::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-25 जुलै, 2017)
01. तक्रारकर्ता कंपनीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष सॅमसंग इंडीया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि अधिकृत विक्रेता विरुध्द नादुरुस्त एअर कंडीश्नर दिल्या संबधी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्ता कंपनी तर्फे दाखल तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ती “अनमोल इंडीया एग्रो हर्बल फॉर्मींग एवं डेअरी केअर कंपनी लिमिटेड” या नावाने व्यवसाय करीत असून ही तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालाका व्दारे ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे, तर विरुध्दपक्ष क्रं-1) सॅमसंग इंडीया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही दिल्ली येथील निर्माता कंपनी आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) सॅमसंग इंडीया लिमिटेड कंपनीच्या उत्पादनाचे विक्रेता आहेत तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) हे सॅमसंग इंडीया कंपनीचे नागपूर येथील अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे.
तक्रारकर्ता कंपनीने सॅमसंग इंडीया कंपनीचे एकूण 18 एअर कंडीश्नर विकत घेतले होते, त्यापैकी 13 एअर कंडीश्नर दिनांक-19/03/2009 रोजी आणि उर्वरीत 05 एअर कंडीश्नर दिनांक-26/03/2009 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) अधिकृत विक्रेता यांचे कडून विकत घेतले होते, या सर्व एअर कंडीश्नराची एकूण किम्मत ही रुपये-3,62,079/- एवढी होती, एअर कंडीश्नरांवर ते लावल्या पासून 05 वर्षाची वॉरन्टी होती.
एअर कंडीश्नर लावल्या पासून एकूण 18 ए.सी.पैकी, त्यातील एक 0.8 टनचा ए.सी. व्यवस्थित काम करीत नव्हता, त्या बद्दलची तक्रार वेळोवेळी विरुध्दपक्षां कडे करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक-10/07/2012 ला विरुध्दपक्ष क्रं-3) ने तो ए.सी. दुरुस्त करुन दिला, त्याचे बिल तक्रारकर्त्याने दिले. परंतु काही दिवसा नंतर त्या ए.सी. मध्ये पुन्हा बिघाड निर्माण झाला. विरुध्दपक्ष क्रं-3) ला सुचना दिल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं-3) याने तो ए.सी.दुरुस्तीसाठी दिनांक-05/09/2012 रोजी नेला आणि तेंव्हा पासून तो ए.सी. विरुध्दपक्ष क्रं-3) कडेच पडून आहे. तक्रारकर्त्याला त्यानंतर असे सांगण्यात आले की, तो ए.सी.दुरुस्त होण्या लायक नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून तो नादुरुस्त असलेला एक ए.सी.बदलवून त्याऐवजी नविन ए.सी. देण्यात यावा किंवा त्या ए.सी.ची किम्मत वार्षिक 24% दराने व्याजासह परत करावी परंतु नोटीसला विरुध्दपक्षा कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून या तक्रारीव्दारे तक्रारकर्त्याने नोटीसीत मागणी केल्या प्रमाणे विनंती केली आहे, त्या शिवाय झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितलेला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सॅमसंग इंडिया लिमिटेड या निर्माता कंपनी तर्फे लेखी जबाब सादर करुन तक्रार नाकबुल केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-3) हे त्यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर नाही. तसेच हे सुध्दा नाकबुल केले की, एअर कंडीश्नरवर 05 वर्षाची वॉरन्टी असते, एअर कंडीश्नरवर केवळ 01 वर्षाची वॉरन्टी असते आणि कॉम्प्रेसरवर 05 वर्षाची वॉरन्टी असते. त्यांनी हे सुध्दा नाकबुल केले की, तक्रारकर्त्याने विकत घेतलेला एक ए.सी. जेंव्हा पासून लावला तेंव्हा पासून व्यवस्थित काम करीत नव्हता. वॉरन्टीच्या एक वर्षाच्या कालावधी मध्ये तक्रारकर्त्याने त्यांचे कडे कधीही ए.सी. बद्दल तक्रार असल्याचे कळविले नाही. जुन-2012 मध्ये ए.सी.चे कॉम्प्रेसर कुठलेही शुल्क न घेता स्पेशल केस म्हणून बदलवून दिले होते. विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याला वेळोवेळी सेवा पुरविण्यात आली होती. विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीने हे सुध्दा नाकबुल केले की, विरुध्दपक्ष क्रं-3) ने तक्रारकर्त्याचा एक ए.सी.दुरुस्तीसाठी घेतला होता आणि तेंव्हा पासून तो त्यांचेच कडे पडून आहे. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला त्यांचे तर्फे योग्य ते उत्तर देण्यात आले होते. तक्रारीतील इतर सर्व मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) ला अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे नोटीस बजावणी होऊनही उपस्थित न झाल्याने त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) ने आपला लेखी जबाब बरीच संधी देऊनही दाखल न केल्याने तक्रार त्याचे विरुध्द बिना लेखी जबाबा शिवाय चालविण्यात आली.
