जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 142/2020. तक्रार दाखल दिनांक : 12/10/2020 तक्रार निर्णय दिनांक : 26/11/2021.
कालावधी : 01 वर्षे 01 महिने 14 दिवस
हरिश्चंद्र गणपतराव गंभीरे, वय 60 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. मजगे नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी म., दक्षीण विभाग, लातूर.
(2) सहायक अभियंता, सेक्शन - 4, महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी म., दक्षीण विभाग, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- आर.एस. गंडले
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- आर.बी. पांडे
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्याकडे दोन इलेक्ट्रीक कनेक्शन आहेत. पहिले कनेक्शन 610550401528 क्रमांकाचे 1997 साली घेण्यात आले होते व दुसरे कनेक्शन 610552251205 क्रमांकाचे 1996 साली घेतलेले आहे. 610550401528 नंबरचे कनेक्शन यातील मीटरमध्ये रिडींग बरोबर येत नव्हती. ॲव्हरेज बील 128 युनीटचे दिले जात होते. तेवढा वापर नव्हता. म्हणून रिडींगप्रमाणे बील देऊन बील दुरुस्त करुन मिळावे व मीटर बदलून मिळावे, यासाठी विनंती केली होती. परंतु त्या अर्जावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला ॲव्हरेज बील भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुसरे मीटर क्रमांक 610552251205 हे मीटर फॉल्टी होते. त्याच्या टेस्टींगसाठी विनंती करण्यात आली. ते जास्तीचा वापर दाखवत होते. परंतु त्याबाबतही योग्य ती कार्यवाही झाली नाही. म्हणून शेवटी मीटर बदलावे किंवा कनेक्शन बंद करावे, अशी विनंती करण्यात आली. तरीही विरुध्द पक्षांनी योग्य ती कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला जादा बील भरावे लागले. लाईट बिलापोटी त्याचे रु.15,000/- जास्तीचे गेलेले आहेत. तसेच या सर्व अयोग्य सेवेमुळे त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाला आणि म्हणून तक्रारकर्त्याने रु.15,000/- व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- इ. मिळावेत, यासाठी ही तक्रार सादर केली आहे.
(2) या तक्रारीच्या उत्तरात विद्युत कंपनीतर्फे सविस्तर म्हणणे सादर करण्यात आले. त्यात त्यांनी असे निवेदन केले आहे की, 610550401528 क्रमांकाचे मीटर हे मार्च 2019 मध्ये बदलण्यात आले. परंतु या मीटर बदलाचा परिणाम (replacement effect) झाला नाही. त्यामुळे जास्तीचे बील आकारले गेले असेल. हा परिणाम नोव्हेंबर 2020 च्या बिलामध्ये आलेला आहे. संबंधीत काळात केवळ 66 युनीटचा वापर आढळून आला. त्याप्रमाणे जास्तीचे वसूल झालेले रु.15,946.65 पैसे नंतरच्या बिलात वजावट करुन चालू बील सध्या ग्राहकाला क्रेडीटमध्ये रु.11,940/- असे दिलेले आहे. त्यामुळे उलट तक्रारकर्त्याचा फायदाच झालेला आहे. दुसरे मीटर क्रमांक 610552251205 हे मार्च 2019 मध्ये बदलले आहे. रिडींगप्रमाणे बील देण्यात आलेले आहे. या मीटरची तपासणी केली असता ते अचूक व सुस्थितीत असल्याचे आढळले. तक्रारकर्त्याचा गैरसमज झाला आहे. त्याला कुठलेही जास्तीचे बील दिलेले नाही. खोटी तक्रार केली आहे. ती फेटाळण्यात यावी.
