जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 95/2019. तक्रार दाखल दिनांक : 25/04/2019. तक्रार निर्णय दिनांक : 26/04/2023.
कालावधी : 04 वर्षे 00 महिने 01 दिवस
(1) विलास पिता भैरु नागुलकर, वय 37 वर्षे, व्यवसाय : शेती.
(2) श्रीकृष्ण पिता भैरु नागुलकर, वय 32 वर्षे, व्यवसाय : शेती.
(3) सखुबाई पती भैरु नागुलकर, वय 67 वर्षे, व्यवसाय : घरकाम
व शेती, सर्व रा. रामेगाव, ता. जि. लातूर. (तक्रारकर्ती क्र.3 मयत) :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,
महाबीज भवन, कृषि नगर, अकोला - 440 104.
(2) जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य बियाणे
महामंडळ मर्या., कृषि उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, लातूर.
(3) शेती विकास केंद्र, शासकीय विश्रामगृहासमोर, मुरुड, ता. जि. लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, तालुका तक्रार निवारण समिती, लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- बालाजी एल. शिंदे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. व्ही. तापडिया
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- के. बी. भुतडा
विरुध्द पक्ष क्र.4 :- अनुपस्थित
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे नात्याने सख्खे बंधू असून तक्रारकर्ती क्र.3 त्यांच्या मातोश्री आहेत. तक्रारकर्ते क्र.1 ते 3 यांना मौजे रामेगाव, ता. जि. लातूर येथील गट क्र.46 मध्ये अनुक्रमे 1 हे. 30 आर., 1 हे. 30 आर. व 0 हे. 98 आर. शेतजमीन आहे. त्या क्षेत्रामध्ये सोयाबीन बियाणे पेरणी करण्यासाठी दि.22/6/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे निर्मीत सोयाबीन JS335 बियाण्याच्या प्रतिपिशवी रु.1,750/- याप्रमाणे 7 पिशव्या बियाणे तक्रारकर्ता क्र.1 यांच्या नांवे खरेदी केले. बियाणे खरेदी पावती क्रमांक 587 व बियाण्याचा लॉट क्रमांक 34 होता.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, पेरणीपूर्व मशागत करुन जमिनीमध्ये ओल असताना दि.22/6/2018 रोजी 7 एकर क्षेत्रामध्ये खतासह बियाण्याची पेरणी केली. परंतु संपूर्ण बियाण्याची उगवण न झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे तक्रार केली असता विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनंतर विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या तक्रार समितीने बियाणे उगवणीची पाहणी करुन पंचनामा केला. समितीच्या निष्कर्षानुसार पूर्वी पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची मोडणी करुन दुबार पेरणी केल्याचे निष्कर्ष नोंदविला. त्यानंतर विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता दखल घेण्यात आली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.2,90,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, विक्रीपूर्व बियाण्याचे उचित शासकीय प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करण्यात येऊन बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेच्या मुक्तता अहवालानंतर शेतक-यांना विक्री करण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध करुन दिले जाते. सोयाबीन बियाणे व्यापारी हेतुने खरेदी केल्यामुळे तक्रारकर्ता "ग्राहक" संज्ञेत येत नाहीत. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. बियाण्याची हाताळणी, मशागत पध्दत, खताची मात्रा, सिंचन व्यवस्था, वातावरण इ. घटक बियाण्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम करतात. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(1)(सी) चे अनुपालन करणे बंधनकारक आहे. बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार तक्रारकर्ते यांनी दुबार पेरणी केल्याचे नमूद केले आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार खोटी असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले. त्यांचे कथन असे की, ते किरकोळ विक्रेते आहेत. आवेष्टीत बियाण्याची त्यांनी विक्री केल्यामुळे ते दोषी ठरत नाहीत. बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार तक्रारकर्ते यांनी पुन:लागवड केली आणि त्यामुळे समितीने उगवण क्षमतेबाबत निरीक्षण मांडले नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.