06. तक्रारकर्ता कंपनी तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित झाले नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) सॅमसंग इंडीया लिमिटेड कंपनी तर्फे वकील श्री श्रीकांत सावजी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर आणि इतर दस्तऐवजांचे अवलोकन केल्या नंतर ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
08. विरुध्दपक्ष क्रं-1) सॅमसंग इंडीया लिमिटेड कंपनीच्या वकीलानीं असा युक्तीवाद केला की, ही तक्रार “ग्राहक तक्रार ” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही कारण एअर कंडीश्नर हे व्यवसायिक कामासाठी विकत घेतले होते आणि कुठलाही एअर कंडीश्नर हा वैयक्तिक वापरासाठी विकत घेतलेला नव्हता. वकीलानीं पुढे असे पण सांगितले की, तक्रारकर्ता ही एक कंपनी असून कंपनीच्या कार्यालयासाठी एकूण 18 एअर कंडीश्नर विकत घेण्यात आले होते ही एकच बाब सिध्द करते की, ते एअर कंडीश्नर हे व्यवसायिक वापरासाठी घेण्यात आले होते, आपल्या या युक्तीवादाच्या समर्थनार्थ त्यांनी खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयाचा आधार घेतला-
“MANSUKH & COMPANY.-V/s-MARUTI UDYOG LTD.” III (2001)CPJ-246
(WEST BENGAL STATE COMMISSION)
उपरोक्त नमुद न्यायनिवाडयात भागीदारी संस्थेच्या नावाने एक कार विकत घेण्यात आली होती, ज्यामध्ये बिघाड झाल्याने ती बदलवून देण्याची मागणी तक्रारकर्त्या तर्फे करण्यात आली होती. कार कंपनीने तक्रारकर्त्याचा दावा नाकबुल यासाठी केला की, ती कार भागीदारी संस्थेची मिळकत होती आणि संस्थेच्या व्यवसायासाठी तिचा उपयोग होत होता, यावरुन मा. राज्य ग्राहक आयोगा तर्फे असे ठरविण्यात आले की, ती कार व्यवसायिक कारणासाठी विकत घेतली असल्याने “ग्राहक तक्रार ” म्हणून चालू शकत नाही.
याच प्रकारचा निर्णय पुढील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्य निवाडयात पण घेण्यात आलेला आहे-
“HINDU CO-OP.BANK LTD..-V/s-INDUSTRIAL
INVESTMENT BANK LTD.”
-I(2013)CPJ-25 (NC)
09. हातातील प्रकरणा मध्ये सुध्दा तक्रारकर्ता ही एक कंपनी कायद्दा अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असून तिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून नागपूरला कॉर्पोरेट कार्यालय आहे. विकत घेतलेले सर्व एअर कंडीश्नर हे तक्रारकर्ता कंपनीच्या नावे विकत घेतलेले असून कंपनीच्या कार्यालयात त्याचा उपयोग होत होता. एअर कंडीश्नर विकत घेतल्याच्या सर्व पावत्या आणि व्हॉऊचर्स हे कंपनीच्या नावाने आहेत, कुठलीही व्यक्ती स्वतःसाठी एवढया मोठया प्रमाणात एअर कंडीश्नर विकत घेणार नाही, त्यामुळे हे अगदी उघड आहे की, ते एअर कंडीश्नर तक्रारकर्ता कंपनीच्या व्यवसायिक कामासाठी विकत घेण्यात आले होते आणि त्यामुळे ही तक्रार “ग्राहक तक्रार ” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्याने ती खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन ग्राहक मंचा तर्फे तक्रारीत पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता अनमोल इंडीया एग्रो हर्बल फॉर्मींग एवं डेअर केअर कंपनी लिमिटेड तर्फे व्यवस्थापकीय संचालक, नागपूर यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) अधिकृत अधिकारी, सॅमसंग इंडीया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, न्यु दिल्ली आणि इतर-02 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.