(3) उभय बाजुंचे निवेदन, पुरावा व लेखी युक्तिवाद विचारात घेतला. निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला
चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली ? अंशत: होकारार्थी
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- या प्रकरणात ज्या बाबी विशेष वादग्रस्त नाहीत त्या अशा की, तक्रारकर्ता हा 2 मीटर आधारे विजेचा वापर करीत होता. या दोन्ही मीटर व बिलाबाबत त्याची तक्रार आहे. असे दिसते की, तक्रारकर्त्याच्याच विनंतीवरुन या 2 मीटर कनेक्शन पैकी 1 कनेक्शन कायमचे खंडीत करण्यात आले. दुस-या वीज कनेक्शनबाबत देखील बिलाचा वाद होताच.
(5) विद्युत कंपनीने आता हे मान्य केलेले आहे की, 610550401528 क्रमांकाचे जे मीटर होते, ते बदलल्यानंतर त्याच्या बदलाबाबतचा परिणाम समायोजित झालेला नव्हता. तो नंतर नोव्हेंबर 2020 मध्ये समायोजित करण्यात आला. दरम्यानच्या काळात तक्रारकर्त्याकडून जी जास्तीची रक्कम वसूल करण्यात आली, त्याचा हिशोब करुन तक्रारकर्त्याला वापराप्रमाणे वीज बिलाची रक्कम वळती करुन घेऊन रु.11,940/- चे क्रेडीट बील देण्यात आलेले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने वेळेवर योग्य ती कार्यवाही केली नाही. त्यांनी विनाकारण तक्रारकर्त्याकडून जास्तीची वसुली केली. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला. कालांतराने जरी त्याला जास्तीच्या वसूल केलेल्या रकमेबद्दल क्रेडीट बील दिले असले तरी विनाकारण व अयोग्य प्रकारे जास्तीची वसुली करण्यात आलेली होती. अशाप्रकारे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा दिली, हे सिध्द होते.
(6) आता सारांश असा काढता येईल की, 2 मीटर कनेक्शनपैकी एका मीटरचा वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. दुस-या एका मीटरबद्दल देखील रिडींगबद्दल वाद होता. हा रिडींगचा वाद देखील आता काहीअंशी समायोजित करण्यात आलेला आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, त्याचे रु.15,000/- विरुध्द पक्षांकडे निघतात. तर विरुध्द पक्षाच्या हिशोबानुसार त्याने असे स्पष्टीकरण दिलेले आहे की, तक्रारकर्त्याने जमा केलेली एकूण रक्कम विचारात घेता रु.15,946.65 पैसे एकूण वीज देयक रक्कम आहे. त्यापैकी निव्वळ थकबाकी रु.2,997.73 पैसे आहे. योग्य तो हिशोब करुन त्याने तक्रारकर्त्याला रु.11,940/- क्रेडीटमध्ये आकारणी केलेली आहे. अशाप्रकारे हिशोबाअंती रु.11,940/- तक्रारकर्त्याला क्रेडीट म्हणजेच परत करण्यात आलेले आहेत. म्हणून आता तक्रारकर्त्याला परत रु.15,000/- विरुध्द पक्षाकडून देवविण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि, विरुध्द पक्षांनी वेळेवर योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्त्याला जो त्रास झाला, त्याबद्दल विरुध्द पक्षांकडून तक्रारकर्त्याला भरपाई दिली जाऊ शकते. तसेच यापुढे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला त्याच्या वीज वापराप्रमाणे योग्य बील द्यावे व त्याच्याकडून जास्तीची वसुली करु नये, असा देखील निर्देश दिला जाऊ शकतो. म्हणून मुद्दे त्याप्रमाणे निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
(2) विरुध्द पक्षांना असा निर्देश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या दोन्ही वीज जोडण्याबाबत संपूर्ण योग्य तो हिशोब आवश्यक त्या तपशिलासह तक्रारकर्त्याला या आदेशापासून एक महिन्याच्या आत द्यावा. तसेच तक्रारकर्त्याकडून त्याच्या वीज वापरापेक्षा जास्तीची रक्कम वसूल करण्यात येऊ नये.
(3) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.7,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/251121)