(पारित व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर सध्या विलीनीकरण मे. गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसर तर्फे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष/व्यवस्थापक यांचे विरुध्द संस्थे मध्ये मुदत ठेवी मध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह परत मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणेतो विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तुमसर Registration No.-B.H.D./T.S.R./R.S.R./C.R./ 601/Dt. 19-4-94 या सहकारी पतसंस्थेचा तो खातेधारक व सदस्य आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या दामदुप्पट योजनेत मुदतठेव म्हणून दिनांक-10.10.1996 रोजी रुपये-40,000/- एवढी रक्कम गुंतवणूक केली होती व पावती प्राप्त केली होती. सदर मुदतठेवीचा परिपक्व दिनांक-10.04.2001 असून मुदती नंतर परिपक्व रक्कम रुपये-80,000/- मिळणार होती. परंतु अदयाप पर्यंत विरुध्दपक्ष पतसंस्थेव्दारे मुदत उलटूनही रक्कम दिलेली नाही. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तुमसर हिचे विलिनीकरण मे. गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसर, जिल्हा भंडारा मध्ये झालेले झाले आणि तक्रारकर्ता हा या संस्थेचा ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला विरुध्दपक्ष पतसंस्थेनी आज पर्यंत मुदतठेवीची रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि वार्षिक 16 टक्के व्याजदरा प्रमाणे मुदतीठेवीचे आता रुपये-15,00,000/- चे वर रक्कम झालेली आहे. तक्रारकर्त्याने वेळोवेळी मुदतठेवीच्या रकमेची मागणी विरुध्दपक्ष पतसंस्थे कडे केली परंतु रक्कम देण्यास हयगय केली. शेवी तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेला दिनांक-24.12.2020 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवून मुदत ठेवीचे रकमेची व्याजासह मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसला खोटे उत्तर पाठवून पैसे देण्यास नकार दिला. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावालागत आहे. म्हणून शेवटी त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्ष सहकारी बॅंकेनी तक्रारकर्त्याची रक्कम रुपये-15,00,000/- वार्षिक16 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
2. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-4,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
3. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्थ मर्यादित तुमसर जिल्हा भंडारा सध्या मे. गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, तुमसर जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्त्याने त्यांना दिनांक-24.12.2020 रोजीची वकीलांचे मार्फतीने नोटीस पाठविल्याची बाब मान्य केली परंतु नोटीस खोटी व बनावट असल्याने अमान्य केली. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने रुपये-15,00,000/-मिळण्यासाठी केलेली तक्रार पूर्णतः चुकीची असून त्यांना नामंजूर आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर सन 1999 ला बंद पडली होती, तेंव्हापासून सदर संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती होती. सन-2008 मध्ये महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर यामधील ठेविदारांच्या ठेवी पैकी 25% रक्कम परत करण्याच्या तत्वावर या संस्थेवर मे. गुरुकृपा अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसरची नियुक्ती प्रशासक म्हणून झालेली होती व त्यानंतर सहा महिन्यांनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसरचे मे. गुरु कृपा अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसर या संस्थेमध्ये विलिनीकरण करण्यात आले. विलीनीकरणा नंतर दिनांक-24.03.2008 चे आदेशान्वये महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर येथील ठेवीदारांच्या ठेवी या मे. गुरुकृपाअर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसर या संस्थे मध्ये वर्ग करण्यात आल्यात, त्यावेळी असे ठरले की, महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर ही पतसंस्था तिचे ठेवीदारांना 25% रक्कम त्वरीत देईल व उर्वरीत रक्कम 1 वर्षाच्या आत परत करेल आणि अशा आशयाची जाहिर नोटीस दैनिक वृत्तपत्र लोकमत, लोकरंग, भंडारा पत्रीका या वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली