बॅटरी गैरअर्जदार यांच्याकडे दाखविल्याने गैरअर्जदार यांनी जुलै महिना संपल्यानंतर येण्यास सांगितले. अर्जदार यांनी दिनांक 01.08.2014 रोजी 6.00 वाजता प्रत्यक्ष येवून सदरील बॅटरी गैरअर्जदार यांना दाखविली व बॅटरीची 6 महिन्याची वॉरंटी असल्याने बॅटरी बदलून देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी बॅटरी Phsical Damage झाल्याने बदलून देत नाही असे सांगितले. गैरअर्जदाराने बॅटरी डॅमेज झाल्यानंतर ती बदलून देण्याऐवजी बॅटरीचा तसाच उपयोग करण्याचा सल्ला दिला होता. त्या कारणाने अर्जदाराच्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला. सदरील डिस्प्लेसाठी रु. 8,000/- चा खर्च आला. गैरअर्जदार हे सॅमसंग कंपनीचे नांदेड शहराकरीता असलेले अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने योग्य सेवा देण्याचे गैरअर्जदाराचे कर्तव्य आहे परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदारास योग्य सेवा दिलेली नाही. गैरअर्जदार अर्जदाराचे कांही एक ऐकत नसल्याने अर्जदाराने वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली परंतू सदर नोटीसचे उत्तरही गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास निकृष्ठ दर्जाची बॅटरी दिली व ती बदलून देण्याऐवजी तिच बॅटरी वापरण्याचा सल्ला दिला त्यामुळे अर्जदाराचे रक्कम रु. 8,000/- चे नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास अत्यंत चुकीची व त्रुटीची सेवा दिलेली आहे. त्यामुळे अर्जदारास प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे. गैरअर्जदार हे अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व दावा खर्च रक्कम रु. 4,000/- तसेच नोटीसचा खर्च रक्कम रु. 2,000/- देण्यास जबाबदार आहेत. गैरअर्जदार यांनी दिनांक 01/08/2014 रोजी अर्जदारास बॅटरी बदलून देण्यास नकार दिलेला असल्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून फॉल्टी बॅटरी वापरण्याचा चुकीचा सल्ला दिल्यामुळे अर्जदाराचे झालेले रु.8,000/- ची नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा. तसेच गैरअर्जदार यांनी सॅमसंग कंपनीची फॉल्टी बॅटरी बदलून दयावी तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-, दावा खर्चाबाबत रक्कम रु. 4,000/- व नोटीस खर्च रक्कम रु. 2,000/- इत्यादी बाबींची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार हे अॅड. चौधरी यांच्या मार्फत दिनांक 30/10/2014 रोजी हजर झाले परंतू आजपर्यंत त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. परंतू गैरअर्जदार यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराने पुराव्याकामी कागदात्रे व शपथपत्र दाखल केलेले आहे. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार यांनी दिनांक 22/02/2014 रोजी विजय कम्युनिकेशन, नांदेड यांच्याकडून शॉमसंग या कंपनीची बॅटरी रक्कम रु. 1250/- ला खरेदी केल्याचे दाखल बिलावरुन दिसून येते. अर्जदार यांच्या तक्रारीतील कथनानुसार अर्जदाराची बॅटरी ही जुलै-2014 मध्ये खराब झालेली आहे. नादुरुस्त झालेली बॅटरी गैरअर्जदार यांच्याकडे नेली असता गैरअर्जदार यांनी बदलून दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 01/08/2014 रोजी नादुरुस्त बॅटरी बदलून घेण्यासाठी अर्जदार गेलेले होते परंतू गैरअर्जदार यांनी सदरील बॅटरी ही Liquid Damage असल्यामुळे वॉरंटीमध्ये येत नाही असे सांगून अर्जदारास बॅटरी बदलून देण्यास नकार दिलेला आहे ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने खरेदी केलेली बॅटरी नादुरुस्त झाल्याने अर्जदारास ती बदलून देणे क्रमप्राप्त होते परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदारास नादुरुस्त बॅटरी बदलून दिलेली नाही ही बाब सेवेतील त्रुटी आहे. अर्जदार यांच्या तक्रारीमध्ये अर्जदार यांनी सदरील नादुरुस्त बॅटरी वापरल्याने अर्जदाराच्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला व त्यासाठी त्यांना 8,000/- रुपये खर्च आला असे नमूद केलेले आहे परंतू त्याबाबत अर्जदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दिलेला नाही. यावरुन अर्जदाराचे हे कथन ग्राहय धरता येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची नादुरुस्त बॅटरी बदलून न देवून सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. या त्रुटीमुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास बॅटरीची किंमत रक्कम रु. 1250/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.