(5) विरुध्द पक्ष क्र.4 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेद्वारे उत्पादीत व विरुध्द पक्ष क्र.3
विक्री केलेले वादकथित सोयाबीन बियाणे दोषयुक्त
असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- साधारणत: बियाणे खरेदी करण्यामागील शेतक-यांचा उद्देश पाहता प्रथमत: आम्ही हे स्पष्ट करतो की, सोयाबीन बियाणे व्यापारी हेतुने खरेदी केल्यामुळे तक्रारकर्ते "ग्राहक" संज्ञेत येत नाहीत, हा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा मुद्दा तथ्यहीन व निरर्थक आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याद्वारे उत्पादीत सोयाबीन JS335 बियाणे खरेदी केले, ही मान्यस्थिती आहे. प्रामुख्याने, सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर संपूर्ण बियाण्याची उगवण झाली नाही, असा तक्रारकर्ते यांचा मुख्य वाद आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा प्रतिवाद असा की, बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार तक्रारकर्ते यांनी दुबार पेरणी केलेली आहे आणि बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार तक्रारकर्ते यांनी पुन:लागवड केलेली असल्यामुळे उगवण क्षमतेबाबत समितीने निरीक्षण मांडले नाही.
(8) बियाण्याच्या उगवणशक्तीबद्दल तक्रारकर्ते यांनी तक्रार केल्यानंतर तालुका तक्रार निवारण समिती, लातूर यांनी क्षेत्रीय भेट देऊन अहवाल व पंचनामा तयार केल्याचे दिसून येते. अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये नोंदविलेला निष्कर्ष असा की,
"आज दि.18/7/2018 रोजी तक्रारदार श्री. विलास भैरु नागुलकर, रा. रामेगाव, ता. जि. लातूर यांच्या शेतावर सोयाबीन बियाणे उगवणीसंदर्भात भेट दिली असता असे दिसून आले की, त्यांनी पूर्वी पेरलेल्या सोयाबीन पिकाची मोडणी करुन दुबार सोयाबीनची पेरणी आहे. त्यामुळे पूर्वी पेरलेल्या सोयाबीनच्या उगवणीबाबत निरीक्षणे मांडता येत नाहीत."
(9) निर्विवादपणे, शासकीय स्तरावर तालुका तक्रार निवारण समितीची रचना व नियंत्रण आहे. समितीमध्ये कृषी क्षेत्रासंबंधीत अधिकारी वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तयार केलेला अहवाल अमान्य करण्याचे कारण नाही. समितीच्या अहवाल व पंचनाम्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विक्री केलेल्या सोयाबीन बियाण्याचा उल्लेख नमूद आहे. मात्र वादकथित बियाण्याची पेरणी मोडून दुबार सोयाबीन पेरणी केल्याचे आढळून आले. अशा स्थितीत, वादकथित सोयाबीन बियाण्याची उगवण न होण्याकरिता त्यामध्ये दोष होता, असे सिध्द होण्याकरिता उचित व आवश्यक पुरावा नाही. वाद-तथ्ये, संबध्द तथ्ये व पुराव्याच्या अनुषंगाने दखल घेतली असता वादकथित सोयाबीन बियाणे दोषयुक्त असल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र नाहीत.
(10) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्यातर्फे वरिष्ठ न्यायालये व आयोगांचे संदर्भ निवाडे सादर करण्यात आले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी मा. हरियाणा राज्य आयोगाचा "मे. अन्नपूर्णा फर्टिलायझर्स /विरुध्द/ राम चंदर", प्रथम अपील क्र. 652/2007, निर्णय दि.18/1/2012; 2013 3 CPR(NC) 386; 2013 3 CPJ (NC) 406; 2012 (2) C.P.J. 373; 2012 2 CPJ (NC) 170; 2013 2 CPJ (NC) 617; 2012 2 CPJ (NC) 436; 2006 1 CLT (NC) 223; 2013 4 CPJ (NC) 186; 2012 (2) C.P.J. 350; 2012 3 CPJ (NC) 434; 2013 2 CPJ (NC) 193; 2014 (3) CPR 376 (NC); 2011 NCJ 181 (NC) व मा. महाराष्ट्र राज्य आयोगाच्या नागपूर परिक्रमा पिठाने प्रथम अपील क्र.1508/2001 मध्ये दि.1/4/2013 रोजी दिलेला निर्णय इ. संदर्भ सादर केले. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 यांनी मा. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या फौ. कि. अर्ज क्र. एम-34742/2011, मा. हरियाणा राज्य आयोगाच्या प्रथम अपील क्र. 652/2007, मा. राष्ट्रीय आयोगाच्या रिव्हीजन पिटीशन नं. 2354/2016, II (2010) CPJ 215, 2011 NCJ 505 (NC), IV (2016) CPJ 211 (NC), II (2012) CPJ 170 (NC), II (2012) CPJ 373 (NC) या निवाड्यांचा संदर्भ सादर केला. उक्त न्यायनिर्णयांचे अवलोकन करण्यात आले. अंतिमत: उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 95/2019.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-