हाती. सदर जाहिर नोटीस वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या नंतर अनेक ठेवीदारांनी रितसर अर्ज करुन आपल्या ठेवी परत घेतल्यात परंतु तक्रारकर्त्याने कसलाही अर्ज संस्थेस दिला नाही व मुदत ठेव पावती रितसर संस्थे मध्ये जमा केली नाही. गुरुकृपा अर्बन को ऑप. सोयायटी तुमसर यांनी, महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर यांचेशी केलेल्या करारा नुसार तसेच दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या नोटीस नुसार मुदतठेवी परत करण्याचा कालावधी हा 01 वर्षाचा असून त्यानंतर कोणाचाही उजर वा तक्रार विचारात घेतल्या जाणार नाही. अशी परिस्थिती असताना सुध्दा तक्रारकर्त्याने दिनांक-2412.2020 रोजीच्या नोटीसव्दारे बेकायदेशीर अवाढव्य रुपये-15,00,000/- ची मागणी केली. तक्रारकर्त्याचे मुदत ठेवीची मुदत दिनांक-10.04.2001रोजी संपल्या नंतर सन 2001 मध्ये महिला नागरी सहकारी पत संस्थातुमसर येथे प्रशासकाची नियुक्ती होती त्यावेळी तक्रारकर्त्याने प्रशासकाशी संपर्क साधला नाही. त्यानंतर 07 वर्षानी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर हिचे मे. गुरुकृपा अर्बनको-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित तुमसर या संस्थे मध्ये विलिनीकरण करण्यात आले परंतु त्यावेळी सुध्दा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संस्थेशी संपर्क साधला नाही. तक्रारकर्त्याची मुदतठेव दिनांक-10.04.2001 रोजी परिपक्व झाली होती परंतु त्यानंतर तक्रारकर्त्याने एकदम दिनांक-24.12.2020 रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून रुपये-15,00,000/- रकमेची बेकायदेशीर मागणी केली परंतु नोटीस पाठविण्या पूर्वी म्हणजे दिनांक-23.12.2020 पर्यंत विरुध्दपक्ष मे. गुरुकृपा अर्बन का-ऑप सोसायाटी मर्यादित तुमसर यांचेशी कोणताही संपर्क साधला नाही किंवा लेखी अर्ज दिला नाही वा कोणताही पत्रव्यवहार केला नाही. संस्थेच्या करारा नुसार विलिनीकरण झाल्या नंतर जाहिर नोटीस प्रकाशित केल्याच्या तारखे पासून एक वर्षाचे आत ठेवीदारांनी आपल्या मुदतठेवी उचल करावयाच्या होत्या. तक्रारकर्त्याची मुदतठेव दिनांक-10.04.2001 रोजी परिपक्व झाली होती आणि तक्रारकर्त्याने एकदम दिनांक-24.12.2020 रोजीची नोटीस पाठवून रकमेची मागणी केली हा कालावधी लक्षात घेता तक्रारकर्त्याने मुदतठेवीच्या रकमेची मागणी करण्यासाठी 19 वर्ष 08 महिने आणि 14 दिवसांचा विलंब केलेला आहे. त्याच बरोबर विरुध्दपक्षाने ठेवीदारांची ठेव परत करण्यासाठी दिनांक-24 मार्च,2008 रोजी नोटीस प्रकाशित केली होती आणि तक्रारकर्त्याने दिनांक-24.12.2020 रोजी नोटीस पाठविली सदर कालावधी लक्षात घेता 12 वर्ष, 09 महिने विलंब झालेला आहे, त्यामुळे संस्थेच्या करारा नुसार जाहिर नोटीस प्रकाशित केल्याच्या तारखेपासून 01 वर्षाच्या नंतर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर येथील कोणत्याही ठेवीदारास विरुध्दपक्ष ठेवी परत करण्यास बंधनकारक नाही. तक्रारकर्त्याने मुदतबाहय खोटी तक्रार केली असल्याने खर्चासह खारीज करावी अशी विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, सध्याच्या विरुध्दपक्ष पतसंस्थेचे लेखी उत्तर, तसेच उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, उभय पक्षांचा शपथे वरील पुरावा व उभय पक्षांचा लेखी युक्तवाद याचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्याय निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे काय | -होय- |
02 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 व 2
05. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तुमसर Registration No.-B.H.D./T.S.R./R.S.R./C.R./ 601/Dt. 19-4-94 या सहकारी पतसंस्थे मध्ये दामदुप्पट योजनेत मुदतठेव म्हणून दिनांक-10.10.1996 रोजी रुपये-40,000/- एवढी रक्कम 54 महिन्या करीता (साडेचार वर्षा करीता) वार्षिक-16 टक्के व्याजदराने गुंतवणूक केली होती व पावती क्रं 459 प्राप्त केली होती. सदर मुदतठेवीचा परिपक्व दिनांक-10.04.2001 असून मुदती नंतर परिपक्व रक्कम रुपये-80,000/- मिळणार होती असे दाखल मुदत ठेव प्रमाणपत्राच्या प्रतीवरुन दिसून येते. सदर मुदतठेव पावतीवर पूर्वीचे संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्या सहया असून संस्थेचा शिक्का आहे आणि ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे.
