जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 288/2022. आदेश दिनांक : 09/12/2022.
सुंदराबाई काशीनाथ दानाई, वय 78 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. उस्तरी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
सर्कल ऑफीस, लातूर.
(2) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
हाडगा रोड, निलंगा. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- के.एन. अन्सरवाडेकर
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करुन त्यांच्या शेतामधील विरुध्द पक्ष यांच्या D.P. (Distribution Panal) चे भाडे देण्याचा व अन्य नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(2) वाद-विषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती 'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? आणि त्यांची ग्राहक तक्रार जिल्हा आयोगाद्वारे निर्णयीत करण्यास कायदेशीरदृष्टया समर्थनीय आहे का ? हे प्राथमिक वाद-मुद्दे निर्माण होतात.
(3) तक्रारकर्ती यांचे कथन असे की, उस्तरी, ता. निलंगा, जि. लातूर येथील गट क्र. 4/अ मध्ये त्यांच्या मालकी व कब्जे-वहिवाटीची शेतजमीन आहे. तक्रारकर्ती यांचे पती दानाई काशीनाथ आण्णप्पा यांच्या नांवे विद्युत मीटर असून ग्राहक क्रमांक 614990202301 आहे. त्यांच्या पतीच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती यांच्या नांवे मीटर वर्ग केलेले नाही. तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये विरुध्द पक्ष यांनी अनधिकृतपणे D.P. (Distribution Panal) उभा केलेला असून त्याचे प्रतिमहा रु.3,000/- भाडे दिलेले नाही. त्याकरिता पाठपुरावा करुनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतलेली नाही.
(4) तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांचा प्रकरण दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. त्यांनी निवेदन केले की, विद्युत कायदा, 2003 चे कलम 57 अन्वये तक्रारकर्ती यांना D.P. (Distribution Panal) चे भाडे मिळणे आवश्यक आहे.
(5) वाद-तथ्यानुसार विद्युत जोडणी तक्रारकर्ती यांचे पती यांचे नांवे आहे आणि ते मृत आहेत. तक्रारकर्ती यांच्या शेतजमिनीमध्ये दिलेला विद्युत पुरवठा तक्रारकर्ती यांच्या नांवे वर्ग केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ह्या लाभार्थी किंवा कायदेशीर वापरकर्त्या ठरत नाहीत.
(6) असे दिसते की, तक्रारकर्ती यांनी त्यांच्या शेतजमिनीमध्ये विरुध्द पक्ष यांनी उभे केलेल्या D.P. (Distribution Panal) चे भाडे मागणी केली आहे. तक्रारकर्ती ह्या D.P. (Distribution Panal) चे भाडे मिळण्याकरिता कायदेशीरदृष्टया पात्र ठरतात किंवा त्यासंबंधी उभयतांमध्ये संविदा अस्तित्वात येऊन दायित्वे निर्माण झाले, असा पुरावा नाही. प्रकरणामध्ये वस्तुमध्ये दोष, सेवेतील त्रुटी, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब, प्रतिबंधीत व्यापारी प्रथेचा अवलंब इ. वाद-प्रश्न आढळत नाहीत. त्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये तक्रारकर्ती 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत आणि ग्राहक तक्रार जिल्हा आयोगाद्वारे निर्णयीत करण्यास कायदेशीरदृष्टया समर्थनीय ठरत नाही. तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-