06. दरम्यानचे काळात विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर रजि.नं.601 या पतसंस्थेवर सहायक निबंधक, सहकारी संस्था तुमसर यांचे दिनांक-24 मार्च, 2008 रोजीचे आदेशान्वये गुरुकृपा अर्बन क्रेडीट कोऑप.सोसायटी मर्यादित तुमसर, तालुका जिल्हा भंडारा यांची महिला नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासक पदावर नेमणूक करण्यात आल्या बाबत वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली होती, त्या जाहिर सुचनेची प्रत विरुध्दपक्षाने पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल केलेली आहे, त्यानुसार मा. जिल्हा उपनिबंधक सकारी संस्था भंडारा यांचे आदेशान्वये विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्थे मधील ठेवीदारांच्या ठेवी या गुरुकृपा अर्बन क्रेडीट को- ऑप. सोसायटीकडे वर्ग करण्यात आल्या असून यापुढे ठेवीचे सर्व व्यवहार गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी कडे करण्यात येतील. तसेच महिला नागरी सहकारी पतसंस्थे मधील कर्ज सुध्दा गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी कडे वर्ग होतील. सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटीचे कार्यालयातील अधिकारी हे सहायक निबंधक सहकारी संस्था तुमसर यांचे कार्यालयात प्रत्येक आठवडयातील सोमवार व बुधवार दुपारी 11.30 ते 3.00 वाजे पर्यंत हजर राहतील त्याच प्रमाणे सदर योजने प्रमाणे ठेवीदारास तुर्त 25 टक्के ठेवीची रक्कम त्वरीत परत करण्यात येईलव उर्वरीत रक्कम एक वर्षाचे आत परत केल्या जाईल या करीता ठेवीदाराला योग्य पुरावा सादर करावा लागेल करीता संबधितांनी नोंद घेऊन कारवाई करावी
प्रशासक
महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादिततुमसर र.नं.601 तथा
अध्यक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी भंडारा र.न.302
07 यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर या पतसंस्थेचे दिनांक-24 मार्च, 2008 रोजी गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी मध्ये विलीनीकरण करण्यात आले व ठेवीदारांचे ठेवीची 25 टक्के रक्कम त्वरीत आणि त्यानंतर एक वर्षाचे आत उर्वरीत रक्कम परत केल्या जाईल अशी हमी जाहिर सुचने व्दारे दिली होती.
08. असेही दिसून येते की, तक्रारकर्त्याने सचिव, गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी तुमसर यांचे कडे दिनांक-30 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे पत्रान्वये ठेवीच्या रकमेची मागणी केली होती आणि सदर पत्र रजि. पोस्टाने पाठविल्या बाबत रजि. पोस्टाच्या पावत्या पुराव्यार्थ दाखल केल्यात. त्यानंतर अध्यक्ष/सचिव गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटीला वकीलांचे मार्फतीने दिनांक-24.12.2020 रोजी नोटीस पाठविल्या बाबत नोटीसची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. सदर नोटस विरुध्दपक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी रजि.नं.302 यांना मिळालेली आहे कारण त्यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला दिनांक-01.01.2021 रोजी उत्तर देऊन विरुध्दपक्ष संस्थेनी दैनिक लोकमत, लोकरंग, भंडारा पत्रीका मधील जाहिर सुचनेचा उल्लेख करुन दिनांक-24.03.2008 रोजीचे आदेशाचा हवाला देऊन आदेशा पासून एक वर्षाचे आत मुदतठेव पावती जमा न केल्यामुळे रक्कम देणे बंधनकारक नसल्याचे कळविले. विरुध्दपक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटीने तक्रारकर्त्याची जमा रक्कम देणे बंधनकारक नाही अशी जी भूमीका घेतलेली आहे तीच मूळात चुकीची असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे आणि तक्रारकर्त्यास दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
09 जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याची मुदतठेव दिनांक-10.04.2001 रोजी संपल्या नंतर त्याने त्यानंतर एकदम दिनांक-30 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे पत्रान्वये ठेवीच्या रकमेची मागणी केल्या बाबतचा पुरावा जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष आलेला आहे आणि त्यानंतर एकदम दिनांक-24.12.2020 रोजीची नोटीस पाठवून मुदतठेवीच्या रकमेची मागणी केल्या बाबत लेखी पुरावा समोर आलेला आहे. विरुध्दपक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटीचे जाहिर सुचने प्रमाणे ते दिनांक-24.03.2008 चे आदेशाचे दिनांकापासून एक वर्षा पर्यंत महिला अर्बन को ऑप सोसायटी मधील ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत करणार होते. हा सर्व घटनाक्रम पाहता तक्रारकर्त्याची सुध्दा चुक दिसून येते की, त्याने दरम्यानचे काळात ठेवी संबधात कोणताही लेखी पत्रव्यवहार केलेला नाही. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने वेळोवेळी मौखीक मागणी केली परंतु मौखीक मागणी हा पुरावा म्हणून समजल्या जाऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने परिपक्व दिनांकापासून ते आज पर्यंत मुदतठेवीच्या रकमेवर मुदतठेव पावती प्रमाणे वार्षिक 16 टक्के व्याज दराची मागणी केलेली आहे, ती मागणी अव्यवहार्य दिसून येते याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्याने वेळोवेळी सदर मुदतठेवीचे नुतनीकरण केलेले नाही. केंद्र सरकारच्या पोस्ट विभागामध्ये फक्त ज्यावेळी आर.डी. सुरु केली त्यावेळेस असलेल्या दराने आर.डी.वर व्याज दिल्या जाते परंतु विरुध्दपक्ष ही एक सहकारी पतसंस्था आहे त्यामुळे तक्रारकर्त्याची वार्षिक 16 टक्के व्याज दराची मागणी मान्य होण्या सारखी नाही.
10. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, सध्याची विरुध्दपक्ष पतसंस्था गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी ही सन-2008 पासून तक्रारकर्त्याची जमा रक्कम वापरीत आहे कारण पूर्वीच्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी व कर्ज सध्याच्या गुरुकृपा सोसायटीमध्ये हस्तांतरीत करण्यात आलेले आहे तसेच ग्राहकांच्या जमा रकमांवर गरजूंना कर्ज पुरवठा करुन गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी व्याज कमावित आहे या बाबी लक्षात घेता सध्याच्या विरुध्दपक्ष पतसंस्था गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटीने तक्रारकर्त्यास त्याचे मुदतठेवी संबधात परिपक्व दिनांक-10.04.2001 रोजी देय होणारी रक्कम रुपये-80,000/- परत करवी आणि सदर रकमेवर दिनांक-11.04.2001 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याज दयावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा सध्याच्या विरुध्दपक्ष गुरुकृपा अर्बन क्रेडीट सोसायटी कडून तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
1. तक्रारकर्ता श्री आशीष गजानन कुकडे यांची तक्रार विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर, जिल्हा भंडारा रजि.क्रं-601 सध्या विलीनीकरण गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपमर्यादित, तुमसर, जिल्हा भंडारा रजिस्टर्ड क्रं 302 ही सहकारी संस्था आणि सदर संस्थे तर्फे- तिचे पदाधिकारी अध्यक्ष तसेच सचिव आणि ईतर संचालक मंडळ यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर, जिल्हा भंडारा रजि.क्रं 601 सध्या विलीनीकरण गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपमर्यादित, तुमसर, जिल्हा भंडारा रजिस्टर्ड क्रं 302 ही सहकारी संस्था आणि सदर संस्थे तर्फे- तिचे पदाधिकारी अध्यक्ष तसेच सचिव आणि ईतर संचालक मंडळ यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास त्याची मुदतठेव पावती क्रं-42, (A.C.No.39 Receipt No.-459) पावती दिनांक-10.10.1996 अनुसार विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये जमा असलेली आणि परिपक्व दिनांक-10.04.2001 रोजी देय रक्कम रुपये-80,000/- (अक्षरी रुपये एैंशी हजार फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर दिनांक-11.04.2001 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्यास दयावे.
3. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर, जिल्हा भंडारा रजि.क्रं 601 सध्या विलीनीकरण गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपमर्यादित, तुमसर, जिल्हा भंडारा रजिस्टर्ड क्रं 302 ही सहकारी संस्था आणि सदर संस्थे तर्फे- तिचे पदाधिकारी अध्यक्ष तसेच सचिव आणि ईतर संचालक मंडळ यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
4. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर, जिल्हा भंडारा रजि.क्रं 601 सध्या विलीनीकरण गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑपमर्यादित, तुमसर, जिल्हा भंडारा रजिस्टर्ड क्रं 302 ही सहकारी संस्था आणि सदर संस्थे तर्फे- तिचे पदाधिकारी अध्यक्ष तसेच सचिव आणि ईतर संचालक मंडळ यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
5. निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
6. उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात